दिव्यत्वाची जेथ प्रचिती
‘निंरजनभाऊ कळमकर”
वेगवेगळ्या अभिनव कल्पना म्हणजे निरंजन भाऊ.
मग ते समाजकार्य असू दे ,काही कौटुंबिक कार्य असू देत, नाही तर रोजचं जीवन असू दे ,त्यांचं शिक्षण क्षेत्रातील नोकरी असू देत.
त्यांच्या प्रत्यक्षात आलेल्या कल्पना खूप थोड्या होत्या, पण त्यांच्या मनात ज्या योजना होत्या, ज्या राबवण्याची त्यांना इच्छा होती, त्या असंख्य होत्या. त्याला मूर्त रुप देण्यासाठी एक जन्म अपुरा ठरणार होता.
बघेरवाल सहाय्यता ट्रस्टचे निरंजन भाऊ अध्यक्ष झाले आणि त्यांच्या कल्पनांनी ट्रस्टच्या, वृक्षाचा वटवृक्ष केला. “एक रुपया रोजचा”ही त्यांची संकल्पना होती. त्यामुळे ट्रस्टच्या गंगाजळीत भरघोस वाढ झाली.मदतही जास्त प्रमाणात करता येऊ लागली.
त्याचबरोबर भाऊंनी ट्रस्टसाठी आणखी एक उपक्रम राबवला.साध्या पोस्ट कार्डांवर ,यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी ट्रस्टची मदत घेतली होती, आणि आता ते कमवायला लागले होते ,अशा विद्यार्थ्यांना निरंजन भाऊंनी स्वतः पोस्टकार्ड लिहिली. सहाय्यता ट्रस्ट ने केलेली मदत परत करण्याचं ,आवाहन केलं.
बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. घेतलेली मदत आणि त्या स्वतःची भर घालून दिली. यामुळे ट्रस्टची गंगाजळी वाढवण्यात मदत झाली.
त्यांनी राबवलेली सामूहिक विवाहाची कल्पना, तर सर्वश्रुत आहे .याशिवाय जिंतूरच्या , सासुरवाशिणी आणि माहेरवाशीण यांचा जो मेळावा घेतला, तो आजही सर्वांना आठवत असेलच.
नेमगिरीचा वेगाने झालेला विकास हा निंरजनभाऊ यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतील.
शिक्षण क्षेत्रात अधिकार पदावर असताना, आपल्या जैन शिक्षण संस्थांना मदत मिळवून देण्यासाठी, ते नेहमीच तत्पर असत. त्याचे अनेक किस्से आपल्यातील बऱ्याच जणांना माहीत असतील.
5 वर्षाच्या मुलां पासून ते 70 80 वर्षाच्या एखाद्या वृद्ध आजीशीही ,ते तेवढ्या आत्मीयतेने गप्पा मारत असत. गप्पांचा विषय कधीही, खंत ,संकट ,दुःख नसे. आपल्या मिस्कील बोलण्यातून, मनातून उदास असणार्यावरही , प्रसन्नतेचा शिडकावा करण्याची हातोटी ,निरंजन भाऊ यांना अवगत होतीच.
नयना ताई आणि निरंजन भाऊ यांचे पुस्तक प्रेम अफाट होतं .वृद्धापकाळात माझ्या आई-बाबांकडून आपल्या पुस्तकांची देखभाल होत नव्हती.
एक दिवस ही जोडी पोचली ,आमच्या बंगल्यावर. आणि या जोडीने ,दिवसभर सर्व पुस्तकांची , विषयवार क्रमाने विभागणी केली. पुस्तकांचे कपाट लावण्याचे काम आनंदाने केले.
स्वतःच कर्तृत्व मोठे असूनही, इतरांच्या कौतुकात, निरंजनभाऊ – नयनाताई कधीच कमी पडत नसत. प्रत्येक वेळी आवर्जून ,एखाद्याच्या चांगल्या गोष्टीसाठी ,कौतुकाचा फोन करणे, हे नेहमी चालू असे.
मनाला आलेली मरगळ झटकायची असेल तर निंरजनभाऊंकडे तासभर गप्पा मारून यावे. आता अशा गप्पांना आम्ही मुकणार आहोत.
शेवटच्या दहा वर्षांमध्ये वेगवगळ्या रोगांनी ,निरंजन भाऊंना ग्रासले.
त्याला सुद्धा ते अतिशय गमतीने घेत .
“असा एकही रोग नाही, की जो मला झालेला नाही.” किती ही स्विकाराची तयारी.
एकदा घरामध्ये पंखा पुसताना, की काहीतरी करताना, निरंजन भाऊ पडले ,आणि दहा-पंधरा मिनिटं कोणाचे लक्ष गेले नाही ,त्यांना त्याच अवस्थेत रहावे लागले .त्यावेळी , भेटायला गेल्यावर ते म्हणाले,
” मी पडलो होतो, त्या वेळेला एकच विचार, माझ्या मनात आला ,की बरं झालं घरी पडलो. यावेळी मी गाडी चालवत नव्हतो.”
कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेने कसं बघावं ?आणि आलेल्या परिस्थितीला हसत खेळत तोंड देऊन, आयुष्याला पुढे कस न्यायचं ? याचं जिवंत उदाहरण होते, ‘निरंजन भाऊ कळमकर’.
त्यांचे नाव घेताना आता ‘स्वर्गीय’ लिहावे की नाही?, कारण आठवणींच्या ,त्यांच्या कार्याच्या रुपाने ,ते आपल्या मनामध्ये तर सदैव जिवंत असणार आहेत.
भाग्यश्री मुधोळकर