कथा सुलोचनाची
जैन नारीच्या सन्मानाची
©भाग्यश्री मुधोळकर
आज सकाळपासूनच राजमहालात गडबड चालू होती. काशीनगरीचा राजा अकंपन आणि त्याची राणी सुप्रभा महालात सर्वांना सूचना देत होते.
“अग विद्यावती! सुलोचनासाठी सुंदर मोरपंखी वस्त्र मी निवडुन ठेवले आहे. तिला उद्या तेच नेसायला लाव.”
“चंपावती!ते माणिक आणि पाचुचे दागिने त्यावर शोभतील.खजिन्यातून मागवुन घे आणि सजव सुलोचनेला.”
शीलवती! बागेतून ताज्या फुलांचे गजरे आणि हार आलेत का?लक्ष ठेवशील बरे!”
“महेंद्रदत्ता तू उद्या रथाचे सारथ्य करशील. राजकुमारांची ओळख करुन देशील.सर्व उपस्थितांचा परिचय आहे ना तुला”
“लक्ष्मीमती! तू लहान बहिण आहेस,सुलोचनेची! रथात असशीलच आमच्यासोबत.तुझा शृंगारही काळजीपूर्वक असू दे.सुलोचनेनंतर तुझ्याही विवाहाचा प्रस्ताव आहेच महाराजांपुढे.”
सुप्रभाराणी सर्व गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालत होती.
तिच्या लाडक्या कन्येचे सुलोचनाचे स्वयंवर आयोजित करण्यात आले होते.
भगवान आदिनाथांचा तो काळ होता.सर्वत्र पृथ्वीवर मंगलमय आणि समाधानी वातावरण होते. सर्वत्र अपार संपन्नता होती.सृष्टी सदैव बहरलेली असे.दीनदुःखी ही संकल्पनाच नव्हती.सारेजण आपापसात प्रेमाने राहत होते.आपले नेमस्त कार्य सचोटीने करत असत.
सकाळी प्रातःकालिन कार्य झाल्यावर सारे प्रजाजन,राजघराण्यातील व्यक्ती जिनमंदिरात जात.पूजाविधीनंतर गुरुजनांची आहारचर्या होई. नंतर आपले भोजन करुन सारेजण आपापल्या नेमलेल्या कार्यात,व्यवसायात व्यग्र होत. आदिनाथांनी शिकवल्याप्रमाणे प्रत्येकाची कामे चालत.सांयकाळी सूर्यास्ताआधी व्यवसाय बंद करुन ,आपापल्या सदनी सारे परत येत. सांयकाळचे भोजन झाले की घरोघरी आरती,सामायिक, जिनमंदिरातही आरती होई.नंतर घरी परतून आपापल्या छंदांना,आवडींना वेळ दिला जाई.आजूबाजूचे लोक जमून आपापसात सल्लामसलत होई.एकमेकांशी अनुभवांची देवाणघेवाण होई.
आदिनांथांच्या उपदेशाप्रमाणे समाजव्यवस्था सुखनैव चालू होती.
चहुदिशा प्रमुदित मंगलमय तो चतुर्थकाळ
काशीनगरी पावन तिथे पुण्याचा असे वास,
आदिप्रभुंच्या उपदेशाचे जाणुनिया सार
सुखनैव नांदती सारे जन स्वर्गाचाच होई भास
प्रजेने नगरीला गुढ्यातोरणांनी सजवले होते.त्यांची लाडकी राजकन्या सुलोचनाचे स्वयंवर होते.प्रजाजन उत्साहाने तयारी करत होते.सुलोचनचे हेमांगद,सुकांत ,इ.एक हजार भाऊही या काळात पहिल्यांदाच होणार्या स्वयंवरासाठी उत्सुक होते. सेवकांसोबत स्वतः जातीने लक्ष घालून येणार्या राजकुमारांची व्यवस्था पाहत होते.
वेगवेगळ्या राज्यातील राजकुमार,सेनापती,नगरश्रेष्ठी या स्वंयवरासाठी आले होते.अयोध्या,रत्नपुरी,प्रभासगिरी, हस्तिनापुर,श्रावस्ती,कौशांबी,चंपापुरी,उज्जैनी,काकांदी, राजगृही,इ. ठिकठिकाणचे लोक स्वंयवरासाठी पोचले होते.
गंगातीराजवळ सर्वांसाठी मनमोहक शामियाने उभारण्यात आले होते.सात्विक आणि मिष्ठान्न भोजनाची व्यवस्था सर्वांसाठी सज्ज होती.
संध्याकाळी भोजनपश्चात राजा अकंपन आणि राणी सुप्रभा स्वयंवराच्या तयारीचा आढावा घेत होते.
सांयकाळची आरती,सामायिक,जिनेंद्रआराधना सर्वांनी चैत्यालयात केली होती. सर्वजण आपापल्या दालनात गेले होते.
भगवान आदिनाथांचा तो काळ होता. समाजव्यवस्थेचे मापदंड त्यांच्या उपदेशाप्रमाणे सर्वांनी स्विकारले होते.
स्रियांनी योग्य वयात आल्यावर,मूलभूत शिक्षण पूर्ण झाल्यावरच, त्यांच्या विवाहाचा विचार होत असे.
राजा अकंपनाला सुलोचनेच्या विवाहाचा विचार मनात आला तो दिवस आठवला. तो सुप्रभाशी त्याविषयी बोलायला लागला.
“महाराणी आठवतेय का ?सुलोचना आणि लक्ष्मीमती गुरुकुलातून धार्मिक ,व्यावहारिक आणि शस्त्रविद्येचे यथायोग्य शिक्षण घेऊन सहा मासापूर्वी परतल्या .”राजा अकंपन
“हो ना !बारा वर्षै दोघी राजवैभवापासून दूर होत्या. सामान्य प्रजेप्रमाणे सर्व शिक्षण पूर्ण केले त्यांनी.”सुप्रभाराणी
“त्या आल्या ,तितक्यातच फाल्गुनातील अष्टान्हिका पर्वाची सुरवात होणार होती.सुलोचनेने विधीपूर्वक ते व्रत ग्रहण केले आणि उपास सुरु केले. आर्यिका मातेकडून तिने विधी समजून घेतले होते.रोज सकाळी जिनमंदिरात अभिषेक, पूजाअर्चना,नंतर त्यागींना आहारदान सर्व काही ती विधीवत करत होती.”अकंपन
“हो ना आणि तेही शांतपणे,संयमाने .कसलीही आकुलता नाही.” सुप्रभा
संयमाची,विवेकाची देणगी सुलोचनेला जन्मजातच आहे.मला तिच्या अष्टान्हिका व्रताच्या पारण्याच्या दिवशीच जाणवले की तिच्या विवाहाचा आता विचार करायला हवा.”अकंपन
“हो ना महाराज आणि आपण तिला पारण्यासाठी पाकशाळेत पाठवले. आणि सुमति,श्रुतार्थ,सिध्दार्थ,सर्वार्थ या मंत्र्यांशी आपण खाजगीत चर्चा केलीत.” सुप्रभा
“हो ना जवळजवळ तीन प्रहर आम्ही विचारविनिमय करत होतो.सुमति मंत्र्यांनी सुचविलेला स्वयंवराचा तोड सर्वांना आवडला.पुराणात हा स्वयंवराचा उल्लेख आहे .सुमति मंत्री म्हणाले होते की ,आम्ही राजा अकंपनाने,भगवान वृषभदेव आणि चक्रवर्ती भरताच्या काळात ,जर ही स्वयंवर प्रथेची सुरुवात केली,तर हा त्यांचाही सन्मान ठरेल.आणि कोणतेही राजे ,राजकुमार यांची नाराजी होणार नाही आणि कन्येला ,तिच्या मनाप्रमाणे वर निवडता येईल. म्हणून स्वयंवराचे ठरले.”अकंपन
“बरेच झाले,आता सुलोचनेला योग्य वरप्राप्ती व्हावी हिच इच्छा.”सुप्रभा म्हणाली.
रात्र झाली होती.दोघांनीही नऊ वेळा णमोकार मंत्राच जप केला.यथोचित नियम घेऊन ते निद्रादेवीच्या अधीन झाले.
राजा अकंपन नाथवंशीय होते.न्यायवान आणि प्रजावत्सल होते.सज्जनांसाठी कृपाळु आणि दुर्जनांसाठी काळ होते.प्रजेचे रक्षण आणि शिक्षण यासाठी त्यांचे कररुपात जमा केलेले द्रव्य खर्च होत असे. राजा असूनही ते स्वतःला प्रजेचे सेवक समजत.
हा चतुर्थ काळ होता.मनुष्याचे आयुष्य या काळात कित्येक वर्षांचे असे.मानवी जीवन दीर्घायुष्यी असे.
शय्येवर पहुडल्यावर राजा अकंपनाला मागिल घडामोडी आठवत होत्या.
राजा अकंपनाने मंत्रिमंडळाशी विचारविनिमय झाल्यावर महाला मध्ये येऊन राणी सुप्रभा, आपला ज्येष्ठ पुत्र हेमांगद आणि इतर वरिष्ठ मंडळींना स्वयंवराच्या आयोजनाची कल्पना दिली . त्यांचीही परवानगी घेतली.
राजा अकंपन यांचे पूर्वभवातील भाऊ,विचित्रागंद ,जे आता देव होते, त्यांना सुलोचनेच्या स्वयंवराच्या आयोजनाचे कळले. त्यांचे सुलोचनावर पित्याप्रमाणेच प्रेम होते. त्यांनी येऊन अकंपन राजाची परवानगी घेऊन, सुंदर स्वयंवराच्या मंडपाची रचना केली.
रचना झाल्यावर ते आपला भाऊ अकंपनला म्हणाले,
” या विश्वामध्ये कन्यारत्न सारखे दुसरे रत्न नाही. समुद्र उगाचच स्वतःला रत्नाकर म्हणून आपला मोठेपणा मिरवतो, पण हे राजा अकंपन आणि सुप्रभा! तुमच्याकडे जे हे कन्यारत्न आहे ,त्यामुळे ,तुम्हालाच रत्नाकर पद शोभून दिसणारे आहे.”
अशा प्रकारे कन्यारत्नाचे गुणगान करुन विचित्रागंद देवलोकी निघून गेले.
कन्या वाढवी कुलशोभा दोन कुळांची जाणा
संस्कांराने पवित्र करते सर्व सकलजनांना
शील,गुणांचा अमाप ठेवा असे तिजपाशी
शुभकार्यांना सदैव ती करुनी बांधी पुण्यकर्मांना
स्वयंवराच्या दिवशी प्रातःकाली राजा अकंपन राणी सुप्रभा , सुलोचना, लक्ष्मीमती, हेमांगद आदी राजाचे 1000 पुत्र तयार झाले. अकंपन महाराजांनी स्वतः पंचामृत अभिषेक,जिनेन्द्र देवाची महापूजा केली. यथोचित दानधर्म केला, आणि आपल्या पुत्रीचे स्वयंवर निर्विघ्नपणे पार पडावे, अशी भावना जिनेंद्रचरणी व्यक्त केली.
राणी सुप्रभा ने सुलोचनाला मंगल स्नान करवले.सुवासिक उटणे,गुलाबपाणी साराच थाट होता. आदल्या दिवशी तयारी करून ठेवल्याप्रमाणे, सुलोचना सुंदर वस्त्र व आभूषणे लेवून सुशोभित झाली.
लक्ष्मीमतीही तिच्यासोबतच तयार झाली.यौवनाचे तेज असणार्या दोघीही बहिणी सुंदर दिसत होत्या.
त्यानंतर मनोहर अशा जिनालयात , जिथे रत्नमयी मूर्ती विराजित होत्या, तिथे जाऊन सुलोचनाने जिनेन्द्र देवाचे दर्शन घेतले आणि आराधना केली. हे जिनमंदिर सुलोचनाने गुरुकुलातून आल्यावर विशेष परिश्रम घेऊन,उत्तम कारागिरांकडून तयार करवून घेतले होते.
माता पिता आणि गुरुजन ,तसेच घरातील ज्येष्ठ मंडळी, यांचा आशीर्वाद घेऊन, देवनिर्मित रथामध्ये ,णमोकार मंत्राचे ध्यान करत सुलोचना आरुढ झाली. त्या रथाचे सारथ्य तिची सखी महेंद्रदत्ता करत होती आपल्या सखीचा विवाह होणार याचा आनंद तर होताच , त्याचबरोबर आता आपली सखी दुसऱ्या कोणाची ठेव होणार याची हुरहुरही वाटत होती.
थोड्याच वेळात रथ स्वयंवर मंडपात पोहोचला.
स्वयंवरासाठी सर्वतोभद्र नावाचे राजभवन तयार करण्यात आले होते.त्याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेकडे होते.त्यावर रत्नजडित तोरणे होती.फुलमाळाही सजवण्यात आल्या होत्या.
स्वयंवर मंडप भव्यदिव्य होता, विस्तीर्ण होता. छोट्या छोट्या कक्षांमध्ये, एक एक राजा आणि त्याच्या सोबत त्यांचे प्रियजन अशी व्यवस्था करण्यात आलेली होती. गालिचे,सिंहासनाने प्रत्येक कक्ष सुसज्जित होता.
वेगवेगळ्या राज्याचे देशोदेशीचे अनेक राजे, राजकुमार, सेनापती, नगरश्रेष्ठी या काळात प्रथमच होणाऱ्या स्वयंवरासाठी उपस्थित होते. सर्वांच्या मनामध्ये सुलोचना कोणाला वरणार याविषयी उत्सुकता होती.
सुलोचना विनयाने प्रत्येक राजाची माहिती ऐकत होती. त्यांचे गुणगान ऐकत होती आणि पुढे पुढे जात होती.
सुरवातीच्या कक्षातच भरत चक्रवर्तीचा पुत्र ,अर्ककिर्ती आलेला होता. देखणे रूप ,अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि पराक्रम त्यामध्ये पारंगत असणारा अर्ककिर्ती सुलोचनासाठी सर्व तर्हेने योग्य आहे असे सर्वांना वाटत होते. सुलोचनाने विनयाने अर्ककीर्ती कडे बघितले, त्याची प्रशांसा ऐकली.अर्ककिर्तीलाही,सुलोचना आपल्याला वरमाला घालेल असे वाटत होते. सुलोचनाचे शालीन, सुंदर ,बुध्दीमत्तेचे तेज असणारे देखणे रूप कोणालाही भुरळ पाडेल असेच होते.
पण गळ्यात वरमाला न घालता ती तशीच पुढे सरकली. अनेक राजे, सेनापती यांची माहिती ती ऐकत होती आणि पुढे पुढे जात होती.
प्रातःकालीन मंगलमय वेळ आजूबाजूला निनाद करणारे, सनई-चौघडे मंगलमय वातावरण देणारे .एकेका राज्याची, राजकुमाराची व्यवस्थित माहिती, घेत घेत राजकूमारी पुढे पुढे जात होती. अजूनही तिला आपल्या जन्मोजन्मीच्या जोडीदाराची खूण पटत नव्हती.
“तुला ज्याचे यश ,किर्ती,रुप योग्य वाटेल त्या व्यक्तीशी ,तू तुझी विवाह गाठ बांध. त्याच्याच गळ्यात स्वयंवराची माला टाक .”,असे स्वातंत्र्य तिला तिच्या मातापित्यांनी आणि घरातल्या ज्येष्ठांनी दिले होते. त्यामुळे योग्य निवड करण्याची जबाबदारीही सुलोचनेवर होती.
असेच पुढे जात जात ,सखी एका राजा पुढे थांबली आणि त्याची माहिती सांगायला लागली.
“राजकन्या सुलोचना !हे हस्तिनापूरचे राजा सोमप्रभ यांचे सुपुत्र ,जयकुमार.भगवान आदिनाथ यांना आहार दान देणाऱ्या राजा श्रेयांस आणि राजा सोमप्रभ या दोन भावांची किर्ती अखिल विश्वात आहे. अशा या धार्मिक आणि शूर घराण्यातले हे राजकुमार. ह्या राजकुमारांच्या पराक्रमाची कीर्ती ,एका वाक्यातच मला सांगता येईल की, हे भरत चक्रवर्तींच्या सेनेचे सेनापती आहेत. चक्रवर्तींच्या दिग्विजयाच्या मोहिमेमध्ये जयकुमार यांनी महत्वाची भूमिका निभावलेली आहे. आणि ‘सेनापती रत्न ‘या पदवीने विभूषित, भरत चक्रवर्तींच्या 14 रत्ना पैकी एक रत्न म्हणजे राजकुमार जयकुमार आहेत.”
सुलोचनेने मान वर करून जयकुमारांकडे बघितले आणि मनामध्ये झंकार निनादले. आपल्यासाठी यांची निर्मिती झालेली आहे, याची तिला मनातून उर्मी दाटून आली. खूण पटलेली होती. तिने क्षणभर आजूबाजूला असणारे आपले भाऊ ,माता-पिता आणि घरातील ज्येष्ठ मंडळी यांच्याकडे नजर फिरवली आणि जयकुमार यांच्या गळ्यात वरमाला घातली.
सोमवंशी जयकुमार शोभे सुलोचनाला
नाथवंशीय राजकुमारी सज्ज विवाहाला
यशकिर्ती अन् रुपगुणांचा संगम हा होता
स्वयंवराचा अनुपम सोहळा भूवरी झाला
वाद्यांचा आणि टाळ्यांचा गजर झाला. गुणवान, रुपवती धार्मिक अशा सुलोचनेला योग्य जोड मिळाली, असेच सूर स्वयंवर मंडपातून ऐकू येत होते .
नाथवंशीय सुलोचना आणिसोमवंशीय जयकुमार यांचा जयजयकार प्रजाजन करत होते.
काही राजांना ,ज्यांना तिने निवडले नाही ,त्यांना मनातून दुःख झाले होते, परंतु तरीही सुलोचना साठी जयकुमार योग्य जोड आहे ,याची जाणीव मनात कुठेतरी झाली होती. त्यामुळे त्यांनी सुलोचनाच्या निवडीला अनुमोदना दिली.
पण त्याचवेळी भरत चक्रवर्ती यांचा पुत्र अर्ककीर्ती, जो ह्या समारंभाला उपस्थित होता, त्याला मात्र आपला क्रोध आवरेना. त्यातच काही विशिष्ट मित्रांनी आणि स्वयंवराला जमलेल्या इतर नाराज राजकुमारांनी आणि सेनापतींनी त्याच्या क्रोधाला वाढवण्याचे काम केले. दूर्मषण नावाच्या एका सेवकाने, अर्ककीर्तीला युध्द करण्यासाठी उद्युक्त करण्याचे कार्य केले.त्यामुळे अर्ककिर्ती, राजा अकंपना सोबत युद्ध करण्यासाठी तयार झाला आणि त्यांने दूतांकरवी राजा अकंपनाला युद्धाचा संदेश पाठवला.
राजा अकंपन आणि राणी सुप्रभा आपली पुत्री सुलोचनाला, योग्य वरप्राप्ति झाल्याच्या आनंदात राजमहालात परत आले होते .तितक्यातच अर्ककिर्तिचा हा युध्दसंदेश येऊन धडकला. आपल्या राज्यावर आणि प्रजेवर, हे कुठले भलतेच संकट आले यामुळे राजा अकंपन विचलीत झालले. आता पुढे काय करायचे याविषयी आपले पुत्र,मंत्रीगण,आणि होणारे भावी जामात , जयकुमार यांच्याशी चर्चा करणे सुरु झाले
अर्ककिर्तीकडून युद्धाचा संदेश आला आणि राजा अकंपन विचारमग्न झाले एकीकडे कन्येचा विवाह ठरल्याचा आनंद आणि दुसरीकडे हे युद्धाचे सावट. खरेतर राजा अकंपन यांचा प्रयत्न युद्ध न होता सामंजस्याने प्रत्येक समस्या सुटावी,असा असे. त्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत.
अर्ककीर्ती कडून जी युद्धाची ललकारी आली होती, त्याला उत्तर देणे भाग होते, पण तरीही शांततेने हा प्रश्न सुटतो का? याविषयी विचार करण्याचचे ठरलले.
मंत्री, सेनापती,अकंपन राजाचे पुत्र,आणि इतर ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींची सभा सुरु झाली. त्याकाळी स्त्रियाही अशा परिस्थितीत सभेला उपस्थित असत. त्यांच्या बोलण्याचा मानही राखला जात असे. स्रियांनीही युध्दकलेचे शिक्षण घेऊन त्यात प्राविण्य मिळवलेले असे.
प्रत्यक्ष युध्दातही स्त्रिया सहभागी होत.युध्दभूमीवर पराक्रम गाजवत.
मंत्री सुमती म्हणाले ,”आपण आपल्याकडून एखाद्या जबाबदार व्यक्तीला दूत म्हणून पाठवूया आणि अर्ककीर्ती महाराजांना ,युद्ध टाळण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न करूया.
मंत्री सिद्धार्थने ही याला अनुमोदना दिली ते म्हणाले ,” आपण अशा प्रकारची युध्दावस्था येऊ नये म्हणूनच सुलोचनाचे स्वयंवर ठरवले, की जेणेकरून एका व्यक्तीशी विवाह झाल्यास ,त्याविषयी इतरांच्या मनात गैरसमज असू नयेत.पण तरीही ही समस्या निर्माण झालीच आहे.”
जयकुमार विनयाने म्हणाले ,”महाराज हे युद्ध टाळणे सर्वतोपरी हितकारक आहे ,कारण मी भरत चक्रवर्तीचा सेनापती आहे. चौदा रत्नांपैकी एक आहे आणि मी राजकुमार अर्ककिर्तीशी युद्ध करणे योग्य ठरणार नाही.”
सर्वांपुढे येत युद्ध कसे टाळायचं हा यक्ष प्रश्न उभा होता.
युध्द नको, हिंसाही नको,नको वैरभाव
अहिंसा असे परमोधर्म सत्य हेच जाणुया
दूताकरवी आपण अर्ककिर्तिस समजावुया
चक्रवर्तीच्या पुत्रासोबत प्रेमभाव वाढवुया
त्यावेळी अकंपननाचे जेष्ठ पुत्र हे हेमांगद म्हणाले,”मी स्वतः महाराजांना भेटायला जातो आणि हे युद्ध टाळता येतं का? शांततेच्या मार्गाने ते बघतो.आम्ही गुरुकुलात एकत्र शिकत होतो. मैत्रीच्या मार्गाने तोड निघते का? ते पाहतो.”
हेमांगद सर्व कला, व्यावहारिक ज्ञान,युध्दकला, तसेच राजकारण ,युद्धनीती सर्व कलांमध्ये पारंगत होते, त्यामुळे दूत म्हणून ते अर्ककर्तीकडे गेले तर, योग्य संभाषण करून यातून नक्की मार्ग निघेल आणि युद्ध टळेल असा सर्वांना विश्वास वाटत होता, त्यामुळे सर्वांनी हेमांगदला, दूत म्हणून शांततेचा प्रस्ताव घेऊन,जाऊ देण्याचे मान्य केले आणि हेमांगद लगेच अर्ककिर्ती कडे शांतता प्रस्ताव घेऊन निघाला.
हेमांगद अर्ककीर्ती राजकुमारांकडे पोहोचला.” स्वयंवरामध्ये सुलोचनाने, स्वतःच्या मर्जीने स्वतःचा वर निवडलेला आहे, आणि तो तिचा निर्णय सर्वांना मान्य आहे. सुलोचनानेने , आपणाला निवडले नाही, त्यामुळे आपली यश कीर्ती कोणत्याही प्रकारे कमी आहे, असे आपण मानू नये. आपण साक्षात भरत चक्रवर्तीचे पुत्र आहात.पराक्रमी आहात,विवेकी आहात. विवाह ही मनामनामध्ये जुळलेली गाठ असते, कोणाची जबरदस्तीने जुळवता येत नाही.युध्दामुळे सर्वांचीच हानी होईल. एका स्त्री साठी हे युद्ध होऊ नये.”
“मला सुलोचनाशी काहीच घेणेदेणे नाही.मला अभिमानी आणि द्वेषी जयकुमाराचे प्राण हरण करायचे आहे. मग विधवा सुलोचनाशी माझे काहीच संबंध नाही.” अर्ककिर्तीने असे बोलून सेनापतींना युध्दाची तयारी करायला सांगितली.
नाना प्रकारचा युक्तिवाद करून हेमांगदाने, हे युद्ध होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केला.
पण अर्ककिर्तीच्या, डोळ्यावर त्या वेळी क्रोधाचा,द्वेषाचा पडदा होता. इतर कुठला नीती मार्गाचा आणि विवेकी कसलाही विचार त्यावेळी मनात येत नव्हता.पापकर्माचा उदय त्यावेळी आलेला असावा.त्यामुळे फक्त एकच ध्यास, फक्त युद्ध, युद्ध आणि युद्ध .
येता कर्मगतीचा फेरा उदयाला
पापपुण्य अन् विवेक जाई लयाला,
क्षुद्र मनाचा,क्रोधी विचार पकड घेई
कोण असे सक्षम त्याला समजवयाला
हेमांगदाचा युक्तिवाद सफल झाला नाही. अकंपन राजाला युद्ध नको होते पण आता नाईलाजाने युद्ध करावे लागणार होते.
अर्ककीर्ती आणि त्यांचे राजे मित्र यांची विशाल सेना होती. या तुलनेमध्ये अकंपन राजाचे सैन्य आणि जयकुमार यासोबतच सैन्य एकत्र आले,तरीही त्यांना तोंड देऊ शकणार नव्हते. अशावेळी पुढे काय करायचं हा यक्षप्रश्न उभा राहिला.
या सर्व घडामोडी आणि चर्चा, यामध्ये सुप्रभाराणी
लक्ष्मीमती, सुलोचना व इतरही मंत्र्यांच्या स्त्रिया , राजपुत्रांच्या पत्नी सामील होत्या. त्याकाळी स्त्रियांनाही अशाप्रकारे राजघराण्यातील सर्व चर्चांमध्ये ,समस्यांमध्ये मोकळेपणाने मत मांडण्याचं स्वातंत्र्य होतं,याचा उल्लेख केलेलाच आहे.त्या युध्दकलेतही पारंगत होत्याच.
साक्षात आपल्या स्वामींच्या भरत चक्रवर्तींच्या पुत्राशी,
अर्ककिर्तीशी युद्ध करावं लागणार, म्हणून जयकुमार विचलित झाले होते ,पण शेवटी न्यायाच्या बा
जूची साथ, द्यावी लागणार होती, त्यामुळे युद्ध करायचे हे नक्की ठरले.
अकंपन राजाला खरंतर खात्री होती की अर्ककिर्ती कधीही न्यायमार्गाचा त्याग करून ,अनितीच्या मार्गावर वळणार नाही.कारण साक्षात भरत चक्रवर्तीचा तो पुत्र आहे.भगवान आदिनाथांचा पौत्र (नातू)आहे. परंतु अर्ककिर्ती, पूर्ण शक्तीनिशी युद्धाची तयारी करत आहे हे गुप्तचरांनी सांगितले. आणि कर्मोदय कोणालाच चुकत नाही,याची जाणीव अकंपन राजाला झाली.
स्वंयवर झाल्यावर काही राजांनी आपापल्या राज्याकडे प्रयाण करण्याची तयारी केली होती. परंतु अर्ककिर्तीचा युद्धाचा अविचार कानी येताच, त्यांनी आपला पाठिंबा राजा अकंपन याला घोषित केला, आणि तेही जयकुमारा सोबत, अर्क कीर्तीच्या विरोधात लढण्यासाठी तयार झाले.
जयकुमार यांनीही या वेळेला आपल्या सहज, विवेकी शैलीमध्ये राजा अकंपन यांना धीर दिला आणि या युद्धामध्ये विजय न्यायाच्या बाजूने होईल याविषयी खात्री दिली.
शत्रुपक्षाचे बल जास्त असल्याचे जाणीव सगळ्यांना होती. त्यावेळी राणी सुप्रभा म्हणाली,
” महाराज आपण काळजी करू नका. आपले जेवढे सैन्यबळ आहे त्याच्या दुप्पट होईल.”
” कसे बरे?” अकंपनाने विचारले.
” आपल्या काशी राज्यातील स्त्रियाही युद्ध कलेत पारंगत आहेत. आपण फक्त आज्ञा द्या. सर्व स्त्रिया शस्त्र घेऊन युद्धभूमीवर येतील, आणि आपले बळ वाढेल .”सुप्रभाराणी म्हणाली.
राजा अकंपनला सुप्रभाराणीचे म्हणणे पटले आणि त्याने स्त्रियांनीही या युद्धात सहभागी व्हावे ,म्हणून आज्ञा केली.
पण त्याचबरोबर सुलोचनेच्या सुरक्षिततेचीही त्यांना काळजी वाटत होती.
सुप्रभा आणि सुलोचनाही युध्दभूमीवर जाण्यासाठी सज्ज झाल्या.
पण राजा अकंपन थोडा विचार करुन सुप्रभा राणीला म्हणाले, म्हणाले,” हे प्रिये सुप्रभा तू सध्या युद्धाचा विचार करू नकोस. तू सुलोचनाच्या रक्षणाचा विचार कर. या युद्धाच्या काळामध्ये ,जर सुलोचनाचे शत्रू पक्षाने अपहरण केले, तर आपल्यासाठी ते लज्जास्पद ठरेल. त्यामुळे सुलोचना! हे पुत्री! तू आपल्या मातेसोबत आपल्या महालाच्या मागच्या जिनमंदिरात, जाऊन जिनपूजा आणि आराधना कर.”
जिनअर्चना वंदना अन् पूजा
करा मनोभावाने
कर्मउदय क्षीण होण्यास करा
भक्ती स्तुतीसुमनाने
“पिताश्री या युद्धाच्या काळामध्ये, तुमची आज्ञा असेल तर या आपत्ती कालामध्ये मलाही युद्धभूमीवर यावसं वाटतं. कारण तुम्ही मला जी युद्ध कला शिकवली आहे , त्याची परीक्षा या काळातच होईल ना.”सुलोचना विनयपूर्वक म्हणाली.
“तुझं म्हणणं खरं असलं तरी, या प्रसंगी तू युद्धभूमीवर जाणं योग्य नाही. कारण शत्रूने तुझे हरण केले ,तर ती गोष्ट आपल्या कुळासाठी लांच्छनास्पद ठरेल. तू जिनमंदिरामध्ये जा आणि जिनेन्द्र भगवंतांची आराधना कर. पूजा कर. जिनभक्तीने,णमोकाराने, आपल्यावरचा संकट दूर होईल. जिनेंद्रभक्तीने पापकर्मचा नाश होऊन, पुण्यकर्माचा उदय होतो. हे शास्त्रसंमत आहे, त्यामुळे, यावेळी तू जिन मंदिरामध्ये जिनेन्द्र साधनेत, मन लावून लीन हो. आपली बाजू न्यायाची आहे ,त्यामुळे विजय आपलाच होणार आहे.पण कमीत कमी हानी होण्यासाठी तू प्रार्थना कर.”राजा अकंपनाने समजावले.
पण त्याचवेळी राज्यातील इतर स्त्रिया मात्र, आपला सैनिकी वेश धारण करून, सैनिकांमध्ये सामील झाल्या. त्यामुळे अकंपन राजाची सैन्य संख्या दुप्पट झाली.
जय कुमार युद्धासाठी आपल्या विजयार्द्ध नावाच्या हत्तीवर स्वार झाले.
सुकेतू ,सूर्यमित्र ,श्रीधर ,जयवर्मा, देवकीर्ती ,इत्यादी अनेक राजपुत्र सेनेसहित जयकुमार याच्यासोबत सामील झाले. जयकुमार यांनी आपल्या सैन्याची रचना मकराकार म्हणजे मगराच्या ,आकाराची केली होती. अर्ककिर्तीने आपल्या सेनेला चक्रव्यूहातले रूप दिले.
दोन्हीकडून हत्तीसोबत हत्ती, घोडे घोड्यासोबत ,सैनिक सैनिकांसोबत लढायला सुरवात झाली. खूप सैनिक घायाळ झाले. काहींनी अंतसमय जाणून, पंचपरमेष्ठींचे स्मरण करून, उत्तम गतीला प्राप्त केले. आचार्य म्हणतात, आयुष्याच्या शेवटी कोणाचा क्रोधरागद्वेष नाश झाला आणि पंचपरमेष्ठीच्या स्मरणात चित्त लीन झाले,जीवाने धर्म ध्यान करायला सुरुवात केली तर, त्याला शुभ गती नक्कीच प्राप्त होते.
युद्ध सुरु होते. सायंकाळ झाली आणि दोन्हीकडच्या ज्येष्ठ मंडळींनी समजावले की रात्री युद्धाचा आपल्याला निषेध आहे. त्यामुळे आपण आता या युद्धाला विराम देऊ आणि उद्या सकाळी पुन्हा प्रारंभ करू.
दोन्हीकडचे वीर ,आपापल्या छावणीत परतले. सैनिकांच्या स्त्रियाही- पत्नी, सोबत असल्यामुळे रात्रीच्या वेळी आपल्या पतीचे मनोबल वाढविण्याचे महत्त्वाचे कार्य, त्यांनी रात्री केले. सकाळ झाली सूर्य पूर्व दिशेला उगवला इकडे सर्व सेनेतील नरनारी भगवत भजनात तल्लीन झाले.प्रातकाली सामायिक आणि प्रभुचिंतन, स्नानादी भोजन ,नित्यकर्मे, पूजन आदी धर्मा ध्यान झाल्यानंतर दोन्ही पक्ष युद्धासाठी सज्ज होतात.
दुसऱ्या दिवशी जयकुमार पांढऱ्या घोड्यांच्या रथामध्ये आरूढ होते. त्या रथावर हत्तीचे चिन्ह होते. अर्ककीर्ती काळ्या घोड्यांच्या रथावर होते. त्यांच्या रथावरचे चिन्ह चक्र होते.
अर्ककीर्तीने वेगाने येऊन, जयकुमाराच्या रथावरच्या चिन्ह,ध्वजा आणि घोडे यांना छेद दिला, आणि इजा पोहचवली.
त्याच वेळेला जयकुमार यांना ,त्यांनी काही देवांवर केलेल्या उपकारांमुळे , देवांनी भेट दिलेले नागपाश आणि अर्धचंद्र, या शस्त्रांविषयी स्मरण झाले .
जयकुमारांनी ,अर्ककिर्तीवर , त्या शस्त्रांनी वार केला आणि नागपाशामध्ये ,अर्ककिर्तीला, बांधून घेतले. त्याच क्षणी युद्ध थांबले. स्वर्गातून देव लोकांनी पुष्पवृष्टी केली. आणि सैनिकांनी जयकुमार यांच्या नावाचा ,जयजयकार करुन युध्द थांबवले.
न्यायाचा विजय झालेला बघून काशी नगरीमध्ये आनंदोत्सव झाला. नागरिकांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले. जणु अश्रू रुप मोत्यांची ,प्रजा राजा अकंपनाला ,भेट देत होते. सर्व नगर जन आणि सैनिक आनंदाने जिनमंदिराकडे दर्शनाला , वंदन करायला पोहोचले.
हर्षोल्हासे निघती प्रजाजन राजमहालाला
प्रभुकृपेने कृतार्थ वाटे भक्तांच्या ह्रदयाला
विघ्न होता दूर करती ,अष्टद्रव्य पूजेला
मंगल गायन करत निघाले जिनेंद्रवंदनेला
राजमहालाच्या आतील हे जिनमंदिर अत्यंत दर्शनीय होते. अरिहंत भगवंतांच्या कृपेने, सर्व विघ्न दूर झालेले आहे. असा नागरिकांना विश्वास होता.
हे जिनमंदिर राजमहालमध्ये होते आणि खूप विस्तीर्ण व दर्शनीय होते.मंदिराची रचना रत्नजडित होती आणि रत्नांच्या मूर्ती होत्या.
याच मंदिरामध्ये युद्धाला आरंभ झाला तेव्हापासून,सुलोचना सर्व प्रकारच्या आहाराचा त्याग करून, ध्यान आणि पूजेमध्ये मग्न होती. तिथे येऊन राजा अकंपनाने युद्ध समाप्तीची घोषणा केली. ते म्हणाले,” हे पुत्री! तुझ्या भक्तीचा महात्म्याने सर्वमंगल झालेले आहे. राजकुमार जय येथे उपस्थित आहेत. अन्यायी अर्ककीर्ती बंधनात बांधल्या गेलेला आहेत. आपली सर्व सेना क्षेम आहे. शत्रुसेनेने पलायन केलेले आहे.”
त्यानंतर अकंपन राजा आणि जयकुमार स्नानादि करुन ,शुध्द वस्त्रे नेसून जिनेंद्रपूजा करतात.
नंतर सुलोचनासहीत राजभवनात येतात. सुलोचनाने त्या दिवशीही उपवास ठेवला ,आणि म्हटले
” अर्ककीर्ती भरत चक्रवर्ती यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यामुळे त्यांना बंधन मुक्त करावे आणि त्यांना प्रेमाच्या बंधनात बांधून घ्यावे.”
सुलोचनाचे विवेकी बोलणे ऐकून अकंपन राजा आणि जयकुमार दोघेही प्रसन्न होतात.
तिचा सल्ला प्रमाण मानून राजा अकंपन अर्ककिर्तीला, बंधनातून मुक्त करतात आणि राज्यसभेत बोलावून यथायोग्य सिंहासन देतात.
अर्ककीर्तीजवळ अकंपन क्षमायाचना करतात.
ते अर्ककिर्तींना प्रार्थना करतात,
“सुलोचनाला योग्य वर जयकुमार मिळालेला आहेत,
पण माझी आपल्याला विनंती आहे की, माझी कनिष्ठ कन्या लक्ष्मीमती हिचा आपण स्वीकार करावा ,तिच्याशी विवाह करून आमच्या घराण्याची नाते जोडावे,आणि हे वैर संपवावे. जिनेन्द्र देवांच्या कृपेने युध्द लवकर संपले आणि फारशी हानी झालेली नाही. खरे तर आपल्या स्वामींच्या पुत्राशी, लढण्याची वेळ आमच्यावर आली, याविषयी आम्हाला खेद वाटतो, परंतु शेवटी कर्मउदय, मोठा बलवान असतो. आपल्या बुद्धीला भ्रष्ट करुन, त्यानेच न्याय मार्गापासून आपणास विचलित केले होते. रीतीप्रमाणे स्वयंवरांमध्ये कन्या स्वतः वर निवडू शकते, तिला विरोध करण्याचा कोणालाही अधिकार नाही. जे झाले ते झाले. आपण आता आमचे अपराध क्षमा करावेत आणि पूर्ववत कृपादृष्टी ठेवावी.”
राजा अकंपनांचे असे बोलणे एकूण राजकुमार अर्ककीर्ती लज्जित झाला.
“आमच्यातील वयोवृद्ध सेनापतींनी हे युद्ध न करण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्यांचा सल्ला न ऐकता मी युद्ध केले आणि मला लज्जित व्हावे लागले .आपले संबंध पुन्हा पूर्ववत असतील. याविषयी कोणतीही शंका मनात घेऊ नका.आपल्या कन्येशी विवाह हा माझा सन्मान असेल.”अर्ककिर्तीने ने असे बोलून महाराज अकंपनांकडे क्षमायाचना केली.
कर्मगतीचा फेरा येता बुध्दी भ्रष्ट झाली
सारासार विचाराची शक्ती नष्ट झाली
क्षमायाचना मनापासूनी दुष्ट कर्म माझे
विसरुनी जावे आता जीवनी शुभघडी आली
दुसर्या दिवशी, महाराज अकंपन सर्वांना घेऊन नित्य मनोहर जिनालयात गेले ,तिथे अष्टद्रव्याने, भक्तिभावाने, शुद्ध वस्त्र नेसून ,जिनेन्द्र भगवंतांची पूजा केली. कर्मनिर्जरा करण्यासाठी वारंवार स्तुती करून, आपल्या पापांना शांत केले.
त्या दिवशीही या दोघांनी ,अकंपन आणि सुलोचनाने उपवास ठेवला. दुसऱ्या दिवशी प्रातःकाली नित्य कर्म करून ,सुपात्र दान देऊन महाराजा अकंपनाने, कन्या सुलोचनासहित पारणे केले. अर्ककिर्ती, जयकुमार यांच्यासोबत भोजन केले. सर्व परिवारजनांमध्ये आनंद पसरला.
त्यानंतर महाराजा अकंपनांनी आठ दिवसाची एक मोठी पूजा,सिध्दचक्र विधान आयोजित करण्याची घोषणा केली. आणि त्यासाठी राज्यभर उत्सव सुरु केला. त्याची तयारी व्हायला लागली या महापूजेनंतर जयकुमार आणि सुलोचना आणि राजकुमार अर्ककीर्ती आणि लक्ष्मीमती यांचा विवाह करावा असा त्यांचा मानस होता.
सिद्धचक्र विधान खूप आनंदात पार पडले. 1008 इद्रइंंद्रायणीच्या जोड्यांनी मिळून या विधानात भाग घेतला होता. सर्व प्रजाजनांनी पूजेच्या काळात ,आपापल्या कुवतीनुसार एकासन, उपवास ,काही रसांचा त्याग अशा पद्धतीने ,आपली कर्मनिर्जरा, युद्धामध्ये झालेल्या जीवहिंसेचे, पापक्षालन व्हावे, यासाठी मनापासून ध्यान केले.
पूजा झाल्यानंतर अकंपन राजाने कन्यांच्या विवाहाविषयी ठरवले. राजघराण्यातील जेष्ठ श्रेष्ठ मंडळी, राणी आणि आपले मंत्रीगण, पुत्र ,पुत्रवधू या सर्वांसोबत विचारविनिमय झाला.
अर्ककिर्ती चक्रवर्ती यांचे पुत्र आहेत, त्यामुळे त्यांचा विवाह आधी व्हावा असे सर्वांचे म्हणणे पडले. जयकुमार आणि सुलोचना यांचा विवाह त्यानंतर काही दिवसांनी करता येईल, अशा सूचना अकंपन राजाला करण्यात आली.
अकंपन राजालाही चक्रवर्तीचा पुत्राचा विवाह आधी व्हावा, हे म्हणणे पटले आणि काशी नगरीमध्ये तयारी सुरू झाली लक्ष्मीमती आणि अर्ककीर्ती यांच्या विवाहाची.
चक्रवर्तींच्या पुत्रासोबत राजकन्येचा विवाह! काशीनगरी मध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. नवीन वस्त्रे आभूषणे यांनी राजघराण्यातल्या स्त्रिया तर सुशोभित होत होत्याच, पण प्रजाजनही यानिमित्ताने आनंदोत्सव करत होते.पक्वांनांचे बेत भोजनासाठी आखले जात होते.
काशीनगरी ला सुवर्ण मंडप, रत्नजडित तोरणे अशा विविध तर्हेने सुशोभित करण्यात आले. सुंदर सडा- रांगोळ्यांनी काशीनगरी सजली.
जिनेन्द्र भगवंतांच्या पूजनाने आणि जैन विवाह विधीच्या आधाराने, लक्ष्मीमती आणि अर्ककिर्तीचा विवाह संपन्न झाला. विवाहाच्या निमित्ताने राजा अकंपन आणि राणी सुप्रभाने यथोचित, दानधर्म केला. लक्ष्मीमती आणि अर्ककीर्ती यांना, खूप सार्या भेटवस्तू ,वस्त्रे ,आभूषणे यांच्या भेटी देऊन विवाह साजरा केला.
विवाह झाल्यावर अर्ककीर्तीने आणि लक्ष्मीमतीने काशीनगरी चा निरोप घेतला आणि अयोध्येकडे मार्गक्रमण केले.
कन्याधन हे परक्याचे
द्यावे ज्याचे त्याला
राजा असला तरीही
कर्म चुकेना त्याला
अयोध्येमध्ये सारे प्रजाजन भरत चक्रवर्तीच्या ज्येष्ठ पुत्राची आणि नविन राणीची वाट बघत होते.
अयोध्येमध्ये अर्ककीर्तीचे आणि राणी लक्ष्मीमतीचे उत्तम स्वागत झाले .प्रजाजनांनी नगरीला, आपल्या नवीन राणीसाठी सुंदर सजवले होते. भरत चक्रवर्तीने ,आपल्या पुत्राचे आणि आपल्या पुत्रवधूचे स्वागत केले. त्यांना आशिर्वाद दिला.
काशीनगरीतला वृतांत, भरत चक्रवर्तींनी ज्ञात होताच, त्यावर फारशी चर्चा न करता, अर्ककीर्ती ,भरत चक्रवर्ती आणि सारे जण आपले नित्यनैमित्तिक कार्य करायला लागले.
लक्ष्मीमतीचा विवाह संपन्न झाला. ती अर्ककीर्ती सोबत अयोध्येच्या दिशेने ,मार्गक्रमण करायला लागली. त्यानंतर राजा अकंपनांना सुलोचनाच्या विवाहाची ही ओढ लागली. कन्यारत्न योग्य हाती सुपूर्द केलं, की माता-पित्यांना कृतकृत्य झाल्याचा अनुभव येतो.
जयकुमारांच्या विवाहासाठी हस्तिनापुरी निमंत्रण पाठवण्यात आले.
लक्ष्मीमतीच्या विवाहानंतर एक मासाने सुलोचनाचा विवाह करण्याचे निश्चित झाले, आणि प्रजाजन त्या तयारीला लागले.
अर्ककीर्तीशी झालेल्या युद्धामुळे भरत चक्रवर्ती आपल्यावर नाराज झाले असणार, या शंकेने राजा अकंपन ग्रस्त झाले. आपल्या जेष्ठ मंत्रिमंडळाशी याविषयी त्यांनी विचारविनिमय केला ,आणि आपल्या या युद्धाच्या कृतीविषयी भरत चक्रवर्तींकडे क्षमायाचना करण्याची इच्छा प्रदर्शित केली.
सर्वानुमते सुमुष नावाचा दूत जो चातुर्यात,वाक् कलेत पारंगत होता त्याला भरत चक्रवर्तींकडे क्षमासंदेश घेऊन पाठविण्याचे ठरले.
सुमुष अकंपन राजाचा दूत म्हणून अयोधानगरीला पोचला. भरत चक्रवर्तींच्या राज्य दरबारामध्ये या दुताचे यथायोग्य स्वागत झाले.
भरत चक्रवर्ती यांच्या दरबारामध्ये अकंपन राजांविषयी खूप मोठा आदर होता. त्यामुळेच हे स्वागत झाले. त्याला बसण्यासाठीआसन देण्यात आले सुमुषाने आदराने आसन ग्रहण केले आणि नंतर उभे राहून भरत चक्रवर्तींकडे प्रार्थना केली.
“अकंपन महाराजांना, परिस्थितीमुळे अर्ककीर्ती राजकुमारांशी युद्ध करावे लागले, याविषयी राजा अकंपन यांना, अपराधी वाटत आहे. त्यांनी त्यांच्या या कृतीसाठी आपल्याकडे क्षमायाचना केली आहे. आणि यासाठी आपण काही यथायोग्य दंड त्यांना दिला ,तर तो दंड भोगण्याची त्यांची तयारी आहे. अकंपन महाराजांचा हा विनय संदेश घेऊन मी आपणाकडे आलेलो आहे.”सुमुष दूत विनयाने म्हणाला.
दूताचे बोलणे ऐकून भरत चक्रवर्ती गद्गगदित झाले. भरत चक्रवर्ती म्हणाले,
“खरेतर अर्ककीर्तीची चूक होती. स्वयंवराच्या प्रथेमध्ये त्यांने बाधा आणणे योग्य नव्हते, तरी त्याने त्यामध्ये विघ्न आणून स्वयंवरातील कन्येच्या मताचा आदर न करता, काही लोकांचे बोलणे ऐकून,अकंपन राजांशी युद्ध केले. खरतर चूक अर्ककीर्तीची होती. यासाठी राजा अकंपन यांनी खेद व्यक्त करण्याची काहीच गरज नाही. ”
“तरीही आमचे महाराज अकंपन यांना झालेले युद्ध आणि अर्ककीर्तीना त्यामुळे जी मानहानी सोसावी लागली त्या विषयी वाईट वाटत आहे.”सुमुष.
“त्यासाठी त्यांनी वाईट वाटून घेण्याची काहीच गरज नाही अर्ककीर्तीच्या अहंकाराला जागेवर आणण्यासाठी जयकुमारासारख्या माझ्या सेनापति रत्नाचीच, आवश्यकता होती. जयकुमार यांनीही अर्ककीर्तीशी युद्ध करून त्यांना वठणीवर आणले, यात काहीच वाईट केलेले नाही. उलट न्यायाच्या बाजूची साथ देऊन त्यांनी धर्मरक्षण केलेले आहे.
जयकुमार किंवा राजा अकंपन या दोघांविषयी कोणत्याही प्रकारचा रागद्वेष माझ्या मनात नाही. राजा अकंपनांनी ,माझ्या पुत्राला दंड न करता ,स्वतःची दुसरी मुलगी देऊन, त्याचा सन्मान केला यासाठी मी सदैव राजा अकंपनांचा कृतज्ञ असेन.” भरत चक्रवर्तींचे न्यायपूर्ण बोलणे ऐकून सुमुष निश्चिंत झाला आणि भरत चक्रवर्तीचा निरोप घेवून काशी नगरीला परतला. अर्थातच भरत चक्रवर्तींनीही राजा अकंपनासाठी, यथोचित भेटवस्तूही सुमुष दुतासोबत पाठवल्या होत्या. तसेच सुलोचना आणि जयकुमार यांच्यासाठीही आशीर्वचन, त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभचिंतन पाठवले.
भरत चक्रवर्तीन कडून परत आलेल्या दुताचे आश्वासन पूर्ण बोलणे ऐकून राजा अकंपनाच्या मनावरचे दडपण कमी झाले. आणि ते निश्चितपणे सुलोचना आणि जयकुमार यांच्या विवाहाच्या तयारीला लागले.या विवाहासाठी, हस्तिनापुरहुन जयकुमार यांचे छोटे बंधू पोहोचले होते.
काशीनगरी आपल्या लाडक्या रूपसुंदर,शालीन धर्मप्रवीण,गुणवान अशा सुलोचना राजकन्येच्या विवाह साठी सज्ज होत होती .
सुलोचनाच्या विवाहाची राजमहालात तयारी चालू होती. त्यावेळेला ज्या विचित्रांगद या देवाने ,अकंपनाच्या पूर्वभवातील भावाने ,स्वंयवर मंडपाची रचना केली होती तोच देव विवाह मंडपाची रचना करण्यासाठी आला. त्यांनी विवाह मंडपाची रचना केली त्या मंडपातच, जैन पूजा विधानासहित सुलोचना आणि जयकुमार यांचा विवाह संपन्न झाला. विवाह एक मंगल कार्य आहे. याच्यात,वरवधूंच्या भावी वैवाहिक जीवनाच्या शांतीसाठी, वर-वधूनी धर्माच्या अंगाला सांभाळत ,आणि परस्परांमध्ये प्रेम ठेवत, गृहस्थ धर्माचे पालन करावे, म्हणून जिनेंद्राची अर्चना, विधान केले जाते. खरं तर हे योग्यच आहे की प्रत्येक मांगलिक कार्यामध्ये मंगल स्वरूप अरिहंत, सिद्ध यांचे पूजा विधान आणि गुण स्मरण केले जावे.यथोचित विधी आणि नियमांप्रमाणे सुलोचना आणि जयकुमार विवाह बंधनात बध्द झाले.
जयकुमार आणि सुलोचना यांच्यामध्ये अनुपम असे प्रेम निर्माण झाले होते. विवाहानंतर काही दिवस ते काशीनगरीतच राहिले.
एक दिवस हस्तिनापुर येथून दूत पत्र घेऊन आला. हस्तिनापुर मध्ये राजा जयकुमार ,यांच्या आगमनाची प्रतिक्षा केली जात होती.
संदेश येताच जय कुमारला सुलोचना सहित, हस्तिनापुर नगरीला जाण्याची ओढ लागली आणि त्यांनी राजा अकंपन यांच्याकडे हस्तिनापुर कडे सुलोचना ला घेऊन जाण्यासाठी अनुमती मागितली.
अकंपनी राजाने शुभ दिन पाहून, शुभ मुहूर्त काढून ,आपली पुत्री सुलोचनाला ,जयकुमारासोबत निरोप दिला .जयकुमार सोबत ,जय कुमार यांचा छोटा भाऊ, सुलोचनाचा भाऊ हेमांगद,हेही गेले .जयकुमार सुलोचनासहित,विजयार्ध्द हत्तीवर,अंबारीत बसून निघाले. काशीनगरीमध्ये, मोठी शोभायात्रा काढण्यात आली. प्रजाजन आणि अकंपन, थोडे दूर पर्यंत त्यांना सोडायला गेले.
कन्या जाता दूरदेशी
गहिवरले मन मातपित्याचे
सोबत तिच्या दिले होते
उत्तम संस्कार जगण्याचे
रात्र झाली गंगातीरावर,जिथे शरयूसोबत तिचा संगम झाला आहे,अशा मनोहर ठिकाणी सारे पोहचले, आणि तिथे मुक्काम करण्याचं ठरलं. गंगातीरावरती, मुक्कामाचे तंबू टाकण्यात आले. सुंदर वस्त्रांच्या तंबूमुळे गंगातीर एका नगरी मध्येच परावर्तित झाला.
अयोध्यामार्गे जातच आहोत, तर भरत चक्रवर्तींनी न भेटता, तसेच पुढे जाणे योग्य ठरणार नाही आणि भरत चक्रवर्तींच्या मनात काही अप्रसन्नता असेल तर ,तीही भेट घेऊन दूर करता येईल, अशा विचाराने जयकुमार यांनी चक्रवर्तींच्या भेटीस जाण्याचे ठरवले.
खरे तर सुलोचनाला ही ,आपली बहिण लक्ष्मीमतीला भेटण्यासाठी तिथे जाण्याची इच्छा होती, परंतु भरत चक्रवर्ती यांची कशी प्रतिक्रिया असेल, याविषयी जयकुमार साशंक असल्यामुळे ,जयकुमारांनी सांगितलं, “तू इथेच विश्रांती घे मी भरत चक्रवर्ती यांना भेटून येतो आणि त्यानंतर , परिस्थिती बघून तुला तुझ्या प्रिय बहिणीला भेटण्याचीची जी इच्छा आहे ,ती पूर्ण करता येईल का ते बघतो .”
जयकुमार यांची आज्ञा प्रमाण मानून सुलोचना तंबूमध्ये थांबली आणि आपल्या सखींसोबत धर्मचर्चा करत राहिली. इकडे जयकुमार विजयार्ध्द हत्ती वर चढले आणि थोडेसे मित्रजन सोबत घेवून ,अयोध्येला पोहोचले
नगराबाहेर थांबून त्यांनी आपल्या येण्याची वार्ता भरत चक्रवर्तींकडे पाठवले. महाराज भरतांच्या आज्ञेनुसार, खूप खूप उत्साहाने अयोध्यानगरीमध्ये ,जयकुमारांचे ,स्वागत झाले. जयकुमारांना, भरत चक्रवर्ती कडे घेऊन जाण्यासाठी खास मंत्रीगण आले होते.
भरत चक्रवर्तींच्या सभेमध्ये जयकुमार पोचले.साक्षात चक्रवर्तींची राज्यसभा. त्याची शोभा काय वर्णावी! रत्नमयी सिंहासनावर ,भरत चक्रवर्ती विराजमान होते. सभेमध्ये सर्व कार्यकर्ता, मंत्री, सभासद आपापल्या नियत स्थानांमध्ये, विनयाने विराजमान होते. जयकुमार आतमध्ये सभेत गेले. दुरूनच त्यांनी भरत चक्रवर्ती त्यांना साष्टांग नमस्कार केला. जयकुमार सम्यकदृष्टी आणि तद् भव मोक्षगामी होते, तरीही व्यावहारिक कार्यांमध्ये, गृहस्थाप्रमाणे, वर्तन करणं, त्यांचं कर्तव्य होतं. त्यामुळे व्यवहार स्वरूप ,लक्षात घेऊन त्यांनी भरत चक्रवर्ती यांना साष्टांग नमस्कार केला.
जयकुमारांनी नमस्कार करताच, भरत चक्रवर्तींनी पुढे येऊन जयकुमारांना प्रेमाने जवळ घेऊन स्वागत केले.
” सोबत नवीन वधूला आणले नाही, विवाह उत्सवातही आम्हाला बोलवले नाही ,एवढे गुप्तता ठेवली. “अशा स्नेहल वचनाने जयकुमारांचा संकोच दूर केला.
जयकुमार यांनी लाजून विनयाने नजर खाली झुकवली. स्वंयवरासंबंधी सर्व वृत्तान्त सांगितला. आपल्या अपराधाची क्षमा मागितली, जो त्यांनी अर्ककिर्तीशी युद्ध करून त्याला बंदी करुन केला होता. महाराज भरत म्हणाले,” हे पुरुषोत्तम तू जगामध्ये न्याय करणारा आहेस. तू माझ्या अपराधी पुत्राला दंड देणार नाहीस तर कोण देणार? तुझी न्यायतत्परता आणि धीरता अत्यंत महान आहे. तुझ्यासारखे वीर, माझ्या साम्राज्याची शोभा आहेत. निश्चिंत हो आणि हस्तिनापुर देशावर राज्य कर. सुलोचनालाही माझी प्रेमळ आशीर्वाद दे.” असे बोलून,भोजनादि करवून, आभूषणे,मनोहर वस्त्र जयकुमार आणि सुलोचना यांना भेटीदाखल देऊन, भरत चक्रवर्तींनी लक्ष्मीमती आणि अर्ककिर्तींनाही, सुलोचनाला भेटण्यासाठी, जयकुमारांसोबत जिथे सर्वांनी निवास केला होता, तिथे पाठवले.
भरत चक्रवर्तींच्या प्रेमाने भारावून जाऊन जयकुमार आता हस्तिनापुरी लवकर निघुया, म्हणून सर्वांचा निरोप घेऊन आणि लक्ष्मीमती,अर्ककिर्तीं, यांनाही सोबत घेवून सुलोचना ला भेटण्यासाठी निघाला.
भरत चक्रवर्ती यांचा निरोप घेऊन जयकुमार, सुलोचना जिथे होती त्या ठिकाणी जाण्यास निघाले .काहीजण नौकेवर तर काहीजण आपल्या वाहनांवर स्वार होते. जयकुमार ही आपल्या विजयार्ध्द हत्तीवर बसून गंगा पार करायला लागले. गंगा पार करता करता, हत्तीचा पाय एका भोवर्यामध्ये अडकला आणि त्याला तिथून बाहेर निघता येईना. त्याच ठिकाणी एका मगरीने हत्तीच्या पायाला पकडले .हत्तीचे पाय डगमगले आणि तो बुडायला लागला.
खरेतर हे मगर म्हणजे एक कालीदेवी नावाची व्यंतर होती. तिने मगरीच रूप घेऊन जयकुमार याला, जाणून बुजून त्रास द्यायला सुरुवात केली होती. गोष्ट यामागची कथा अशी होती, की काही वर्षांपूर्वी एकदा, नागनागिण जोडी .कामक्रिडेमध्ये मग्न असताना, जयकुमार यांच्या काही सैनिकांनी त्यांना खडे मारले होते. नाग क्रुद्ध होऊन पळाला होता. काही दिवसानंतर त्या नागाचा मृत्यू होऊन तो व्यंतर झाला होता. नंतर सहज, फिरता-फिरता जयकुमार याला पाहून त्याला,आपल्या पूर्व भवातल्या गोष्टी त्याला आठवल्या आणि क्रोधामुळे जयकुमार आणि त्यांच्या सोबतच्या लोकांना त्रास देण्यासाठी त्याने असा उपसर्ग द्यायला सुरुवात केली. पाहणाऱ्याला जयकुमार आता गंगेमध्ये बुडणार की काय असे वाटत होते.ते पाहुन हेमांगद आणि त्यांचे काही सहकारी जयकुमारांना वाचवण्यासाठी भोवर्याच्या च्या दिशेने निघाले.
दुसर्या किनार्यावर असणाऱ्या सुलोचनाला हे सारे दिसत होते. सुलोचना पतीव्रता स्त्रियांमध्ये, शिरोमणी होती. एका पत्नीमध्ये जे गुण असले पाहिजे ते सर्व सुलोचना मध्ये होते. शास्त्रकारांनी स्त्री रत्नांचे जे कर्तव्य सांगितले होते, ते सर्व सुलोचना पार पाडत होती. सुलोचना आपल्या पतीचा वंशाचा उद्धार करण्यासाठी त्यांच्या पुत्रांची माता, पतीसाठी सखी, मंत्री,प्रसंगी पतीचे संरक्षण करणारी, सर्व प्रकारच्या पत्नीच्या गुणांनी परिपूर्ण होती. आपल्या पतीवर विपत्ती आल्यावर ती विपत्ती लवकर दूर व्हावी, म्हणून तिने लगेच णमोकार मंत्राचे स्मरण केले आणि नियम घेतला,
“माझ्या पतीवरील उपसर्ग जोपर्यंत दूर होत नाही तोवर माझा आहार पाण्याचा त्याग असेल.” अशा प्रकारे आहार पाण्याचा त्याग नियम घेऊन सुलोचना ही जिथे जयकुमार अडकला होता, त्या भोवर्याऱ्याच्या दिशेने नदीमध्ये नौका घेऊन जायला निघते आणि उपसर्गाच्या स्थानी पोचून, कायोत्सर्ग ध्यानामध्ये लीन होते. तिचं मन आत्मध्यानात लागलेलं असतं, त्यावेळी गंगादेवीचे आसन कंपायमान होते. ती अवधी ज्ञानाने विचार करते आणि सुलोचनाच्या खऱ्या सम्यकत्वाला पाहून, तिने केलेल्या पूर्व उपकारांचे स्मरण करून, देवी बाहेर येते आणि कालीदेवी व्यंतराला पळवून लावून, उपसर्ग दूर करते. आपल्या विक्रीया शक्तीने लगेचच एक सिंहासन तयार करून जयकुमार आणि सुलोचनाला भक्तिभावाने त्यावर विराजमान करते.
सर्व सहकार्यांना क्षणात उपसर्ग दूर झालेलला बघून आश्चर्य वाटतं, सर्वजण जिनेन्द्र देवांचे गुण गाऊन ,धर्माची प्रशंसा करायला लागतात.
जिनधर्म खरा उध्दारक
सकल जनांसी तारक
णमोकार मंत्र महान
सर्व पाप दुःख निवारक
स्मरण करता मनोभावे
कर्मनिर्जरा होतसे रोज
निवारण घोर संकटाचे
होतसे यामुळे सहज
गंगादेवीही जिनेन्द्रदेवांचे पुण्यस्मरण करून, सुलोचना ची प्रशंसा करायला लागते. देवी म्हणते ,
“हे सुलोचना! तू धन्य आहेस. मोक्षकामी परमपुरुष तुला पती रूपात मिळाला आहे. तू माझ्या आत्म्यावर खूप मोठे उपकार केलेले आहेस.पूर्वभवात धर्म जीवनामध्ये मरण समयी, तू मला णमोकार मंत्र ऐकवला होता. त्यामुळे मला देवायूचा बंध झाला. हिमवंत पर्वतांमध्ये , प्रभातकुंडामध्ये , वाहणारी मी गंगादेवी झाले. माझ्यावर तू जे उपकार केले आहेस, त्याला मी कधीही चुकवू शकणार नाही. तुझे गृहस्थजीवन सुखाचे असो.”
देवीचे वचन ऐकून, जयकुमार आणि सुलोचना गद्गगदित होतात.देवीची प्रशंसा करतात. खरोखर जे लोक सज्जन असतात ,ते आपल्या उपकाराला विसरत नाही आणि दुसऱ्यांवर प्रत्युपकार करण्याची संधी सदैव शोधत राहतात. जयकुमार यांना गंगादेवींने कथन केले, ते विस्ताराने ऐकायचे होते त्यामुळे त्यांनी सुलोचनाला विचारले,
” प्रिये तुझ्या णमोकार मंत्र महात्म्याची कथा मला माहीत नाही. मलाही णमोकार महात्म्याची कथा विस्ताराने सांग”
सुलोचना विनयाने बालपणीची ,णमोकार मंत्र कथा सांगायला सुरुवात करते. गंगादेवी आणि उपस्थित सारे जन कथा ऐकायला सुरवात करतात.
सुलोचना बालपणीची कथा सांगते.
“विंध्याचल पर्वतावरील राज्याचा राजा विंध्यंकेतु आणि त्याची राणी प्रियंगुश्री यांची कन्या विंध्यश्री होती. तिच्या मातापित्यांना तिला योग्य आणि उत्तम शिक्षण मिळावे अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी माझे पिताश्री राजा अकंपन यांच्याकडे तिला शिक्षण घेण्यासाठी ठेवले होते.
भगवान ऋषभदेवांचा हा काळ आहे. त्यांच्या कन्या ब्राम्ही आणि सुंदरी यांना सर्व कलांचे शिक्षण देऊन त्यांनी ,सर्व प्रकारे विद्या आणि कलांमध्ये ,त्यांना पारंगत केले आहे. त्यांच्याच प्रेरणेने प्रजेमध्ये पुत्रांपेंक्षा, कन्यांना शिक्षण देणं महत्त्वाचं मानलं जात आहे. प्रत्येक बालक बालिका त्यांच्या वयाचे पाच सहा वर्ष होईपर्यंत आपल्या मातेसोबत असतात. त्यामुळे एक कन्या जर चतुर आणि सुसंस्कारी असेल तर ती आपल्या संतानाला चतुर आणि संस्कारी करु शकते. त्यामुळेच या काळामध्ये पुरुषांपेक्षा ,स्त्रियांच्या शिक्षणाला जास्त महत्त्व आहे.
विध्यंश्री राजकुमारी माझ्यासोबत शिकत होती. पिताश्री अकंपनांनी माझ्या आणि लक्ष्मीमतीच्या शिक्षणासाठी उत्तम व्यवस्था केलेली होती. माझ्यासोबतच्या सर्वच कन्यांना उत्तम शिक्षणाचा लाभ मिळत होता.
विध्यंश्री माझी खास सखी होती.माझ्यासोबतच विद्याभ्यास करणे, भोजन, खानपान,क्रिडा करणे ,इ.करायची. एके दिवशी आम्ही वंसत तिलक वनात, एकत्र खेळत होतो.तेंव्हा विध्यंश्री खेळता खेळता एका सुगंधित फुलांच्या वेलीजवळ गेली आणि चुकून तिचा पाय एका नागावर पडला. नागाने तिला दंश केला .तिचा करुणाजनक आवाज ऐकून मी तिच्याजवळ गेले. तिचे प्राण रक्षण कठीण आहे, याची जाणीव मला झाली, आणि मी त्याच क्षणी सर्व मंगलकारी णमोकार मंत्राचा जप सुरू केला .त्यामुळे कषाय मंद होऊन ,विंंध्यश्रीला शुभलेश्या झाली. आयुकर्माचा तिचा बंध झालेला नसल्यामुळे तिला देवायु बंध होऊन ,देवगती मध्ये जन्म झाला आणि ती गंगादेवी झाली.
णमोकार मंत्र सर्व मंगल आहे याचा प्रभाव खूप मोठा आहे.महिमा अगाध आहे. हा३५अक्षरी मंत्र परमात्मा आणि अंतरात्माचे स्मरण आहे.” त्यानंतर अरिहंत,सिद्ध आदि पंचपरमेष्ठींचे गुणवर्णन करुन सुलोचना णमोकार मंत्र महात्म्य सांगते.
“स्वामी!णमोकार मंत्र म्हटल्याने,जपल्याने,याचा अर्थ जाणुन घेतल्याने,कषायांची तीव्रता मंद होते.मंद कषायामुळे जीवाला पुण्यकर्माचा बंध होतो.याचा प्रभाव अकथनीय आहे .जीवाने नेहमी णमोकाराचे स्मरणरत रहावे”
दिन असो वा रात असो
रहा णमोकाराचा जप करत
साधतसे त्यामुळे आपुला
मोक्षधर्म खरा जीवनात
अशा प्रकारे णमोकार मंत्र महात्म्याची कथा सुलोचना ने जयकुमाराला आणि सर्वांना सांगितली.आणि म्हणाली,
“स्वामी! ही गंगादेवीची महानता आहे की तिने माझ्या तुच्छ उपकाराचे स्मरण ठेवले आणि आपल्यावर खूप प्रशंसनीय,अविस्मरणीय असे प्रत्युपकार केले.”
त्यानंतर लक्ष्मीमतीची भेट घेऊन, तिच्याशी आत्मीयतेने वार्तालाप केला.तिचे क्षेमकुशल जाणून घेतले. लक्ष्मीमती सुलोचनाचा निरोप घेऊन,अयोध्येला राजभवनात परत गेली. त्या रात्री गंगातीरी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी जयकुमार आणि राणी सुलोचना हस्तिनापूरच्या दिशेने निघाले.
हस्तिनापूरला त्यांचे भव्य स्वागत झाले .नगर जनांनी गुढ्या तोरणे सजवली होते.मंत्रीगण,जयकुमारांचे भाऊ, राणी सुलोचनाच्या स्वागताला नगराच्या वेशी जवळ आलेले होते. त्या दोघांचे स्वागत करून त्यांना नगरातील जिनमंदिरात नेण्यात आले. दुसऱ्या दिवशी हस्तिनापूरला मोठ्या
जिनपूजेचे आयोजन केलेले होते. या दोघांच्या स्वागताप्रित्यर्थ ,ही पूजा सोमप्रभ राजाने आयोजित केलेली होती. आधीही जयकुमार याच्या अनेक राण्या होत्या, पण सुलोचना त्याची विशेष लाडकी राणी असल्यामुळे पट्टराणीपद ,सुलोचना राणीला देऊन जयकुमार, राणी सुलोचना आणि इतर सर्व राण्यांसहित, सुखाने गृहस्थ जीवन व्यतीत करायला लागले. धर्मपालन करता करता जिन धर्माच्या पूजनाचे , त्यांगींना आहारदानाचे विविध कर्म करण्याचा सारा परिपाठ व्यवस्थित चालू होता.
काही वर्षानंतर, एके दिवशी राजा अकंपन याला मोक्षमार्गाची ओढ लागली. त्याने आपला ज्येष्ठ पुत्र हेमांगद आणि सर्व मंत्रिमंडळाला बोलावले . हेमांगदाला राज्य देऊन, स्वतः दीक्षा घेण्याचे ठरवले .सुप्रभा राणीच्या चित्तातही ,वैराग्य निर्माण झाले .दोघांनीही सर्वांची क्षमा मागितली आणि आत्मकल्याणसाठी घर सोडून, ते बाहेर निघाले.
राजा अकंपन आणि राणी सुप्रभा ,हर्षाने दीक्षा रत्न ग्रहण करण्यासाठी श्री ऋषभ देवांच्या समवशरणाकडे निघाले. त्यावेळी प्रजेला आपल्या न्यायी,धर्म प्रवीण राजाला जाताना पाहून ,दुःख झाले. थोड्या अंतरापर्यंत सारे प्रजाजन त्यांच्या सोबत गेले.काहींनी त्यांच्यासोबतच दीक्षा घेण्याचे ठरवले. काही धर्मात्मा शास्त्रीपंडितांनी लोकांना समजले. संसाराची असारताआणि मोक्षाची सारता सांगितली. या उपदेशामुळे लोकांचे उदासिनता, काही प्रमाणात दूर झाली.
सुप्रभा राणी आणि अकंपन भगवंतांच्या समवशरणात पोचतात. त्यांची उत्तम प्रकारे स्तुती आणि पूजा करून सभेत बसतात. शांत मनाने धर्मोपदेश ऐकतात. भगवंतांची दिव्य ध्वनी तिथे प्रगट होत असते. त्या दिव्य धनी मध्ये अज्ञानी, असंयम भावाने ग्रासलेल्या जीवाला, स्व-भावाने आपला ज्ञान विधी कसा साधता येईल? अतींद्रिय सुखाची संपत्ती विसरून , त्याग करून आत्मकल्याण कसे करता येईल? याविषयी उपदेश असतो. ते सांगतात.
“जे भव्य जीव, कर्म शत्रूवर विजय मिळवण्यासाठी दीक्षा रुपी लोहवस्त्र धारण करतात. सर्व वस्त्रादि अवडंबराचा त्याग करतात आणि ध्यानाचे धनुष्य हातात घेऊन, इंद्रिय शत्रूंचा नाश करतात. मोहाचा नाश करतात.”
ऋषभदेव भगवंतांची अमृतवाणी ऐकून अकंपन उभे राहतात जिनेन्द्र देवांची वारंवार स्तुती करून निग्रंथ पद, धारण करण्याचा भाव प्रगट करतात.
प्रभुंची अनुमती मिळताच, वृषभसेन गणधरा जवळ जातात सर्व परिग्रह त्याग करुन मुनीव्रत धारण करतात. सुप्रभा राणी ही ब्राम्ही नावाच्या आर्यिकेजवळ जाऊन, नमस्कार करून आर्यिका व्रताची याचना करते. वस्त्र भूषणचा त्याग करून, एका शुभ्र वस्त्राच्या साडीला ओढण्यासाठी ठेवून, स्वतःच्या हाताने केशलच करून, आर्यिका दीक्षा ग्रहण करते. दीक्षा धारण केल्यानंतर , भोजनपान चोविस तासांतून फक्त एकदाच घेऊन ती संतुष्ट रहाते. दिवस-रात्र आत्मचिंतन आणि धर्मज्ञान करते . सुप्रभा आपल्या चरित्राचे रक्षण आणि मोक्ष नगरीच्या मार्गाकडे मार्गक्रमण करत असते.
तिकडे हस्तिनापुरात जयकुमार सुलोचना सहित प्रजेचे धर्म व न्यायाने पालन करत गृहस्थ सुखांचा उपभोग घेत काळ व्यतीत करत असतात. या दोघांमध्ये जे प्रेम असतं त्याचं वर्णन करणं , शक्यच नाही.
एके दिवशी जयकुमार राजा राज्यभावनात सज्जामध्ये सुलोचना सोबत आनंदात वार्तालाप करत बसलेले असतात. एकाएकी वरुन एका विद्याधर जोडप्याला, जाताना पाहून जयकुमार ,”हे माझे प्रभावती”, असे म्हणून मूर्च्छित होतात. त्याच वेळी एका कबुतराची जोडी उडतांना बघून ,”हे माझे रतीवर “असा शब्द म्हणून सुलोचना ही मूर्च्छित होते. जयकुमार यांच्या ,राजमहालातील स्त्रिया या दोघांना शुध्दीवर आणण्यासाठी प्रयत्न करतात खरेतर ती विद्याधर जोडी आणि कबुतरांची जोडी बघून ,जयकुमार आणि सुलोचना यांना आपलं पूर्वजन्मातील, जाति स्मरण झालेलं असतं.
जयकुमारांनाही जाणीव होते , सुलोचनेलाही मात्र पूर्व भव आठवायला लागतो.
सुलोचना आणि जयकुमार या दोघांनाही एकाच वेळी पूर्वजन्मातील चरित्र आठवलं थोड्यावेळाने अवधीज्ञानाच्या प्रभावाने ,या दोघांना आपल्या मागच्या भवातल्या सर्व गोष्टींचे स्मरण झाले. आणि दोघांनाही समजलं की आपल्या तोंडून असे शब्द का बाहेर पडले? या दोघांकडे राजभवनातल्या इतर स्त्रिया कुतूहलाने बघत होत्या.
त्यांची उत्सुकता दूर करण्यासाठी जयकुमार यांनी ,सुलोचना ला सांगितलं की आपल्या पूर्व भवातल्या काही गोष्टी सांग. आपले कसे चरित्र होते ते सांग.
सुलोचना सांगते,” हे स्वामीं एका पूर्वभवामध्ये ,आपण एका धर्मपरायण श्रेष्ठींच्या घरामध्ये रतिवर कबूतर आणि रतीषेणा नावाच्या कबुतरी होतो. त्या वेळेला ही आपल्या दोघांमध्ये खूप प्रेम होते म्हणूनच त्या कबुतरांच्या जोडीला बघून मला माझ्या मागच्या भवातली गोष्ट आठवली आणि माझ्या मुखातून हे “रतीवर’ असे शब्द निघाले.
त्या नंतरच्या एका भवामध्ये आपण हिरण्यागर्भ विद्याधर आणि मी प्रभावती विद्याधरी होते. तेव्हाही आपल्या दोघांमध्ये खूप प्रेम होतं त्यामुळे ,तुमच्या मुखातून ‘हे प्रभावती’ असे शब्द बाहेर पडले आणि तुम्हाला त्या जन्मातल्या चरित्राची आठवण झाली.”
हे पूर्वजन्माचे चरित्र ऐकून, राजभवनातील स्त्रियांचे कुतूहल दूर झाले. आपल्या एका जन्मातील संस्कार पुढे कितीतरी भवांपर्यंत आपल्या सोबत राहतात, याची जाणीवही त्यांना झाली. जयकुमार यांच्या सम्यक दर्शन चा प्रभाव आणि पुण्योदया मुळे विद्याधर पर्यायांमधील, प्रज्ञाप्ती वगैरे विद्या सिद्ध होत्या त्या आता स्फुरायला लागल्या. या विद्येमुळे, आकाशात विमानाने फिरण्याची शक्ती, जयकुमार यांना प्राप्त झालेली होती.
जयकुमार आणि सुलोचना आदर्श गृहस्थ जीवन, धर्म ,अर्थ आणि काम या तिन्ही पुरुषार्थ करुन पाळत होते. ते दोघेही , सम्यक दृष्टी होते. वीतराग देव, गुरु, शास्त्राचे पूजन करायचे. जयकुमार आणि सुलोचना सांसारिक क्रियांमध्येही अलिप्त होते. रात काली सामायिक करून निद्राधीन व्हायचे. संयम धारण करून, शरीर क्रिया करून, शुद्ध होऊन, जिनेन्द्र पूजन करून, सुपात्र जनांना दान देऊन, शुद्ध भोजन संतोष पूर्वक करायचे. सुलोचना प्राणप्रिय पतीला, परम भक्तिप्रेमाने भोजन करवून ,नंतर स्वतः भोजन करायची.
दिवसा जयकुमार जेव्हा राज्य कार्यात व्यस्त असायचे, त्यावेळी सुलोचना गृह अवस्थेचे निरीक्षण करायची. इतर राण्यांना बसवून धर्मशास्त्र वाचन करायची. नवनवीन मनोहर कथा, काव्य, उदाहरणे सांगून उत्तम शिक्षण, त्यांना देऊन पवित्र करायची.
नगरमध्ये व राज्यांमध्ये स्त्री शिक्षणाचा प्रचार व्हावा याचा प्रबंधही, ती पहात होती .त्यांना शिक्षण घेण्यासाठी उत्तेजित करण्याचे महत्त्वाचे कर्तव्य ती करत होती. तसेच पशुपक्षांच्या पालनासाठी चिकित्सालय ,अनाथांसाठी अनाथालय इत्यादी अनेक समाजपयोगी कार्यामध्येही ती लक्ष देत असे.
एखाद्या सामान्य संसारी स्त्रीप्रमाणे, फक्त खाणे-पिणे आणि शोभा दाखवणे याच्यात न गुंतता, तिचं मन आणि कार्य परोपकाराच्या भावाने भरलेलं होतं.
पती संपर्काव्यतिरिक्त इतर वेळी एखाद्या शांत साध्वी प्रमाणे ती आपले जीवन व्यतीत करायची. जयकुमार ही राज्य कार्यामध्ये नीती आणि धर्माला ,आपले गुरू मानून चालत होते. आपल्या प्रजेचे पुत्रवत पालन करत होते. अशी अनेक वर्ष गृहस्थ धर्माचं पालन केल्यानंतर जयकुमार याच्या मनामध्ये आलं की आपण आता देशभ्रमण केलं पाहिजे. नाना प्रकारच्या देशांचे अवलोकन केल्यामुळे बुद्धी चमत्कृत होते. त्या देशातील लोकांच्या संपर्काने त्यांचे गुण कळतात. आपले जिथे तीर्थस्थान आणि मंदिर आहेत ,त्यांचे दर्शनही प्राप्त होईल. तेथील साधूंचे ही दर्शन मिळेल आणि त्यांचा अनेक प्रकारचा हितकारी उपदेश ऐकल्यामुळे ज्ञानाची प्राप्ती होईल ,गृहस्थांसाठी देशभ्रमण हे नवीन अनुभव प्राप्तीचे साधन आहे.
फिरता देशोदेशी मिळेल
ज्ञान ते विविध अनुपम
प्रदेश पाहुनी रमणीय
नयनसुख मिळेल उत्तम
दर्शन त्यागी अन् व्रतींचे होता
आपले संपन्न होईल जीवन
दर्शन होता प्रभुंचे अलौकाक
नानाविध जिनमंदिरी जाऊन
सुलोचनानेही या देशभ्रमणासाठी संमती दिली. जयकुमार यांना विज्ञाप्ती या विद्यांची प्राप्ती होती. विमानांनी जाऊन, अडीचद्वीपाची वंदना करण्याचं त्यांनी ठरवलं. तशी शक्ती त्यांना मिळाली.
शुभमुहूर्ती जिनेंद्रांची पूजा-अर्चना करून जयकुमार आणि सुलोचना, विमानामध्ये चढून देशभ्रमण करायला निघाले.
ठिकठिकाणचे प्रदेश पाहुन झाले.गुरुंचा उपदेश ऐकियला मिळाला.सृष्टीसौंदर्य अनुभवून झाले.
फिरता फिरता दोघेही कैलासपर्वतावर आले. इथूनच वृषभदेवांचे निर्वाण होणार होते.तिथले सृष्टीसौंदर्य ,वने,उपवने, निर्झर अनुपम होते.
ते दोघे तिथे विहार करत होते ,त्यावेळी सौधर्म इंद्राच्या दरबारात शीलवान, आदर्श श्रावकांविषयी चर्चा सुरु होती.
त्यावेळी सौधर्म इंद्र म्हणतात,
“सुलोचना आणि जयकुमार शीलवान
आहेत. सुलोचना
इतर पुरुषांना पिता भ्राता पुत्र समान समजते.जयकुमार परस्त्रीला माता,भगिनी समजतो. दोघेही परम संतोषी आहेत. खूप सामर्थ्यवान आहेत. खरे आदर्श श्रावक आहेत”
इंद्राचे असे प्रशंसनीय बोलणे ऐकून, देवांच्या सभेमध्ये प्रसन्नता आली, आणि शील धर्माला उत्कृष्ट जाणून त्यांनीही प्रशंसा केली.
पण रविप्रभ नावाच्या देवाला सुलोचना आणि जयकुमाराची परिक्षा घेण्याची इच्छा झाली. त्यांने कांचनादेवी नावाच्या देवतेला बोलावले. आणि जयकुमार-सुलोचनाची परिक्षा घेण्यास सांगितले एका रुपवान आणि मोहक तरुणीचे रुप घेऊन, जयकुमार आणि सुलोचना विहार करत होते, त्या ठिकाणी कांचना देवी आली.
तिला परिक्षा घ्यायची होती जयकुमारांची आणि सुलोचनाची. एका जैन नारीच्या सन्मानाची.
कांचना देवी ज्यावेळी कैलास पर्वतावर आली, त्या वेळेला सुलोचना पुष्पवनाच्या वाटिकेमध्ये मनोहर फुलांना तोडून एकत्र करत होती. जयकुमार निर्भय निशंक होते. त्यांना सुलोचनाही निर्भय आहे, हे माहीत होतं. त्यामुळे सुलोचना पुष्प तोडण्यासाठी सोडून, ते थोडे दूरवर पुढे निघाले. जयकुमार यांना एकटे बघून कांचनादेवी ,आपल्या सौंदर्याने चमकणाऱ्या रूपाला, नेत्राला मोहित करणाऱ्या चंचल हावभावांना, घेऊन प्रगट झाली आणि जयकुमारासमोर आली .
“तुमच्या स्पर्शाविना मी व्याकुळ झालेली आहे. तुम्ही मला स्पर्श केला नाही, तर मला चैन पडणार नाही. कृपा करून तुम्ही माझ्या स्वीकार करा आणि माझी आकुलता दूर करा.”असे बोलत जयकुमारांना मोहित करायला लागली.
जयकुमार यांना तिचे बोलणे ऐकून विषाद वाटला. तरी ते म्हणाले,
“तू कोण आहेस? हे तर सांग”
“मी विजयार्ध्द पर्वताजवळ रत्नपुर नावाची सुंदर नगरी आहे. तेथिल राजा पिंगाल गांधार आणि राणी सुप्रभाची कन्या विद्युतप्रभा आहे.मी महाराज नेमिची पत्नी आहे.”कांचनादेवी सांगते.
” हे भगिनी !तू माझ्या बहिणी प्रमाणे आहे. तू राजा नेमीची धर्मपत्नी आहेस .तू स्वप्नामध्येही परपुरुषाचा विचार करता कामा नये. आपल्या पतीसोबत तू संतोष धारण केला पाहिजे. हा संसार असार आहे .जीवन क्षणभंगुर आहे. तुझं शरीर जरी सुंदर असलं ,तरी चित्त दोषांनी परिपूर्ण आहे. मी मुनीमहाराजांकडून व्रत घेतले आहे की परस्त्री, माझ्यासाठी विषाप्रमाणे असेल .माझे प्राण गेले तरी मी धर्म आणि व्रताचं खंडन करू शकत नाही. म्हणून तू माझ्यापासून दूर हो.”जयकुमार निश्चयाने बोलतात.
कांचनादेवी परीक्षा घेण्यासाठी आली होती. जयकुमाराच्या तिने खूप विनवण्या केल्या. कधी गोड, कधी कटु बोलली. मंत्रा तंत्रा चा प्रयोग केला, परंतु काहीही प्रभाव पडला नाही. शेवटी राक्षसी रूप धारण केलं आणि जयकुमारला उचलून जिथे सुलोचना फुले तोडत होती,तिथे घेऊन गेली.
सुलोचना ने आपल्या तीक्ष्ण बुद्धीने जयकुमार यांच्यावर आलेला देवकृत उपसर्ग समजून घेतला. त्याला दूर करण्यासाठी तिने राक्षसीकडे वक्र दृष्टीने पाहिले आणि तिला फटकारले .सुलोचना शीलवान पतिव्रता स्त्री होती तिच्या शीलाच्या महत्म्यामुळे कांचनादेवी तिथे फार वेळ थांबू शकली नाही आणि जयकुमार यांना सोडून पळाली.
ज्या देवाने तिला पाठवलं होतं त्यांच्या पुढे जाऊन, या दोघांच्या शीलधर्माची, तिने खूप प्रशंसा केली.
देशाभ्रमणाच्या आपल्या इच्छेप्रमाणे देशभ्रमण पूर्ण करून हे दोघं पुन्हा आपल्या राज्यात आले आणि पूर्वीप्रमाणे धर्म अर्थ काम पुरुषार्थ साधण्याचे काम करू लागले.
खूप काळ ,राज्य केल्यानंतर जयकुमार आणि सुलोचना यांना एकदा ,आदिनाथ भगवंतांच्या समवशरणात जाऊन त्यांचे दर्शन करण्याची आणि उपदेश ऐकण्याची इच्छा झाली. त्याप्रमाणे ते तिथे गेले.
जिनेन्द्रभगवंतांच्या द्वादशा सभेच्या मध्यात ,सिंहासनावर विराजमान परम वीतराग परमानंद लीन तीर्थंकररुपाचे दर्शन करून, ते आदर्श दंपत्ती, त्यांच्या दिव्यध्वनीला ऐकण्यासाठी थांबले.
दर्शन होताच ते शुध्द भावांना प्राप्त झाले जयकुमार आणि सुलोचना यांनी नम्रता आणि विद्वत्तापूर्ण काव्यांनी भगवान देवांची स्तुती केली.आपल्या भक्तीने परमात्म्याप्रती, प्रत्येक शुद्ध भावना जागृत केलली. विनयाने अष्टद्रव्यांनी पूजन केले. स्तवन केले.
नंतर जयकुमार पुरुषांच्या सभेत ,तर सुलोचना स्त्रियांच्या सभेत उपदेश ऐकायला बसते. देवांची दिव्य ध्वनीतून खिरणार्या , मार्मिक तत्वज्ञान, व्याख्यानाचे वर्णन कोण करु शकणार?
दिव्यध्वनीत जीव आणि पुद् गल द्रव्य, इंद्रिये, सप्ततत्व, अकरा प्रतिमा अशा विविध विषयांवर भगवान ऋषभदेव धर्म अमृताचे पान उपस्थितांना आपल्या संभाषणातून करवत होते .भगवान ऋषभदेव यांच्या धर्मामृताचा पान केल्यावर, जयकुमार धर्मरसाने परीपूर्ण झाले आणि मोक्षाची प्राप्तीसाठी, संसार देह रोगापासून वैराग्य होऊन व्रत धारण करण्यासाठी आतुर झाले. काही यामध्ये काहीही विलंब करायचा नाही, हे त्यांनी ठरवलं.
मोक्षमार्ग साधण्याची घडी
निकट आली आता माझी
मोहाला दूर करुनीया मी
झालो दीक्षा घेण्यास राजी
जयकुमारांनी त्याप्रमाणे, लगेचच ,आपला राणी शिवांकारापासून झालेला ,ज्येष्ठ पुत्र अनंतवीर्य याला राज्याचा भार सोपवला आणि सर्वांमध्ये क्षमा भाव करून, प्रिय सुलोचनापासूनही राग दूर केला. तिला धर्मभगिनी समजून तिच्याकडे क्षमा भाव करून आदिश्वरांकडे ,साधू दीक्षेची प्रार्थना केली.
श्री भगवंत यांच्या साक्षीने वृषभसेन गणधराजवळ जाऊन, वस्त्रप्रावरणाचा त्याग करून, दिगंबर होऊन तपस्या करत आत्मानंदात मग्न झाले. थोड्याच वेळात चार ज्ञानाचे धारी होऊन, ऋषभदेव यांच्या समवशरणामध्ये ते 71 वे गणधर झाले. त्याच्या अंतापर्यंत सर्व कर्मांपासून मुक्त होऊन त्यांनी मोक्ष मार्गाला वरले.
दुसरीकडे जयकुमार यांनी दिक्षा घेता सुलोचनाचेही धैर्य सुटले. हृदयामध्ये करूण भाव आले. त्यावेळेला भरत चक्रवर्तीची पट्टराणी सुभद्रा, हिने तिला समजावून शांत केले. पण सुलोचनालाही, संसारापासून उदासीनता आली आणि तिने ब्राम्ही आर्यिकेजवळ जाऊन, दीक्षा मागितली.
ब्राम्ही ऋषभ देवांची पुत्री होती. बालब्रह्मचारी होती. सर्व आर्यिकांमध्ये मुख्य होती. ब्राम्हीजींनी. धर्मामध्ये दृढ निश्चय करवून तिला आधी ,आर्यिकेचे नियम दिले. सुलोचनाने शुभ्र वस्त्र पारिधान करुन,स्वतःच्या हाताने, केशलोच करून ,आर्यिकाव्रत धारण केले.
एका श्राविकेचा , आर्यिका होण्यापर्यंतचा हा प्रवास.सुलोचनाचा हा जीवन प्रवास ,एका जैन नारीचा सन्मानपूर्वक प्रवास होता. अनेक चढउतारांचा प्रवास होता. जैन नारीजीवनाचा सन्मान वाढवणारा असा जीवन प्रवास.
भाग्यश्री मुधोळकर
समाप्त