श्रावण महिना सुरु झाला. चातुर्मासातील हा दुसरा महिना. या निमित्ताने काहीतरी स्वाध्यायात्मक लिहावे ,असे बऱ्याच दिवसाचे मनात होते.
गेल्यावर्षी ‘कथा सुलक्षणा’ ची मी लिहिली होती. त्याला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या वेळी, भगवान ऋषभदेव यांच्या काळातून, थेट मी तुम्हाला नेते आहे, भगवान महावीरांच्या काळामध्ये .
पुण्यात्मा जीवंधर यांचे चरित्र ,मी लिहायला सुरुवात केलेली आहे. अर्थातच ही जिनवाणी लिहितांना ,काही पुराणांचा आणि नेटवर उपलब्ध असणाऱ्या, कथांचा आधार मी घेत आहे.
यामध्ये काही त्रुटी असणार आहेत ,याची मला जाणीव आहे. या कथा मालिके संबंधात ,आपल्या काही सूचना असतील, तर त्या मला अवश्य सांगाव्यात.
मी माझ्या लिखाणात सुधारणा करण्यासाठी, त्याचा उपयोग करेन. पुण्यात्मा जीवंधर यांचं चरित्र ,हे आपणा सर्वांना आवडेल आणि प्रेरणादायी ठरेल, अशा आशेसहित आज प्रकाशित करत आहे पहिला भाग.
पुण्यात्मा जीवनधर-१
भाग१
आजपासून जवळपास अडीच हजार वर्षांपेक्षाही जास्त जुना काळ. भगवान महावीरांचा काळ. राजगृह नावाच्या विशाल नगरीमध्ये राजा श्रेणिक चेलना आणि इतर राण्यांसहित सुखाने राज्य करत होता. तो आता जैन धर्माचा अनुयायी चेलना राणीच्या प्रेरणेने झालेला होता. राजगृह नगरीचे वर्णन काय करावं! भिकारी आणि गरीब व्यक्ती नव्हत्याच तिथे. राजगृहीतील सर्व जनता प्रसन्न आणि सदाचार परायण होती
नगराच्या बाहेर अनेक मनोहर उद्याने होती. अनेक तर्हेचे वृक्ष तिथे फळाफुलांनी बहरलेले होते. हिरवेगार झालेले बगिचे साऱ्यांचं लक्ष मोहीत करणारे होते. नगरमधे सर्व वस्तूंची खरेदी-विक्री करण्यासाठी मोठमोठी दुकानं होती. बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांनाही या नगरीमध्ये खरेदी-विक्री करताना खूप फायदाच होत असे.
या राजगृह नगरी जवळ विशाल पर्वतमाला होती. त्यातील मुख्य असणाऱ्या विपुलाचल पर्वतावर पठारावर भगवान महावीरांचे समावशरण आता लागणार होते. इंद्राने कुबेराला तशी सूचना केली होती.
कुबेराला सूचना मिळताच कुबेराने भव्य समवशरणाची रचना करायला सुरुवात केली .भगवान महावीरांच्या आत्म गुणांचा पूर्ण विकास झालेला आहे, आणि ते आत्म्यापासून परमात्मा झालेले आहेत. त्यामुळे ते केवलज्ञानी झालेले आहेत. संसारातल्या कोणत्याही पदार्थ किंवा प्राण्याविषयी त्यांच्या मनात यत्किंचितही राग द्वेषाची मात्रा शिल्लक नाही, अशा या केवलज्ञानी, भगवंतांचा उपदेश ,वाणी , संदेश सर्व भूतलावरील जीवांना ऐकता यावा, म्हणूनच इंद्राने कुबेराला समवशरणाची रचना करण्याची आज्ञा दिली होती.
कुबेराने भव्य अशा समवशरणाची रचना केली. सर्व ऋतूतील फळं ,फुलं फुललेली होती,आणि भगवंतांच्या समवशरणाकडे, आजूबाजूचे सर्व पशुपक्षी, प्राणी, देव, मनुष्य सारेजण तिथे आकर्षित होत होते.
समवशरणा मध्ये सर्व बाजूंनी प्रकाश रचनेची योग्य योजना होती .रात्रीच्या वेळीही ,त्या प्रकाशामुळे, कुठेही अंधार वाटत नव्हता . ग्राम नगरातून पुष्कळ लोक, मोठ्या संख्येने , भगवंतांचा उपदेश संदेश ऐकण्यासाठी आले होते. भगवंत 3 वेदींच्या वरती जे सिंहासन होते, त्यावरील कमळावर चार बोटे अधर विराजमान होते .केवलज्ञान झाल्यानंतर, 66 दिवसांनंतर ,जेव्हा इंद्रभूति गणधर आपल्या शिष्यांसह ,भक्त होऊन समवशरणा मध्ये आले, त्यानंतर भगवंतांची वाणी दिव्य ध्वनी होऊन खिरायला लागली.
” हे विश्व अनादी काळापासून चालत आलेले आहे आणि अनादी काळा पर्यंत राहील .या जगामध्ये सर्व जड चेतन पदार्थ, अनादी अनंत आहेत.ते कधी उत्पन्न झालेले नाही आणि कधी नष्ट होणार नाही. या जड चेतन पदार्थांची दशा, पर्याय ,द्रव्य क्षेत्र काल भावाप्रमाणे दर क्षणी बदलत असते .जीव संसारातील अनंत सांसारिक वस्तूंशी, प्रेम किंवा घृणा करून ,त्याला आपल्यासाठी इष्ट-अनिष्ट समजतात. असा समज असल्याने ,त्या दुसऱ्या जड पदार्थाचे काही नुकसान होत नाही, पण जीव आपल्यासाठी कर्मबंधन तयार करतो .
या कर्मा बंधनात गुंतुन संसार चक्रात तो फिरत राहतो. या संसार चक्रातून मुक्त होणे हे जिवाच्या हातात असतं, तर संयम ,त्याग यांच्या सानिध्याने मनुष्य शरीराचे कल्याण शक्य आहे. काळाचं चक्र वेगाने फिरत असतं. काळ जात आहे ,तो पुन्हा परतून येत नाही .त्यामुळे आपल्या आयुष्याचा एक क्षणही व्यर्थ न घालवता, आत्महित साधण्यात, सदैव मग्न असलं पाहिजे. प्रमाद, आळस हे आत्म्याचे महान शत्रू आहेत. या शत्रुंपासून सावध राहून, नेहमी उद्योग करत असलं पाहिजे.”
भगवान महावीर यांचा उपदेश सुरू होता. त्यांची दिव्य ध्वनी चोहो बाजूला फिरत होती. त्या समावशरणा मध्ये ,मुनी मंडळात बसलेल्या ,एक देव समान सुंदर मुनींना पाहुन, श्रेणिक राजाने प्रश्न विचारला,
” देव मुनी दीक्षा घेऊ शकत नाही, असे भगवंत म्हणत आहे ,परंतु या मुनीमंडळांमध्ये एक देव समान दिसणारे, मुनी बसले आहेत. त्यांची काय कथा आहे ?”
सुधर्म गणधर मंद हसत म्हणाले,
“राजन् देवाप्रमाणे शरीर असणारे जे मुनी तिथे बसलेले आहेत ,ते मनुष्य जीवंधर कुमार आहेत.”
गणधरांचे उत्तर एकूण श्रेणिक राजाला आश्चर्य वाटले. मनुष्यही देवाप्रमाणे इतके सुंदर कसे असतात ?या उत्सुकतेने त्यांनी सुधर्म गंणधरांना विचारले,
” योगीराज देवतुल्य जींवधरकुमार यांचे जीवन चरित्र जाणण्याची मला खूप उत्सुकता आहे. कृपया आपण त्यांच्याविषयी सांगावे.
सुधर्म गणधरांनी पुन्हा मंद हास्य केले आणि ते मधुरवाणीत म्हणाले ,
“हे राजन! जीवंधर कुमार यांचे चरित्र पावन कथा आहे जी ऐकणाऱ्यांना आवडते आणि धर्म कर्म करण्यामध्ये उत्साह उत्पन्न करते ही कथा मी आता सांगतो.”
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर
खूप सुंदर