संयमित तप
१.”बाबा आमचं काही चुकलं का! काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा, पण आता तुमचा हा निर्णय बदला.” जिनमती धन्यकुमारजींना,बॅग भरतांना,पाहुन विनंती करत होती.
“अगं जिना तुमचं काही चुकलं ,म्हणून नाही मी हा निर्णय घेत नाहीये. मला माझ्या स्वतःच्या आवडीप्रमाणे काम करता यावं, म्हणून मी हा निर्णय येत आहे.”
गेली दोन वर्ष ध धन्यकुमारजींना जिनमती आणि जिनेशने खूप जपले होते. पत्नीच्या निधनानंतर एकट्या झालेल्या धन्यकुमारजींना मुलगा आणि सून खूप जपत होते.
त्यांचं खाणं पिणं ,त्यांना हवं नको ,कपडेलत्ते त्यांचे दुखलं-खुपलं, सगळं होती अगदी मुलीप्रमाणे जिनमती सांभाळत होती.
सगळं काही नीट चालू असताना पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या आलेल्या फोन ने सारे गणित बिघडलं .
धन्यकुमारजीनां रामटेकच्या ट्रस्टींचा,फोन आला. तेथील व्यवस्थापकिंचं निधन झालं होतं आणि तिथे व्यवस्था सांभाळण्यासाठी एक व्यवस्थापक हवे होते. तिथल्या ट्रस्टींचा कोणी ओळखीत आहे का ?अशी विचारणा करणारा धन्यकुमारजींना फोन आला आणि धन्यकुमारजींनी स्वतः त्या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून जाण्याचे ठरवले.
मुलगा आणि सून मात्र चिंतेत पडले.बाबा तिथे एकटे कसे राहणार? आणि मुलगा ,सून ,नातवंड सारे असताना त्यांनी तिथे जाऊन तीर्थक्षेत्राची सेवा केली तर लोक काय म्हणतील? ही तर खूप मोठी भीती.
धन्याकुमारीजी म्हणाले,
” तुम्हाला तर माहितीच आहे ,आधीपासून मला सामाजिक काम आणि धार्मिक काम यांचा ओढा आहे .कितीही म्हटलं तरी संसारामध्ये ,नोकरीधंद्यात, व्यस्त असल्यामुळे मला ते काही करता आलं नाही.आता जोपर्यंत माझी तब्येत चांगली आहे ,तोवर मला असं काही काम करता आलं, तर ते एक प्रकारे समाजसेवा ठरेलच आणि माझ्या मनालाही आनंद मिळेल. घराएवढ्या सुविधा किंवा काळजी घेणारे कोणी नसेल तिथे. पण काय हरकत आहे थोडं सहन केलं तर? तुम्हाला आठवण आली की तुम्ही मला भेटायला तर येऊ शकणार आहात,तिथे. मीही क्षेत्रावर चार दिवसाची काहीतरी सोय लावून तुमच्याकडे येऊ शकणार आहे. मला अडवू नका. नाही जम तर मी परत येणारच आहे. आयुष्याच्या संध्याकाळी थोडं जमलं तर, तपधर्माचं पालन करून बघतो. तुम्ही अनुमोदना द्या.”
सोयीसुविधा,परिवारजनांपासून,दूर राहुन समाजासाठी काहीतरी करण्याची आस घेऊन ,ते निघाले होते.
२.चातुर्मास सुरू झाला आणि या वेळेला घरातील साऱ्यानी, काही न काही व्रत घेणार ठरवले .रात्री भोजन त्याग, रोज नियमितपणे देवदर्शन करणे, स्वाध्याय करणे ,अशा काही ना काही, तपाचरणाला सुरुवात झालेली होती. यंदा अर्हम तिसरीत गेला होता ,आणि त्यालाही, घरातले पाहून या चातुर्मासात काहीतरी नियम करण्याची खूप इच्छा झाली. काय करावे ? या विचारात असतानाच ,तो आजी जवळ गेला,
” आजी यंदा चातुर्मासात मी पण नियम घेणार आहे.”
” घे ना तुला जमेल तसा नियम घे. आणि त्याचे पालन काटेकोरपणे कर .”आजी म्हणाली.
“मी रात्री आरती झाल्यावर, देवासमोर हात जोडून नियम घेणार आहे .”त्यांने सगळ्या घरात घोषणा केली
छोटासा अर्हम काय नियम घेणार ?याची उत्सुकता साऱ्यांना होती.
आरती झाल्यावर छोट्या अर्हमने देवापुढे हात जोडले आणि नियम घेतला.
” पुढे चार महिने, चातुर्मास संपेपर्यंत मी केक, चॉकलेट खाणार नाही.”
नऊ वेळा णमोकार मंत्र म्हटला आणि अर्हमचा नियम पक्का झाला.
“अरे काय हे! तुला सगळ्यात जास्त आवडतात ना केक,चाॅकलेट. कसं होणार तुझं आता चार महिने?” आई म्हणाली.
” आई जमणारे मला! सारं काही मी पक्क ठरवलं ना.”
छोटासा अर्हम त्याच्या परीने तप धर्माचं आचरण करणार होता.
शाळेमध्ये अनेकांचे वाढदिवस या काळात येणार होते, पण तू चॉकलेट केक काहीच खाणार नव्हता. एवढच काय घरी सुद्धा दूधप्लेन पिणार होता. आवडते बोर्नव्हाटाही नाही.
त्याला झेपेल ,जमेल मनावर संयम राहिल. अशाप्रकारे तो तपाचरण करणार होता.
३.प्रतिमा आई होणार ही गोड बातमी तिला मिळाली.घरात सगळ्यांना सांगितल्यावर आनंदीआनंद.तिच्या मातृत्वामुळे घरातल्या सर्वांना नविन ओळख मिळणार होती.
तिच्यासाठी हे मातृत्व म्हणजे एक तपच होते.पण आनंदाने स्विकारलेले.
मिळेल तसे ती खात होती. कधी खाता होती तर कधी नाही ,हे होते अनशन तप.
तिचे वाढणारे वजन बाळाला त्रासदायक ठरु शकणार होते,म्हणून डाॅक्टरांनी थोडे डायटिंग करायला सांगितले,भुकेपेक्षा नेहमी कमी खाण्याचा सल्ला दिला ,हे होते अवमौदर्य किंवा उनोदर तप.
अॅसिडीटीचा तिला असणारा त्रास पाहता,इणि ती जे खाईल,ते अप्रत्यक्षपणे बाळापर्यंत पोचणार होते,त्यामुळे जरी डोहाळे चटकदार पदार्थ खाण्याचे लागले होते,तरी सात्विक पदार्थ खावे लागणार होते,हे होते रसपरित्याग तप
आधी कधीही कोणत्याही वेळी,कसेही खाल्ले तरी चालायचे ,पण आता खाण्यापिण्याच्या नियमित वेळा,नीट बसून,चागंले विचार मनात आणत,खायचे होते,वागायचे होते,हे व्रतपरिसंख्यान तपच तर होते.
जसजसे गर्भारपण पुढे सरकले,प्रतिमाला खूप बाहेर फिरणे,जास्त कामे करणे जमेनासे झाले,डाॅक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली,फिरण्याची मर्यादा आखून दिली. हे होतेविविक्ताशय्यासन तप.
प्रसूतीच्या वेदना सहन करत,प्रतिमाने बाळाला दिलेला जन्म हे कायाक्लेश तप होते.
मातृत्वाचा प्रवास हे सहा बहिरंग तपाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
(ही कथा आजच्या प्रणम्यसागर महाराजांच्या प्रवचनावर आधारित आहे.)
मन आपल्या स्वतःचं असतं ,त्याला समजावणं अवघड असलं ,तरी अशक्य नसतं. हाच तपधर्माचा सराव समजावा का? आपल्या इच्छाना शिस्त लावून,थोडी मुरड घालणे,तसे आचरण करणे हेच तप असावे,असे मला वाटते.
शरीराचे, मनाचे, सवयींचे ,असे तपाचे अनेक प्रकार. खरंतर मला असं वाटतं की संयम आणि तप एकमेकांच्या, हातात हात घालूनच वावरत असावेत, आणि मग ते त्यागाला आपल्या जोडीला आपोआपच घेऊन येत असावेत.
भाग्यश्री मुधोळकर