सत्य

सत्य मेव जयते

१.सत्य सागर महाराज जंगलामध्ये तपश्चर्या करत होते. आपल्या ध्यानात लीन होते. ध्यान संपल्यावर त्यांनी बघितले, तर त्यांच्याजवळ एक हरीण बागडत होते. तेवढ्यात त्या राज्याचा राजा ,तिथे शिकारीला आला त्याला दूरवर हरणाची चाहूल लागलेली होती.
शिकारी राजाची चाहुल लागताच ,हरीण पुढे लांबवर जाऊन गर्द झाडी मागे लपले .
राजा महाराजांच्या जवळ आला .त्यांना त्याने प्रणाम केला आणि विचारले,” महाराज मला आत्ता इथे हरीण बागडताना जाणवले होते कुठे गेले ते?”
आता सत्य सागर महाराज धर्म संकटात सापडले. हरीण कुठे आहे ,हे सांगितले नाही तर खोटं बोलणं होईल, आणि सांगितलं तर राजाच्या हातातून त्या हरणाचा जीव जाणार.
क्षणभर विचार करून महाराज म्हणाले,” राजन माझ्याच चक्षुंनी हरणाला पाहिलेलं आहे, परंतु चक्षु बोलू शकत नाही. वाणी बोलू शकते, पण तिने हरणाला पाहिलेलं नाही. त्यामुळे मी काहीच सांगू शकत नाही.
सत्यसागर महाराजांचं बोलणं ऐकून, राजाला मतितार्थ कळला. महाराजांनी पुढे जीवहिंसा करणे, कशाप्रकारे पाप आहे, याविषयीही राजाला उपदेश दिला. राजाने तो उपदेश स्वीकारला आणि यापुढे कधीच शिकार करणार नाही जीवहिंसा करणार नाही असा नियम महाराजांकडे घेतला.

२.”अहो मॅडम कधीपर्यंत पूर्ण होणार आमच्या मास्कची ऑर्डर ?”जिनमतीला फोनवरून जैनम इंटरप्राईजेस मधला माणूस विचारत होता.
लाॅकडाऊन च्या काळामध्ये ,घरून तिने आपल्या शिवण कौशल्याचा वापर करून, चांगल्या प्रतीचे मास्क शिकवायला सुरुवात केली होती. आणि 4-5 कंपन्यांना, ती नियमित प्रमाणे त्याचा पुरवठा करत होती.
पुढे थोडंसं काम वाढल्यावर दोन बायका हाताखाली ठेवून तिने मोठ्या प्रमाणावर ऑर्डर घ्यायला सुरुवात केलेली होती.
तरीही कधीकधी कधीकधी मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत व्हायची. कधी रॉ मटेरियल शॉर्टेज व्हायचं, तर कधी एखादी व्यक्ती सुट्टी घ्यायची, त्यामुळे ठरलेल्या मुदतीत एखाद्यावेळेस काम पूर्ण होत नसे.
जैनम इंटरप्राईजेसला खरंतर आज ऑर्डर पोचवायची होती, परंतु अजून दोन दिवस ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी लागणार होते.
अर्थातच आपल्या कितीही अडचणी सांगितल्या, तरी त्या समोरच्या व्यक्तीला पटतील, असं नाही.तरीही जिनमतीने त्याला खरे सांगितले ,”साहेब अजून दोन दिवस तरी नक्की लागतील.”
“पण मॅडम तुम्ही आम्हाला आज डिलिव्हरी करणार हे सांगितलं होतं, तुमच्या भरोशावर होतो कि आम्ही!”
“मान्य आहे साहेब !पण अडचणी काही सांगून येत नाही. मी उगाचच तुम्हाला झालंय झालंय सांगून ,टांगत ठेवायचं, हे काही बरोबर नाही ,म्हणून खरं सांगते की ऑर्डर पूर्ण व्हायला दोन दिवस तरी लागतील”
“पण मॅडम अर्जंट आहे हो खूप ”
“थोडं सांभाळून घ्या हो! अगदीच अर्जंट असेल तर माझ्याकडे जे थोडेफार तयार झालेले मास्क आहेत, ते पाठवते .तुमची अडचण भागेल आणि आणि मलाही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी थोडासा वेळ मिळेल”जिनमतीने तोडगा काढला.
अर्थातच समोरच्याला पटला.
अर्हमम आईचं बोलणं ऐकत होता. समोरच्याशी खोटं न बोलतही मार्ग काढता येतात, हे त्याला पटलं होतं.

३.राधिकाला कधीही कारण नसताना समोरच्याशी खोटे बोलण्याचे वाईट सवय झाली होती. एखाद्याला बरोबर साडेअकरा वाजता भेटायला सांगायचं आणि स्वतः मात्र आरामात साडेबारा एकला जायचं.
आई-बाबांनी एखादं काम केलं का ?विचारल्यावर काम केलं नसलं ,तरी बिनदिक्कतपणे हो म्हणायचं. त्यामुळे बऱ्याचदा राधिकेचा बोलणे, कोणाला खरं वाटायचं नाही.
एकदा राधिका काला क्षमाला. खूप महत्त्वाचं कागदपत्रे द्यायची होती. तिने क्षमाला भेटायला बोलवलं .पण राधिका नेहमीप्रमाणे उशीराच येणार ,असे गृहीत धरून क्षमा उशिरा पोहोचली.
राधिकाला त्या दिवशी,क्षमाला कागदपत्रे,देऊन पुढे वीजबिल भरायला जायचे होते. क्षमा येईपर्यत उशीर झाला नि वीजबिल केंद्र बंद झाले. दुसर्‍या दिवशी पुन्हा एवढ्या लांब यावे लागणार होते.
आपल्यामुळेही कोणाची तरी कामे होत नसतील ही जाणीव राधिकिला झाली.पश्चाताप झाला. यापुढे खरोखर आपण सांगतो ,त्याप्रमाणेच वागायचं ,हे तिने मनोमन पक्क ठरवलं.

४.आज माधव आज खूपच चिडला होता. त्याचं कोणी ऐकूनच घेत नव्हतं. कंपनीला एक मशीन विकत घ्यायची होती ,अनेक लोकांकडे, त्याबद्दल एन्क्वायरी करण्यात आली होती. त्यातल्या त्यात एका कंपनीचे मशीन माधवला पसंत पडलं होतं. सर्व दृष्टीने योग्य वाटत होतं, पण त्याच्या दुसऱ्या सहकार्‍याने,सुचवलेलं मशिन कंपनीने निवडलेलं होतं. बॉसने ही त्याचं म्हणणं ऐकून घेतलं होतं दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलं होतं ,पण माधवने सुचवलेल्या कंपनीकडून मशीन विकत न घेता, दुसऱ्या कंपनीकडून विकत घेतलं होतं. माधवला फार वाईट वाटत होतं. दोन दिवस थोड्या रागातच काम करत होता.
बॉसच्या हे लक्षात आलं बॉसने त्याला प्रेमाने जवळ बोलावलं आणि सांगितलं,” माधव तू सुचवलेल्या कंपनीचं मशीन मी घेतलं नाही म्हणून तू नाराज आहे असं दिसतं, पण राघवने, या कंपनीचं मशीन सुचवलं ,तेही चांगलं होतं, फक्त ती कंपनी नवीन आहे,म्हणून तुझा विरोध होता. तुला जुन्या नामांकित कंपनीकडून मशीन घ्यायचं होतं ,पण मला राघवचे म्हणणे पटले. नवीन लोकांनाही संधी देऊन बघायला हवी, म्हणून मी ते घेतलं ,याचा अर्थ तू चुकीचा आहेस आणि राघव बरोबर, असं नाही .दोघेही जण आपापल्या परीने बरोबरच होतात. फक्त शेवटचा निर्णय मला घ्यायचा असल्यामुळे, मी नवीन कंपनीला संधी दिली इतकच.
माधवला बॉसचा म्हणणं पटलं .आपण वे खरं सांगत असलो, बरोबर असलो ,तरी काही वेळेला समोरचा माणूसही, बरोबर असतो ,त्याचाही दुसरा दृष्टिकोन असतो, ते समजून घ्यायला हवे.

५.नंदिता मैत्रिणींसोबत मुक्तागिरीच्या यात्रेला निघाली स्टेशनवर ट्रेनमध्ये चढतांना कोणीतरी मोबाईल,पर्समधून चोरला.महिनाभरापूर्वी तिच्या वाढदिवसाला रोहनने,तो महागडा मोबाईल,तिला भेट दिला होता.
नंदिताला ब्रम्हांड आठवले.आता रोहन किती रागवेल,याचा ती विचार करायला लागली.मैत्रिणीच्या फोनवरुन तिने रोहनला फोन करुन ,मोबाईल चोरला ,गेल्याचे सांगितले.
“अग इतकंच ना. तुझ्या नकळत चोरीला गेला मोबाईल.तुला काही झाले नाही,हे महत्वाचे. मोबाईल पुन्हा घेता येईल.तुझा मोबाईलमधला डाटाही रिकव्हर होईल. काळजी करु नकोस. तू आनंदात मुक्तागिरी कर. तू परत आल्यावर नविन मोबाईल घेऊया.”रोहन म्हणाला.
निर्जिव वस्तुंपेक्षा आपल्या जिव्हाळ्याची सजीव व्यक्ती महत्वाची हे सत्य रोहनला माहित होते.
तो सत्यधर्म आचरणात आणत होता.

६.गोडाऊनला आग लागल्याचा फोन जिनदत्त शेठजींना आला. लाखोंचा माल जळून खाक झाला होता.अजून मालाचा इन्शुरन्सही झाला नव्हता.कारण त्याच दिवशी माल आला होता आणि इन्शुरन्सचची प्रक्रिया सुरु झाली होती.
पण आता जी गोष्ट घडून गेली होती,त्याविषयी शोक,खेद,खंत करुन काहीच उपयोग नव्हता.
शेठजींनी दीर्घश्वास घेतला. कर्माचा उदय होऊन गेला आहे,आता भूतकाळाचा विचिर करण्यात अर्थ नाही, हे सत्य स्विकारले आणि गोडाऊनची स्वच्छता,डागडुजी करायला माणसांना सांगितले नविन सुरुवात करायला ते सज्ज झाले.

जैन धर्मातला हा अनेकांत वाद ,सत्यधर्माला सहाय्यभूत आहे .बऱ्याचदा आपण फक्त माझेच म्हणणं खरं, असा युक्तीवाद करतो.ते योग्य नाही. एखाद्या गोष्टीसाठी आग्रह धरणं वेगळं आणि दुराग्रह करणं वेगळं.
आपण आपल्या या भूमिकेला लवचिक करु शकलो तर,शांत परिणाम ठेऊ शकलो,तर सत्य धर्माचं पालन करू शकतोय, असं म्हणता येईल.
नाम सत्य,रुप सत्य,स्थापनासत्य, प्रतिती सत्य,स्मरण सत्य,योजन सत्य,जनपद सत्य ,उपरयोग सत्य,भाव सत्य समय सत्य असे सत्यधर्माचे दहा प्रकार.

सत्यधर्माचे विविध पैलु या कथांमधून मांडण्याचा हा अल्प प्रयत्न.

भाग्यश्री मुधोळकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *