पुण्यात्मा जींवधर-6
भाग ६
©भाग्यश्री मुधोळकर
काष्ठांगार,आपलं कारस्थान यशस्वी झालं, म्हणून आनंदात होता .आता आपण या राज्याचे राजा झालो, म्हणून खुशीत होता.
तिकडे मयूर विमानाची किल्ली जेव्हा संपली, तेव्हा ते विमान राजपुरीच्या, स्मशानभूमीत जाऊन उतरलं. विजया राणी त्या विमानातून उतरली, आणि तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. राजपुरीची पट्टराणी ,आपल्या उदरातील संतांनाच्या प्रसूतीसाठी, एका स्मशानात एका बाजूला जाऊन बसली. संसाराची दशा किती विचित्र आहे, भाग्यशाली राजपुत्राला ,जन्मासाठी स्थान मिळालं, तेही स्मशानभूमी.
महाबली नारायण कृष्णाचा जन्मही ,बंदी घरांमध्ये झाला होता. पराक्रमी हनुमान वनातल्या एका गुंफेमध्ये जन्मले होते.
प्रसूतीच्या वेळी दैवयोगाने ,तिथे एक देवी दाईच्या रुपात आली, आणि तिचे विजया राणीच्या प्रसूतीमध्ये मदत केली. विजया राणीने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. आपल्या पुत्राचं सुंदर मुखकमल पाहून विजयाराणी , क्षणभरासाठी सारे काही विसरली. तिने आपल्या पुत्राला छातीशी लावले, त्याच्या कांतिमान मुखाचे, वारंवार मायेने चुंबन घेत होती.
तिच्या मनामध्ये हर्षल्हासाच्या , लहरी उमटत होत्या, पण त्याच क्षणी तिने समोर स्मशानभूमी पाहिली, आणि तिला आपल्या राजा भवनाची आठवण आली .आपली कोमल शय्या आणि दासींची सेवा तिच्या डोळ्यांसमोर आली. सत्यंधराच्या प्रेमाचे दृश्य, नेत्रांसमोर दिसायला लागले. त्याच वेळी तिचा सगळ्या आनंद उडून गेला आणि दुःखाची वेदना उमटली.
नेत्रातून अश्रू वाहायला लागले, ती म्हणाली,
” हे पुत्र! तुझ्या जन्माचा उत्सव आज राजपुरीत किती हर्षाने साजरा झाला असता. हे आर्य पुत्र !सत्यंधराने मला विमानात बसवून, जिवंत ठेवले, पण त्यांनी स्वतःची चिंता केली नाही. हे आर्य पुत्र! तुमच्याशिवाय राजपुरीची राणी स्मशानभूमीत बसून तुमची वाट बघत आहे. आपल्या नवजात पुत्राचा मुखचंद्र तर पहायला या.”
विजयाचं करीण रुदन ऐकून, तिथले पशुपक्षीही दुःखी झाले. थोड्यावेळाने तिचं सांत्वन करत दाई रूपातली देवी म्हणाली,
” राणी ही स्मशानभूमी आहे. इथे जीवन-मरणाचे, मर्म शिकून घे. संसारात राजसुखच काय?, हे जीवनही अमर नाही. सूर्य अस्ताला जातो ,तर चंद्राचा उदय होतो. मागच्या गोष्टी सोडून दे .आपल्या प्रतापी पुत्राला पहा ,तो विचार करत आहे, की माझ्या जन्मामुळे, माझी माता दुखी झालेली आहे. ”
दाईचे हे बोलणे ऐकून ,विजया राणीने प्रेमाने ,आपल्या पुत्राला घेऊन हृदयाशी कवटाळले. ती दुःख विसरली. आणि तिने त्या देवीला विचारले,
” सखी या राजपुत्राचे पालन-पोषण कसे होईल?”
देवी म्हणाली,
” राजेशाही थाटात, राजसी रूपामध्ये, राजा सारखेच होईल.”
राणीने विचारले ,
“कसं काय ?राजपाट तर आता स्वप्न झालं. आहे राजेशाही थाट ,आता स्वप्नाप्रमाणे वाटत आहे.”
देवी म्हणाली ,
“या मुलाला इथे ठेवून दे .एक भाग्यशाली ,संपन्न पुरुष याला आपल्या घरी घेऊन जाईल, आणि राजेशाही थाटात त्याचं पालनपोषण होईल .”
इतर कोणताच उपाय समोर न दिसल्यामुळे, विजया राणीने कठपुतळी प्रमाणे ,दाईरूपात असणाऱ्या, देवीच्या सांगण्याचे पालन केले.
आपल्या मुलाला तिने झोपवले आणि एका बाजूला लपून विजया राणी आणि देवी पुढे काय होणार ? हे पाहण्यासाठी लपून बसल्या.
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर