सक्षम ती खंबीर ती

भाग १

©भाग्यश्री मुधोळकर

 

“अग ए भीमे झालं कि नाही तुझं पाणी भरून कधी भरायचा तो हौद? जरा भरभर पाणी काढ की विहिरीवरनं”

” सदाशिव बैलगाडी मधनं काढली का धान्याची पोती शेतातली !दुकानांमध्ये सगळं धान्य लावायचं आपल्याला”

” माणिक लवकर उठ! बाबांच्या हाताखाली दुकानांमध्ये बसायचय तुला शाळेत जाण्याआधी”

” गोपी चंपी उठली का? आता मला स्वयंपाक घरामध्ये मदत करायला या बरं लवकर”

देशमानेंच्या वाड्यामध्ये सकाळपासून गंगाबाईंचा आवाज घुमत होता. एवढा मोठा वाडा आणि त्यात राहणारी माणसं ,या सगळ्यांना सांभाळणं सोपं नव्हतंच त्यासोबतच शेतीवरही लक्ष ठेवणं ,किराणा मालाचं दुकान होतं, त्यावर लक्ष ठेवणं ,सारी काम एकट्या गंगाबाई लीलया पेलत होत्या. त्यांचे यजमान सोपानराव निमूटपणे गंगाबाई सांगतील ,त्याप्रमाणे इमानेइतबारे कामं करायचे. खरंच गंगाबाईचा कर्तृत्व होतंच तसं.

 

लग्न झाल्यानंतर ,सुख उपभोगल्यानंतर अकस्मात आलेल्या अडचणीतून, अक्षरशः शून्यातून ,गंगाबाईंनी, सोपान रावांना सुबत्ता आणि संपन्नतेच्या वाटेवर नेलं होतं.

पाटलांच्या घरांमधली, चार पोरांच्या पाठीवर झालेली, ही पाचवी पोरगी गंगाबाई लाडाकोडाची. चार भावांची एकुलती एक लाडकी बहीण. आठ वर्षाची झाली आणि तिच्या आई-वडिलांना तिच्या लग्नाचे वेध लागले. दोन पोरांची लग्न झालेली होतीच ,भावजयांसोबत गंगा चांगलीच रमलेली होती ,पण शेवटी जनरीत होती आणि पाटलांना आपल्या पोरीला उजवायचं होतं. गावातल्या भटजीने ,शेजारच्या निमगावातील,  देशमाने यांच्या सोपानाचं स्थळ सुचवलं.

सोपान एकुलता एक पोरगा .एकच बहीण होती. बाकी बहीण भावंडं काही जगली नव्हती .बहिणीच लग्न होऊन ती सासरी सुखाने नांदत होती. देशमाने यांचा कारभार खूप मोठा होता. शेतीवाडी – सावकारी सारंकाही होतं.

एकत्र नांदतं कुटुंब होतं.श्यामराव देशमाने यांचे, म्हणजे सोपानराव यांच्या वडिलांचे दोघा मोठे भाऊ होते.त्यांच्या बायका -मुले ,सुना सगळे मिळून एकत्र सुखाने नांदत होते.

पाटलांना ,तात्यांना म्हणजेच गंगाबाईच्या वडिलांना फार विचार करावा लागला नाही .त्यांनी सोपानराव यांच्या स्थळाला लगेच ‘हो’ म्हटलं. मुलामुलींची पसंती विचारण्याचा काळ नव्हताच तो .आईवडिलांनी ठरवावं आणि मुलांनी लग्नाला उभं राहावं. पुढे सासरी गेल्यावर आठ नऊ वर्षाची पोर ,आपोआपच सासरच्या वातावरणामध्ये मिसळून जात असे.

लग्नाचा थाट उडाला.सौभाग्यलेणी लेऊन,लक्ष्मीच्या पावलांनी, गंगाबाईं, देशमाने यांच्या कुटुंबामध्ये गृहप्रवेश करून आल्या. आठ वर्षाच्या गंगीला फारशी पोचपाच नव्हतीचं. ओल्या मातीचा गोळा होता ती. जसा तिच्या सासरचे आकार देतील तसा तो घडणार होता.

तिची सासू द्वारकाबाई  घरात सर्वात लहान. सर्व सत्ता मोठ्या दोन जावांच्या हातात. खायला-प्यायला ल्यायला काही कमी नव्हते, परंतु अधिकार कसलेच नाही.गंगाचे सासरे ,शामराव मोठे दोन भाऊ सांगतील ,तसे वागायचे. ते सांगतील ती कामं मुकाट्याने करणार. स्वतःचं मत असं काहीच नाही.पण भाऊही चांगलेच वागत त्यांच्याशी.

सोपानराव शाळेत गेले होते. त्यांच्या चार इयत्ता शिकून झालेल्या होत्या ,आणि आता पुढे घरातली शेतीवाडी बघायची आणि मोठे काका जी कामे सांगतील, त्याप्रमाणे काम करायची ,एवढच काय ते त्यांना ठाऊक होतं.

” चार इयत्ता झाल्या कि शिकून पुढे शाळेत जाऊन काय करायचं ? घरचा कारभारच पहा आता.”असं म्हणून मोठ्या चुलत्याने सोपानराव यांचं शिक्षण बंद केलं आणि शेतातल्या कामांना लावलं.

सोपानराव यांचे वडील शामराव तर बोलून चालून, अडाणीच .मोठे भाऊ सांगतील, त्या कागदांवर अंगठा उमटवायचा आणि विश्वास ठेवायचा असा सरळसोट कारभार. मोठे भाऊही वर्षाकाठी शामरावांचा हिस्सा त्यांना सांगुन स्वतःजवळच ठेवायचे. त्यासाठी शामराव ,आपले भाऊ सांगतील तिथे अंगठा द्यायचे.

गंगाबाई ची लग्नानंतरची 6-7 वर्ष खूप चांगली गेली.  चुलत सासवांनी आणि सासूने खूप हौस मौज केली. खायला-प्यायला ,ल्यायला तर काही कमी नव्हतंच. घरात नोकरचाकरही होतेच.सगळे हसतखेळत राहत होते.

बाराव्या वर्षी गंगाबाईला न्हाणं आलं आणि गंगाबाई आणि सोपानराव यांचं वैवाहिक जीवन खऱ्या अर्थाने सुरू झालं.

वर्षभरात त्यांच्या संसार वेलीवर फुल उमलणार याची चाहूल लागली. गंगाबाई मनोमन खूप खूष होत्या ,आता त्या आई होणार होत्या.

त्यांना काय हवं नको ,ते सासू आणि चुलत सासवा तिघीही पुरवत होत्या. ओटीभरणाचा मोठा घाट देशमानेंच्या वाड्यावर घालण्यात आला.हिरवीकंच साडी,त्यावर फुलांचा साज, गंगाबाई गर्भारपणाच्या तेजाने उजळल्या होत्या.

रीतीप्रमाणे पहिल्या बाळंतपणासाठी गंगाबाई आपल्या माहेरी पाटलांकडे ,अगदी बाजूच्या गावात म्हणा ना ,रवाना झाल्या. पाटलांकडेही खूप कोडकौतुक झालं. एव्हाना धाकट्या दोघांचीही लग्ने झाली होती. चारही भावजया, मोठ्या दोघींची पोरं, गंगाबाईंच्या अवतीभवती नाचत होती.

आई आणि भावजया गंगाबाईंच्या आवडीचे रांधून वाढत होत्या. डोहाळे पुरवत होत्या. मोठा भाऊ शिकुन शिक्षक झाला होता. तो वेगवेगळ्या रामायण,महाभारतातल्या कथा गंगाला वाचुन दाखवे.गंगा प्रसन्न रहावी म्हणुन सारा पाटीलवाडा झटत होता.

नऊ महिने पुरे होताच गंगाबाईंनी ,मुलीला, जन्म दिला नातीच्या जन्माची बातमी पोचताच, गंगाबाईंचे सासू-सासरे आणि सोपानराव ‘पहिली बेटी धनाची पेटी’ म्हणतं ,कौतुकाने नातीला बघायला आले.

येताना नातीसाठी  अंगडे ,टोपडे बाळाते,गोधड्या, सोन्याचांदीचे छोटे छोटे दागिने घेऊन आले.कौतुकाची नात होती. सोपान रावांना तर आपण वडील झाल्याचा, आनंद गगनात मावेना.

आपल्या नातीला बघून आणि आत्ता सव्वा महिन्याने आपल्या घरी तिला घेऊन जायचं स्वप्न बघत, घरी आल्यावर आपल्या लेकीचे थाटात, बारसे करण्याचे ठरवत ,सोपानराव आणि त्यांचे वडील शामराव आणि द्वारकाबाई घरी परतल्या.

आजी झाल्याचे सुख द्वारकाबाईंना सुखावत होते.शामरावही आपल्या नातीचा चेहरा डोळ्यासमोर आणत होते.

द्वारकाबाई सकाळी उठल्या. आज मोठ्या जावेने,त्यांना शामरावांची आणि इतर सगळ्यांची शिदोरी घेऊन ,शेतावर जायला सांगितले. आळीपाळीने सगळ्या जावा शेतावर जात. आठ जणांची शिदोरी द्वारकाबाईंनी बांधली.

दोन दीर, चार पुतणे आणि  सोपानराव व स्वतः त्या असे आठजण एकत्र जेवणार होते.

हसतखेळत जेवणं झाली.घरी जाण्याआधी शामराव आणि द्वारकाबाई , शेतावर चक्कर मारायला निघाले. बोलण्याचा विषय नातीचे नाव काय ठेवायचे,बारसे कसे करायचे? मानपान कसा करायचा हाच होता.

“दादा आणि अण्णांना सांगतो मी रात्री जेवणाच्या वेळी.”शामराव द्वारकाबाईंना म्हणाले.

“हो सांगावचं लागेल.सारं काही तेच करतात. सोपानाचं,सगुणाचं लग्न त्यांनीच पार पाडलं. आपल्याला काहीचं पहावं लागलं नाही. रीतीप्रमाणे सारं काही निटनेटकं केलं.आताही करतीलचं.”द्वारकाबाईंच्या बोलण्यात समाधान होतं.

 

क्रमशः

 

©भाग्यश्री मुधोळकर

1 thought on “सक्षम ती खंबीर ती”

  1. सुरेखा जोहरापुरकर

    छान लिहिले आहे पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *