भाग २
©भाग्यश्री मुधोळकर { भाग- 1}
सोपान आणि गंगाबाईच्या पोरीचं थाटामाटात बारसं झालं. निमगावात गावजेवण घातलं गेलं. तिचं नाव ‘गोपी’ ठेवलं गेलं. दिसामासी गोपी वाढत होती .गोपी चार वर्षाची झाली आणि गंगाबाईला आपल्या दुसऱ्या बाळाच्या जन्माची चाहूल लागली. हे दुसऱ्या बाळंतपण ,सासरीच द्वारकाबाईनी पार पाडलं .दुसरीही मुलगीच झाली ,पण तरीही मुलगी झाली, म्हणून कोणाचीच नाराजी नव्हती .दुसऱ्या मुलीलाही ‘दुसरी बेटी तूप रोटी’ म्हणून स्वीकारण्यात आलं .तिचं नाव ‘चंपा’ ठेवण्यात आलं.
चंपाच्या जन्मानंतर ,छोटसं आजारपणाचं निमित्त झालं, आणि शामरावांनी या जगाचा निरोप घेतला. श्यामरावांच्या जाण्यानंतर द्वारकाबाईनाही ,जगण्यात रस वाटेनासा झाला .
त्याचवेळी गंगाबाई मात्र संसार करण्याचं तंत्र, आपल्या चुलत सासवा, जावांसोबत शिकत होत्या.एवढ्या माणसांसाठी रांधणं,गडीमाणसांकडुन कामं करुन घेणं,योग्य ठिकाणी काटकसर करणं,नीटनेटकं राहणं,मुलांना साभाळणं,सारं काही शिकत होत्या.जात्याच चौकस आणि हुशार असणार्या गंगाबाईंना ,पुढील आयुष्यात हाच सर्व ठेवा ,कामी येणार होता.
गोपी, चंपाच्या सोबत दिवस कसा जायचा कळत नव्हते.चंपा तीन वर्षाची झाली आणि पुन्हा गंगाबाईला बाळाची चाहूल लागली. या वेळी दोन बहिणींच्या पाठीवर, मुलगा झाला श्यामरावच परत आले ,असं वाटलं सार्यांना.या बाळाचं नाव ‘माणिक ‘ठेवण्यात आलं. माणिक वर्षभराचा झाला आणि द्वारकाबाईंनीही या जगाचा निरोप घेतला.
आता गंगाबाई एकटी पडली. तीन पोरांचा करणं, घरातलं काम करणं ,सगळं सांभाळावं लागत होतं. नाही म्हणायला चुलत सासवा होत्या ,पण त्यांचेही आता वय झाले होते.त्यांच्या सुना,नातंवडही होतीच.तरी त्या गंगा बाईंना मदत करत होत्या. सारे काही सुखात चाललं आहे, असं वाटत असताना एक दिवस , होत्याचं नव्हतं झालं .सोपानरावांच्या मोठ्या चुलत भावाने, कापसाचा अडतीचा, व्यापार चालू केला होता, त्या मध्ये काहीतरी जबरदस्त खोट आली. सावकाराचं खूप मोठं कर्ज झालं. सारी शेती वाडी विकून ,बायकांचे दाग दागिने विकून ,सगळ्या कुटुंबाने एक होऊन, या संकटाचा सामना केला. परंतु धनाढ्य अशा, देशमाने कुटुंबाची अगदी रया गेली .
खरंतर अशा वेळी कुटुंबात भांडणतंटे व्हायचे. पण सर्वांनी याला काळाचा महिमा म्हणुन स्विकारलं.
मालक असणाऱ्या सगळ्यांवर, दुसऱ्यांच्या शेतात किंवा दुसऱ्याकडे नोकर म्हणून राहण्याची वेळ आली. अशा वेळी मोठ्या जावेने थोडा शहाणपणा दाखवला. राहत्या घराचे तीन भाग केले आणि शेती विकून, कर्ज फेडून उरलेले पैसे सगळ्या पोरांमध्ये समान वाटून, प्रत्येकाने आता आपापल्या नशिबाने ,स्वतःचा स्वतः कमावून खावं असं म्हणून हिस्से वाटे केले .राहण्यासाठी चार खोल्या आणि हातामध्ये सात-आठ हजार रुपये ,गंगाबाई आणि सोपानरावांना आता सारं काही स्वतः उभारायचं होतं.
अर्थातच त्या काळात सात-आठ हजार ,ही रक्कमही बरीच होती. या सात आठ हजार रुपयाच्या आधारावर सोपानराव आणि गंगाबाई यांना आपलं संसार उभा करायचा होता. आपल्या आयुष्याला दिशा द्यायची होती.
सोपानराव किमान चार इयत्ता शिकलेले होते .गंगाबाईंना तर अक्षरओळखही नाही ,पण एकत्र कुटुंबात राहता राहता, सगळ्यांसोबत वावरत असतांना, व्यवहारज्ञान मात्र भरपूर होतं. हे व्यवहार ज्ञानच, त्यांना या सर्व परिस्थितीतून पुन्हा वर येण्यासाठी मदत करणार होते.
पाटलांच्या घरातले ,लहानपणापासूनचे असलेले संस्कार, सचोटीने वागण्याची मिळालेली शिकवण ,कष्ट करण्यात कुठेही मागे पडायचं नाही, याची असलेली जाणीव आणि आपलं भलं कशात आहे ,हे ओळखण्याची दूरदृष्टी, एवढी शिदोरी मात्र गंगा बाईंकडे नक्कीच होती.
दोन्ही चुलत सासरे आधीच जग सोडून गेलेले. चुलतदीर रातोरात मोठं होण्याच्या स्वप्नापायी देशोधडीला लागलेले, अशा वेळेला आधार तरी कोण देणार ?आणि काय करायचं ?याविषयी दिशा तरी कोण दाखवणार? पण म्हणतात ना,’ इच्छा तिथे मार्ग ‘या वेळी गंगा बाईंचे चारही भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीशी उभे राहिले.
बहिणीवर आलेल्या संकटाची कुणकुण त्यांना लागली होती.आता आपले आईवडिल हयात नाहीत.बहिणीचे सासुसासरेही नाहीत,अशा वेळी आपणच मदतीला धावावं,असं त्यांनी ठरवलं.
गंगाबाईंनीही आपल्यावर आलेली परिस्थिती आपल्या भावांना समजावून सांगितली .सोपानराव यांनीही आपल्या आपल्या पेक्षा जास्त हुशार असणाऱ्या, वयानेमोठ्या असणार्या,चार पावसाळे जास्त पाहिलेल्या आणि शिकलेल्या गंगाबाईंच्या भावांचा सल्ला घ्यायला मान्यता दिली.
या सात-आठ हजार रुपयांचा, योग्य वापर करून त्यातून, आपल्या स्वतःच्या उपजिविकेसाठी कायमस्वरूपी उत्पन्न कसं निर्माण करायचं ?याविषयी विचार विमर्श सुरू झाला. घरामध्ये तीन मुलं आणि आपली पत्नी यांच्या जबाबदारीची जाणीव सोपान रावांना होती. सोपान राव यांच्या जोडीने पडतील ते कष्ट करण्याची तयारी, गंगाबाईंचीही होती, त्यामुळे या साऱ्यातून मार्ग निघणार, हे निश्चित होतं.
चार इयत्ता शिकलेल्या सोपान रावांना कुठे चांगली नोकरी मिळणं शक्य नव्हतं. ज्ञान म्हटलं तर शेतीच आणि धान्याचं. या भरवशावर दुसऱ्यांच्या शेतीत राबून फारसा फायदा होणार नव्हता .अशा वेळेला स्वतःचं काहीतरी व्यवसाय सुरू करणं आवश्यक होतं.
मोठा भाऊ म्हणत होता ,”भाऊजी तुम्ही कपड्यांचा व्यापार सुरु करा. कपड्यांच्या व्यापारात खूप फायदा होतो .आपण शहरांमध्ये जाऊन होलसेल ठोक भावात कपडा विकत आणू आणि विकू.” पण कपड्यां मधलं काहीच माहीत नसल्यामुळे तो व्यवसाय सुरु करण्याची तयारी नव्हती.
नंतर सोपानरावांनी दुधदुभत्याचा व्यवसाय करावा,असं धाकट्या भावाने सुचवले.पण तेही शक्य नव्हतं.
अनेक मतमतांतरं पडली. तासन्तास चर्चा झाल्या आणि काहीतरी ठोस मार्ग निघण्याची चिन्ह दिसत नव्हती. तेवढ्या गंगाबाई म्हणाल्या ,”दादा, भाऊ, अण्णा, तात्या मला असं वाटतं की आम्हाला धान्यातलं चांगलं कळतं. आम्ही किराणा दुकानच सुरू करु का?”
भाऊ म्हणाला ,”किराणा दुकान चालू करायला हरकत नाही, पण त्याच्या साठी भांडवल जास्त लागणार. आम्ही देऊ शकतो पैसे. चालेल का तुला?”
गंगाबाई स्वाभिमानी होती. माहेरच्या पैशांवर स्वतःचं घर भरणं तिला मान्यच नव्हतं .
“नाही दादा तू फक्त हिम्मत दे. पैशांची गरजच नाही. आम्ही एकदम मोठं किराणा दुकान सुरूच करणार नाही.आमच्या निमगावात नाहीये,असं दुकान सुरु करणार. सुरुवातीला चणे, कुरमुरे ,शेंगदाणे ,लाह्या असे छोटाशी भट्टी सुरू करतो .गावातले लोक तालुक्याहुन या वस्तु आणतात.आम्हाला हे जमले तर आसपासच्या गावातही हे विकता येईल आणि एवढ्या भांडवलामध्ये हे नक्कीच होण्यासारखं आहे.”
सुरुवात अगदी छोटी आणि साधी होणार होती.कष्ट खूप असणार होते. सोपानराव आणि गंगाबाई दोघंही थे करणार होते. आणि यातूनच मोठी झेप घेतली जाणार होती.
चारही भावांनी,” तुझी भरभराट होवो! काहीही अडचण आली तरी आम्ही आहोत,” असा आशीर्वादाचा हात डोक्यावर ठेवला.
गंगाबाई आता नवीन आयुष्य, व्यवसाय सुरु करण्याच्या तयारीला लागली.गंगाबाई आणि सोपानराव जोमाने कामाला लागले.
सगळ्यात आधी आता भट्टीची सोय करावी लागगणार होती आणि लाह्या, कुरमुरे बनवण्याचे तंत्र शिकावे लागणार होते.
रात्री अंथरुणावर पाठ टेकवल्यावर गंगाबाई ,कंबर कसुन काम करावं लागणार,घरचं सारं सांभाळुन होपानरावांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं लागणार,सारं काही जमेल का नीट, याचाच विचार करत होती.
क्रमशः