©भाग्यश्री मुधोळकर
भाग ८ – अंतिम
सहा महिन्याच्या सर्वेशचे, निदान मतिमंद म्हणून झालं. सगळेजण अंतर्मुख झाले. का बरं देवाने आपल्याच पदरी असं दान दिलं?, असा विचार असा विचार गुंजन, गौरव दोघांच्याही मनात आला, परंतु घरच्यांनी मात्र दोघांनाही, खचून न जाता ,आता जी परिस्थिती आलेली आहे, त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे, असा धीर दिला.
गोपीनेही आपल्या लेकीला ,
” हा मतिमंद मुलगा म्हणजे तुझा अनमोल ठेवा आहे,देवाचा प्रसाद आहे. त्याला नीट वाढवणं, ही तुझी जबाबदारी आहे .”असं समजावलं.
गुंजननेही, आता जी परिस्थिती आहे, ती आनंदाने स्वीकारुया, आणि आता सर्वेशला,
‘ कसं नीट वाढवता येईल’? याचा विचार करू या, असं म्हणून, मनाची खंबीर तयारी केली . आता त्याला वाढवण्यासाठी ,तिला सक्षमही व्हावं लागणार होतं.
घरी सासू-सासऱ्यांचा ,गौरवचा पाठिंबा होता. बीएड केलेलं होतं. एका शाळेमध्ये ती नोकरीही करत होती.
सर्वेशच्या जन्मानंतर, तिने आता मुलांकडे लक्ष देऊया, म्हणून नोकरी सोडलेली होती. सर्वेश दीड-दोन वर्षांचा झाल्यावर, घरीच ट्युशन सुरू करण्याचा, तिचा विचार होता .परंतु म्हणतात ना नियतीच्या मनात वेगळंच असतं. सहा आठ महिन्याच्या सर्वेशला सांभाळण्याची जबाबदारी, सासूबाईंनी स्वीकारली . गुंजन घराबाहेर पडली, ते मतिमंद मुलांची शिक्षिका होण्याचे, शिक्षण घेण्यासाठी.
जेव्हा ती कॉलेजला जात असे, त्या वेळेला घरी तिचे सासू-सासरे ,सर्वेशला आनंदाने सांभाळत .कधी त्यांची अडचण आली, तर गोपी येऊन गुंजनला मदत करत असे. घरच्या सगळ्यांचा पाठिंबा असल्यामुळे, लवकरच गुंजनचं शिक्षण पूर्ण झालं.
आपल्या मुलालाच शिकवण्यासाठी ,आपण हे शिकतोय, ही भावना मनात असल्यामुळे, ते शिक्षण तिच्यासाठी आनंद होता.
तिचं शिक्षण पूर्ण झालं. आता मतिमंद मुलांना, ती चांगलं शिकवू शकणार होती. सर्वेशची चिंता मिटलेली होती. सर्वेशला त्याची आईच शिक्षिका होऊन, शिक्षण देणार होती, पण आपलं ज्ञान फक्त सर्वेश पुरते मर्यादित न राहता, सर्वेश सारख्या इतरही मुलांना, शिक्षण मिळावं अशी गुंजनची इच्छा होती. तिने आपला विचार सासू-सासरे आणि गौरव पुढे मांडला.
सगळ्यांनीच तिच्या निर्णयाचा आदर आणि कौतुक केले. सासरे म्हणाले,
” गुंजन आपल्या घराच्या वरती आपण एक मोठा हॉल आणि टॉयलेट बाथरूम बांधून घेऊया, म्हणजे तिथे तुला तुझी शाळा सुरू करता येईल.”
सासर्यांनी सर्व आर्थिक जबाबदारी स्वीकारली आणि दोन महिन्यातच , छानशी मतिमंद मुलांना आधार देणारी, ‘आधार शाळा’ उभी राहिली.
या आधार शाळेमध्ये सुरुवातीला दोन नवीन विद्यार्थी आणि सर्वेश असे तिघे शिकत होते. हळूहळू पसारा वाढत गेला. आणखीन एक मजला वाढवावा लागला.
गुंजन सोबत मदतीला आणखीन एक मदतनीस आली. तीही मतिमंद मुलांविषयी आपुलकी ,असणारी होती. कारण तिची मुलगीही मतिमंद होती
गुंजन आणि मुक्ता या दोघींनी हळूहळू आधार शाळेचा वटवृक्ष करायला सुरुवात केला. थोड्या मोठ्या असणाऱ्या मतिमंद मुलांना ,व्यावसायिक शिक्षण देऊन, कधी पणत्या,आकाशकंदिल, कधी राख्या ,कधी सजावटीचे साहित्य ,कधी कागदी पिशव्या, असं बरंच काही ,काही ह्या मुलांच्या हातून तयार व्हायला लागलं.
व्यवसाय उभा राहू लागला. गुंजनचा पसारा हळूहळू खूपच वाढला. स्वतःचा मुलगा मतिमंद आहे, म्हणून रडत न बसता, त्या मुलांच्या बरोबरच , इतरही मतिमंद मुलांना चांगलं कसं घडवता येईल, याचा विचार करून, गुंजनने ही आधार शाळा उभारली होती बऱ्याच जणांना ती आधार देत होती. सर्वेश बारा वर्षाचा झाला.
आता आधार शाळेमध्ये जवळपास 28 मुलं शिकत होती. मुक्ता आणि गुंजन यांच्यासोबत, अजून दोन-तीन मदतनीस बायका, मिळून हे सारं सांभाळत होते.
घरातले सारेजण मनापासून, तिला साथ देत होते. सासू-सासरे ,गौरव ,मोठा मुलगा सोमेश, सारेजण गुंजनच्या सोबत होते. आणि सर्वेशही सोबत होता.
पण नियतीला हे सारं नीट चाललेलं मान्य नव्हतं. एक दिवस न्यूमोनियाच्या आजाराचं निमित्त होऊन, सर्वेशने, या जगाचा निरोप घेतला.
सत्य स्विकारले गुंजनने. या परिस्थितीतही,सर्वेशचे डोळे चांगले होते. गुंजनने आणि घरच्यांनी त्याचे नेत्रदान केले.सर्वेशच्या डोळ्यांनी कोणीतरी जग पाहणार होतं.
ज्याला घडवण्याची स्वप्ने गुंजने बघितली होती, तोच आता जगात राहिला नाही. ‘काय उपयोग मी एवढं सारं केलं त्याचा?’ असा विचार तिच्या मनात आला.
पण त्या वेळेला गोपी पुढे आली. तिने गुंजनला, समजावलं,
” तू एकट्या सर्वेशची आई नव्हतीस. या सार्या मतिमंद मुलांची आई तुला व्हायचं होतं. म्हणूनच तुझ्यासोबत हे घडलं. शोक आवर.या सर्व मुलांमध्ये सर्वेशला पहा.
आज सर्वेश नसला ,तरी त्याच्यासारखी ही मुलं आहेत. यांच्यासाठी तुला उभ राहावं लागणार. ही शाळा अशीच चालत राहील. तुझ्या सर्वेशच्या ,आठवणी तुझ्या सोबत, कायमच असतील .पण त्याच्यासारखे, शेकडो सर्वेश, तुझ्या हाताखाली शिकतील. बाहेर पडतील आणि आपल्या पायावर उभे राहतील.व्यावसायिक शिक्षणाचा त्यांना खूप उपयोग होईल. त्यांच्या आई-वडिलांनाही तुझा नेहमीच आधार राहील. तुझ्यासारख्या इतर गुंजनसाठी, तू नेहमीच प्रेरणा असशील. त्यामुळे गुंजन! तुला खचून चालणार नाही.”
गोपीने पोटतिडकीने, आपल्या लेकीला समजावले. सासू-सासर्यांनी ही आधार दिला. सगळ्यांच्या प्रेरणेने आणि पाठिंब्याने, सक्षमपणे आणि खंबीरपणे गुंजनची शाळा चालूच राहिली .
सर्वेशच्या आठवणीत, सर्वेश च्या आठवणींना जपत,’आधार शाळा’ नावारुपाला येत होती.
गंगाबाईनी सुरू केलेला खंबीरपणाचा,वारसा खंबीरपणे आणि सक्षमपणे ,गोपीने निभावला. आणि गुंजनही तो समर्थपणे पुढे नेत होती.
समाप्त
©भाग्यश्री मुधोळकर
खुप सुंदर गुंफलीय कथा…