क्षमाधर्म

१}.  “आता मी तुझ्याशी एक शब्द बोलणार नाही. काय हवं ते कर.” जिनमती,अर्हमवर तिच्या मुलावर चिडली होती.
 अर्हमचं सतत कानात हेडफोन घालून बसणं आणि तिच्या बोलण्याकडे लक्ष नसलेले, तिला अजिबात आवडत नसे.
 आई असं बोलत असली तरी हा राग कायम टिकणारा  नाही ,हे अर्हमला चांगलं माहीत होतं. दहा मिनिटांनी, तो त्याच्या आईशी बोलायला जाणार होता आणि  बोलणार होता. आईही काहीच मनात न ठेवता  बोलणार होती.क्षमा मागणे ,क्षमा करणे या नात्यात गरजेचेच नव्हते. क्षमा धर्माची शिकवण आचारातूनच होते ना.

२}.   गेली चार वर्ष दोघा भावांमध्ये बोलाचाली नव्हती. बाजूबाजूच्या घरात राहुनही. आई बाबा गेल्यावर संपत्तीच्या वाटण्यांवरून झालेला वाद होता. ह्या लाॅकडानच्या काळामध्ये, क्षणभंगुर जीवनाची जाणीव दोघांनाही झालेली होती. पण पुढाकर मोठ्याने घेतला. दशलक्षण पर्वाच्या आदल्या दिवशी, छोट्याला फोन करून “घरी ये. एकत्र पूजा करूया” म्हटले आणि दोघांनाही मोकळे वाटले छोटाही ,”दादा !आलोच .”असं म्हणून आनंदाने मोठ्याच्या घरी गेला. क्षमाधर्माचे पालन, जे अवघड होते, ते शक्य झाले होते.फक्त एका फोनने.

 

 

३}. “अरे किती हा त्रास. दहा वाजता बोलावले बारा वाजले तरी सर आलेले नाहीत. आता आल्यावर रात्री आठपर्यंत पुरेल ,असे काम देतील.”  आरव आपल्या बॉसवर चिडलेला होता. त्याच्या बॉसची ही नेहमीची सवय होती. हाताखाली काम करणाऱ्यांना,किंबहुना कोणालाच, दिलेली वेळ पाळायची नाही. उशिर करायचा.

पण चिडलेल्या व्यक्तीला लगेच शांत करण्याची हातोटी होती ,आरवच्या बॉस अर्णवकडे. “साॅरी माझ्यामुळे खोळंबा झाला, तुम्हा सर्वांचा. पण काय करु ,कितीही प्रयत्न केला तरी उशीर होतोच. खरंच साॅरी.” त्याचे अजिजीने क्षमा मागणे,सर्वांना भावायचे. मग काय बिशाद की कोणाचा राग राहिल तसाच कायम.

४}.  “मानव शाॅपिंगला जायचे आहे, पैसे दे ना.”मानसीने नवर्‍याकडे पैसे मागितले.
“अग नेहमी पैसे काय मागतेस. कधीतरी बुध्दी माग.” मानव हसून म्हणाला.
“ज्याच्याकडे जे असते तेच मागावे.” मानसी म्हणाली.
थट्टा आता भांडणाच्या दिशेने जातेय,हे मानवच्या लक्षात आले.मानसीचा राग आला,पण मनात एक ते दहा म्हणून संभाषण बदलले.
“या महिन्यात मेडिक्लेम भरलाय त्यामुळे पैसे कमी आहेत ,मानसी.पुढच्या महिन्यात चालेल का शाॅपिंग?” मानव.
“अरे हरकत नाही चालेल.चल नुसतंच बागेत फिरुन तर येऊया.” मानसी.
मन दुखावणे, क्षमाकरणे, मागणे छोट्याश्या समजदारीने टळले.

 

क्षमा मागणे आणि करणे,हेच तर मन स्वच्छ ठेवण्याचे खरे साधन.मनाला उर्जा देणारे साधन.मनातील अपराधबोधाचा निचराही होतो ,क्षमा मागितल्याने आणि केल्याने. फक्त पर्युषणच नव्हे ,तर जेंव्हा गरज असेल ,तेंव्हा क्षमाभाव मनात धारण करता आला पाहिजे.

                                                                                                                                       भाग्यश्री मुधोळकर

1 thought on “क्षमाधर्म”

  1. Pingback: सक्षम ती खंबीर ती-३ - Marathi Prerna - For Good Marathi Content

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *