भाग ४
©भाग्यश्री मुधोळकर { भाग- 3}
गोपी साठी स्थळ शोधायला तर सुरुवात झाली .चुलत सासवांच्या कानावर घालून झालं. गावातल्या भटजींशीही बोलणं झालं. गोपी साठी स्थळ ,शोधायला सुरुवात झाली. खूप सुंदर नाही ,पण नाकी डोळी नीटस आणि कामांमध्ये चटपटीत असणारी गोपी. तिला चांगली जोड मिळावी , आपली लेक सुखात राहावी, अशी गंगाबाईची इच्छा होती.अर्थात सोपान रावांना ही हीच इच्छा होती. शेवटी आपल्या मुलांचं सुख तेच आपलं सुख. मुलीला सुखात सासरी नांदतांना पाहणं, यासारखा आनंद नसतो.
सगुणाचं ,सोपानराव यांच्या बहिणीचे ,आई वडील गेल्यानंतर माहेरी येणं कमी झालेलं होतं. परंतु पोरीचं लग्न करायचं आहे ,हे सांगणे आवश्यक होतं .
त्यामुळे स्वतः सोपानरावांनी एकदा सगुणाच्या सासरी जावे आणि आता गोपी साठी ,आम्ही वरसंशोधन करत आहोत ,हे बहिणीच्या कानावर घालण्यासाठी सोपानराव निघाले.गंगाबाईने फराळाचं आणि भाचरांसाठी कापडचोपड ,सगुणासाठी लुगडं,सोपानरावासोबत दिलं.
“वन्संच्या ओळखीतही स्थळ असतील तर सांगा म्हणावं. पोरगी शहरात नांदेल आपली.” गंगाबाई म्हणाल्या.
“हो सांगतो मी. भावोजींचीही ओळख आहे सगळीकडे .सुचवतील ते आपल्या गोपीसाठी चांगली पोरं.
सगुणाने बारा वर्षाच्या गोपीला पाहिलं होतं. गेल्या तीन वर्षात गाठभेट नव्हती. कारण बऱ्याच दिवसात भावाकडे जाणं झालंच नव्हतं ,पण गोपी ही ,गंगा सारखीच मेहनती आणि हुशार असणार याविषयी सगुणाला खात्री होतीच. सगुणाने भावाला थांबवून घेतले.
ती म्हणाली,
” दादा माझ्या पुतण्या साठीही मुली शोधतच आहेत ,जर गोपीचं, त्याच्यासोबत जमलं तर, आपली गोपी माझ्या इथे सुखाने नांदेल.माझा पुतण्या चांगला शिकलेला आहे.तू गोपीलाही आता चार इयत्ता शिकवलेल्या आहेतच, त्यामुळे मी घरात विचारून बघते. तू आजच्या दिवस माझ्या इथेच मुक्काम कर.माझा पुतण्या मोहन संध्याकाळी येईल,त्यालाही भेटुन घे.”
सोपानराव थांबले. सगुणा सांयकाळी लगेचच, आपल्या पतीशी आणि दिरांशी बोलली. जावेच्या अकाली निधनानंतर सगुणाने दीराच्या मुलाला, आपल्या मुलासोबत ,जीव लावून मोठं केलं होतं. स्वतःच्या मुलाप्रमाणे तिच्यासाठी मोहन होता.
सगुणाच्या दीराचा मुलगा, मोहन हा इंटर पर्यंत शिकून,जालन्याला पोस्टामध्ये कामाला लागलेला होता. शेतीवाडी थोडीच होती, परंतु सगळी नोकरदार मंडळी. सगुणाही सुखात नांदत होती. स्वतः छोटासा वाडा होता सारे जण एकत्र राहत होते.
मोहनला सगुणाने संस्कार देऊन मोठं केलं असल्यामुळे, तिला त्याच्याविषयी खात्री होती. दीरांनीही हरकत घेतली नाही . परवानगी दिली.
काळ बदललेला होता ,त्यामुळे मुलीला बघायला साऱ्या जणांनी जायचं असं ठरलं .सगुणा खूप दिवसांनी शहर गावातून ,आपल्या माहेरी निमगावला दादाची मुलगी, दिराच्या मुलासाठी, म्हणून बघायला सार्यांसोबत आली. सोपान रावांनी आधीच गंगाबाईना या साऱ्याची कल्पना दिली होती .
सोपानवांनी परतल्यावर, “चार दिवसात सगुणा ,तिचे दिर आणि पती ,आपल्या पुतण्या सहित गोपी ला बघायला येणार आहे “असे गंगाबाईंना सांगितले. गंगाबाईच्या आनंदाला तर काही सीमाच नव्हती. लाडक्या नणदेच्या घरीच, आपली मुलगी तिची पुतणसून म्हणून नांदेल,याचा आनंद होता.
आत्या आपल्या भाचीला सांभाळून घेणारे याची तिला खात्री होती .आता प्रश्न होता तो फक्त पुतण्याने आणि त्यांच्या दीराने “हो ” म्हणण्याचा.
ठरल्याप्रमाणे निमगावला हे शहर गावची म्हणजे जालन्याची मंडळी पोचली. सोपानरावांकडे पाहुण्यांच्या स्वागताची लगबग सुरू झाली.
गेली कित्तेक वर्ष सोपानराव बघतच होते. आपली बहीण सगुणा सुखाने सासरी नांदत होती. आपली लेकही त्याच घरी गेली ,तर सुखात राहणार, याविषयी सोपानरावांना आणि गंगाबाईला खात्री होती .
ठरल्याप्रमाणे जालन्याहून निमगावला ,पाहुणे मंडळी आली. सगुणा तिचे पती,दीर आणि पुतण्या मोहनही आलेला होता. शहर गावातली पुढारलेली मंडळी होती. सगुणाला आपल्या गुणवान भाचीबद्दल , खात्री होतीच. मेहनतीचे आणि सचोटीचे सचोटीचे संस्कार ,वहिनीने ,आपल्या पोरी मध्ये केलेले असणार याविषयी सगुणाने आपल्या सासरच्यांना खात्री दिलेली होती. सालस आणि शालीन ,तरीही सद्गुणांचा तेज असणारी गोपी बघताक्षणी सर्वांना आवडली.
पहिल्या बघण्याच्या बैठकीमध्ये, ही सोयरीक जुळली.देण्याघेण्याच्या अपेक्षा नव्हत्याच.
गंगाबाई आणि सोपान रावांना एक जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पडल्याचं समाधान मिळालं. गोपी च्या लग्नाची जोरात तयारी सुरू झाली. मधले वाईट दिवस निघून गेलेले होते. घरांमध्ये, सुबत्ता नांदत होती. थोडी थोडी शेती सोनं-नाणं घ्यायला ही गंगाबाईने सुरुवात केलेली होती. घरामधलं ,पहिलंवहिलं लग्न , थाटामाटात पार पाडण्याचा सोपानराव आणि गंगाबाई यांचा प्रयत्न होता . पण सगुणा आणि जालन्याची मंडळी आणि मुख्य म्हणजे नवरामुलगा मोहन समंजस होते.
“लग्नामध्ये फारसा थाटमाट करू नका, आपण साध्या पद्धतीने लग्न करूया. देणेघेणंही फारसं नको” सगुणाचे दीर म्हणाले.
दोन्हीकडचे मोजके सगेसोयरे ,यांच्या उपस्थितीत पंधरा दिवसातच गोपी आणि मोहन चा विवाह सोहळा पार पडला. गोपी सुखाने आपल्या सासरी जालन्याला नांदायला लागली. शहर आणि गावामधला फरक थोड्या दिवसांमध्येच तिने अंगवळणी पाडून घेतला . गावाबाहेर कधीही, न पडलेली गोपी ,आज शहरात येऊन आपल्या आत्याच्या हाताखाली तिथले रितीरिवाज शिकत संसार करत होती .लग्नानंतर दोन वर्षातच गोपीकडे पाळणा हलला. नातवाला बघून गंगाबाईना कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. सोपानरावांना तर आपल्या नातवाला कुठे ठेवू आणि कुठे नको झालं. बाळंतपणाला गोपी जेव्हा माहेरी, आली होती. तेव्हाच चंपाचंही लग्न ठरलं. शेजारच्या गावात शेतीवाडी करणाऱ्या आणि सुखात नांदणाऱ्या देशमुखांकडे चंपाला देण्यात आलं होतं. चंपाचा संसारही सुखाने चालू झाला.
त्या दरम्यान शिक्षणाचे वारे वेगाने वाहणारे होते. गंगाबाईंनी काळाची गरज ओळखली होती.त्या काळाबरोबर चालणार्या होत्या. आपला मुलगा माणिकला, किराणा दुकान ,शेती दुध डेअरी, याच्या व्यावसायिक शिक्षणासोबतच ,पदवीपर्यंत शिक्षण दिलं.
शिक्षणाने माणूस समृद्ध होतो म्हणतात ते काही खोटं नाही.
एकीकडे शेतीवाडी आणि आपला डेअरीचा व्यवसाय माणिकने ,हाताखाली माणसं ठेवून सांभाळणं सुरू केलं. आणि जोडीला वकिलीचा अभ्यास करण्याची इच्छा ,गंगा बाईंकडे व्यक्त केली. गंगाबाई आणि सोपान रावांनी माणिक ला पाठिंबा दिला आणि माणिकनेही वकिलीचा अभ्यास मेहनतीने पूर्ण केला .पण त्याने या शिक्षणानंतर, शहराची वाट न धरता आपल्या गावातच आपल्या वकिली चा उपयोग त्याचे कचाटे सोडवायला कसा करता येईल? असा विचार केला ,आणि तो गावातच राहिला .उत्पन्नासाठी शेतीवाडी ,दुकान आणि डेअरी होतीच की.त्याचं शिक्षण संपल्यावर गंगाबाई आणि सोपान रावांनी माणिकचही लग्न करायचं ठरवलं.
माणिकसाठी फारसे, वधू संशोधन करण्याची गरजच पडली नाही .गंगा बाईंच्या धाकट्या भावाची मुलगी ,सरिता ही दहावीपर्यंत शिकलेली होती.
माणिकसाठी ती योग्य जोड आहे, असं गंगाबाई ना वाटलं. भावाला विचारल्यावर भावाने ,नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता .माणिक आणि सरिताचा संसार सुरू झाला. सारे काही सुरळीत चालू होतं आनंदाने सारे जण आपापल्या ठिकाणी नांदत होते आणि त्याच वेळी या सगळ्या सुखाचा आस्वाद घेत घेत छोट्याशा दुखण्याचं निमित्त होत सोपान रावांनी इहलोकाचा निरोप घेतला .
गंगाबाई वर आभाळच कोसळलं .गेली चाळीस वर्ष ज्याच्या सोबतीने ,संसार केला आयुष्यातले अनेक चढउतार अनुभवले तो सोडून गेलेला होता. आता या जगापासून ,संसारापासून गंगाबाई ना विरक्ती आल्यासारखं झालेलं होतं. त्यांनी सरिताच्या हाती संसाराची सारी सूत्रं सोपवली आणि स्वतःला देवधर्माकडे वळवलं.
गोपीचा संसार फुलला होता.पण एक दिवस तिच्या सुखालाही ग्रहण लागलं.
क्रमशः
छान लिहिले आहे पुढील भाग लवकर वाचण्यास उत्सुक आहे