सूर निरागस हो
अवंती आकाशच्या आँफिस मध्ये बसलेली होती,त्याच्या बॉस समोर. अपाॅईंटमेंट लेटर घेण्यासाठी.पंधरा दिवसापूर्वी तो कोरोनाने त्यांच्यातून निघून गेलेला होता.चार दिवसात होत्याचे नव्हते झाले.
खूप मोठे आव्हान तिच्यापुढे ठेवून,तो निघुन गेला.
दोन छोट्या मुलींचा सांभाळ करण्यासाठी, तिला बाहेर पडावे लागणारच होते.
अनुकंपा तत्वावर, त्याच्या बॉसने, तिला झेपेल अशी नोकरी ,तिथे देण्याचे तयारी दर्शवली होती. तिची मेहनत करण्याची तयारी होती. पाठीमागे उभ्या होत्या ठामपणे तिच्या सासूबाई .आपल्या एकुलत्या एक लेकाच्या जाण्याचं दुःख पचवून.
तिनेही मेहनतीत कुठेच मागेपुढे पाहिले नाही .ऑफिस घरातलं ,काम सांभाळत, बरोबरीने घरातही सासु बाईंकडे, मुलगा आणि सून दोन्ही नात्याने ती लक्ष देत होती.
वर्षभर आतली तिची कामातली प्रगती बघून बाॅसही खुश होते.तिच्या घराजवळच्या शाखेत तिला महत्वाच्या पदावर,त्यांनी तिला बढती दिली.
पण या सार्यात ,तिच्या चेहर्यावरचं हसु मावळलं होतं. स्वतःसाठी जगणं ती विसरली होती.
आकाश असतांना ज्या सूरांना ती आळवायची. गाण्याचा रियाज करायची,तो बाजुला पडला होता.
शेवटी जगरहाटी कोणाला सुटली. सावरावेच लागले चिमुकल्यांसाठी आणि ज्येष्ठ नागरिक असणार्या सासुबाईंसाठी.
या साऱ्यांमध्ये ती विसरली होती स्वतःसाठी जगणं. चेहऱ्यावर आनंद नांदवणं. स्वतःला गुंतवून घेतलं होतं तिने कामांमध्ये घरातल्या आणि ऑफिसातल्या.
आज तो गेला ,त्याला एक वर्ष पूर्ण झालं होतं. त्याच्या स्मृती तिच्या मनामध्ये दाटून येत होत्या. त्याची खूप आठवण येत होती.डोळे वारंवार भरून येत होते.
आज तिने ऑफिसातून सुट्टी घेतली होती. खूप दिवसांनी तिच्या समवयस्क असणारी तिची मावसबहिण,नेहा तिला भेटायला येणार होती.
वर्षभरापूर्वी तीही याच दुःखातून गेली होती फरक इतकाच की तिच्या साथीदाराचा निधन झालं होतं, एका एक्सीडेंट मध्ये.
आपल्या मुलाकडे बघून ,तीही एकर पालकत्व निभावत होती. दुःख तर तिच्याही मनात होतं.
पण ती घरात आली आणि जणू घरामध्ये उत्साहाने सळसळता, एक प्रवाह घेऊन आली.
ती येताच तिने आणि तिच्या मुलाने त्या घरातली एक छोटीशी उदासवाणी किनार, जी होती ती किनार पुसून टाकली. मुलांनी मिळून दंगामस्ती सुरू केली. तिने सासूबाईंचा आणि अवंतीचा ताबा घेतला.
तिच्या व्यवसायात ,अनुभवायला येणाऱ्या गमतीजमती, खाण्याच्या विविध पदार्थांच्या रेसिपी, नव नवीन वाचलेले पुस्तक ,ऐकलेली गाणी याविषयी ती भरभरून बोलत होती.
खरं तर अवंतीलाही या सगळ्याची आवड होतीच की. गाणी ऐकणे आणि म्हणणे, पुस्तकं वाचणे, छान पैकी तयार होऊन मिरवणे, पण गेले वर्षभर ती हे विसरूनच गेली होती.
नेहाच्या येण्याने तिला या साऱ्याची जाणीव झाली. नेहाही तिच्या नवर्याचा व्यवसाय सांभाळत आणि मुलाला सांभाळत जगत होती, पण आयुष्याबाबत ,ती उत्साही होती. स्वतःही ती आनंदात होती. नवर्याचे जाणे स्विकारुन.
तिला आता स्वतः स्वतः विषयी कणव वाटायला लागली. की कसं काय विसरले, मी हे सारं .जाणारा तर गेला, पण त्याच्या मागे असं कुढत राहून, फक्त जबाबदारी पार पाडण्यासाठी जगणं ,का?
नेहा कडे बघून तिला ही जाणीव झाली .आपण हे सारं बदलवायला हवं,हे आतुन जाणवलं.
मग बदल करायला कितीसा वेळ लागणार? नेहाशी बोलता-बोलता काही नवीन चांगल्या पुस्तकांची नावं कळलीच होती. तिने लगेच मोबाईल हातात घेतला ती पुस्तके ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी.
त्याचबरोबर कपाटात ठेवून दिलेले बरेच आवडते कपडे काढले ऊन दाखवायला . तो गेला तरी पण, आनंदाने जगू शकते. छान राहू शकते. याचा तिला साक्षात्कार झाला.
मुलांशी दंगा मस्ती करू शकते ,त्यासाठी कोण काय म्हणेल ?याची खंत बाळगू नये किंवा काळजी करणे याची गरजच नाही.हेही तिला जाणवले.
सासूबाईंना हा बदल जाणवला.त्या म्हणाल्या
“खूप दिवसात तुझं गाणं ऐकलं नाही.काढ की कॅसियोहि कपाटातून”
ती हळुच हसली.कॅसियो बाहेर आला आणि त्या सुरावटींवर अवंती गायला लागली,
“सूर निरागस हो”
भाग्यश्री मुधोळकर