संयमाची परिक्षा
१ज्ञानप्रकाश हे ,राजा आदित्य राज ,यांच्या दरबारामध्ये पंडित आणि राजकीय सल्लागार या पदावर कार्यरत होते.
अतिशय नीतिमान, बुद्धिवंत आणि संयमशील पंडितजी म्हणून त्यांची ख्याती होती.
एकदा ज्ञानप्रकाश पंडितजींना, सर्वांची आणि स्वतःची परीक्षा घेण्याची इच्छा निर्माण झाली. माझं ज्ञान श्रेष्ठ की संयम श्रेष्ठ ,याविषयी त्यांच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण झालेलं होतं.
रोज पंडितजींचे शास्त्रवचन सांगून झालं, आणि राजकीय सल्लामसलत झाली, की त्यांच्यापुढे सुवर्ण मोहरांनी भरलेलं ताट, खजिनदार आणत असत. ज्ञानप्रकाश त्यातून केवळ एक सुवर्णमुद्रा घेत. कित्येक वर्ष हा क्रम चालू होता.
आज मात्र त्यांनी ज्या वेळेला मोहरांनी भरलेलं ताट समोर आलं, त्यावेळेला त्यांनी दोन मोहरा घेतल्या. राजाला यामुळे काही फार मोठा फरक पडणार नव्हता. खजिनदारांना वाटलं की पंडितजींनी चुकून एका वेळी दोन मोहरा घेतल्या असाव्यात. तेही काही बोलले नाही.
दुसऱ्या दिवशीही पंडितजींसमोर ताट आलं ,त्यावेळेला त्यांनी तीन मोहरा घेतल्या.
आता मात्र खजिनदार यांना कळलं की, एक मोहरा घेण्याचा नियम असूनही, पंडित जी आता तीन मोहरा घेत आहेत. त्यांनी हळूच ही गोष्ट राजाला सांगितली. राजाने फारसे लक्ष दिले नाही.
तिसऱ्या दिवशी पुन्हा ज्ञानप्रकाश पंडितजींनी काम झाल्यावर, मोहराच्या ताट समोर आलं ,त्यावेळेला तीन मोहरा घेतल्या.ही गोष्ट आता दरबारात सगळ्यांनाच कळली होती.
राजाने सर्वांसमक्ष त्यांना विचारले.
“पंडितजी एखादी व्यक्ती जाणून-बुजून लबाडी करत असेल तर त्याला काय शिक्षा करावी?”
“एखाद्या चोराला जी शिक्षा असते तीच शिक्षा त्याला करण्यात यावी.”पंडितजी म्हणाले.
“आणि ती लबाडी तुम्ही करत असाल तर”महाराजांनी विचारले.
“महाराज मलाही तसाच न्याय असावा.”पंडितजी
“पंडित जी गेले दोन-तीन दिवस आम्ही बघत आहोत तुम्ही गेले कित्येक वर्ष. फक्त एकच मोहरा घेत होतात, पण परवापासून दोन-तीन. आज पुन्हा तीन मोहरा घेतल्यात हे काय आहे ?”महाराजांनी विचारले.
“महाराज मला स्वतःला माझं ज्ञान की नीतिमत्ता श्रेष्ठ ,मी धारण केलेला संयम श्रेष्ठ ,याची परीक्षा करायची होती. माझं ज्ञान ,तर जे चार दिवसांपूर्वी होतं ,तेच आजही आहे ,पण माझा जो आधीचा एक सुवर्णमुद्रा घेण्याचा संयम होता, तो सोडून ,मी गेले तीन दिवस जास्त सुवर्णमुद्रा घेत होतो. त्याबरोबर लोकांची माझ्याकडे बघण्याची दृष्टी बदलली, ते मला लबाड समजायला लागले .म्हणजे ज्ञानापेक्षाही, संयम नीतिमत्ता ही जास्त महत्त्वाची आहे हे मला पटलं .”
ज्ञानप्रकाश पंडितजींचा बोलणं ऐकून राजा प्रभावित झाले. दरबारीही प्रभावित झाले. पंडितजींनी जास्त घेतलेल्या सुवर्णमुद्रा लगेच खजिन्यात परत जमा केल्या. आणि संयम हा सर्वात श्रेष्ठ आहे,हे मान्य केलं आणि इतरांनाही त्यांच्या अनुभवातून ते कळलच,की संयम असणे श्रेष्ठ.
२.गावातल्या मंदीरातील वेदीवर आदिनाथ भगवंतांची प्रसन्न मूर्ती विराजमान होती. वेदीवर असणाऱ्या संगमरवराच्या दगडाच्या, मनामध्ये आले,की खरंतर प्रभूंच्या मूर्ती साठी वापरण्यात आलेला दगड आणि मी दोघेही जण एकाच खाणीतून आलेलो आहोत, पण या दुसऱ्या दगडाचं भाग्य असं कि ती मूर्ती झाली आणि मी मात्र त्या मूर्तीला धारण करणारा वेदीचा दगड झालो. हे माझ्या कोणत्या कर्माचे फळ आहे ?गुणवत्ता, रंग या साऱ्या बाबतीत मी या मूर्तीपेक्षा, कुठेच कमी नाही, मग मी वेदी आणि तो दुसरा दगड मूर्ती का बरं ?
प्रभूंनी वेदी वरच्या मार्बलच्या संगमरवराच्या मनातले भाग भाव ओळखले.
प्रभू त्याला म्हणाले,”
एकाच खाणीतून निघालेले आपण दोघे पण तू मात्र वेदीवर चा संगमरवर आणि मी मात्र प्रभूंची मूर्ती असं का बरं झालं याचाच विचार करतोय ना!”
“हो प्रभू ”
“याचे उत्तर संयम हेच आहे”
“कसे काय ?”
“एकाच खाणीतून आपल्या दोघांना काढले. आपल्यावरती एकाच वेळी प्रक्रिया करण्यात आली. प्रक्रिया करण्यात आली ज्यावेळी ,आपल्यावरती मशीनचे छिन्नी, हातोड्याचे घाव पडत होते. त्यावेळेला त्या घावांना सहन करण्याचा संयम तू दाखवू शकला नाहीस आणि तुटलास. त्यामुळे तुझे रूपांतर संगमरवराच्या वेदीमध्ये झाले .मी मात्र त्या कठीण घावांना संयमाने सहन केले. कितीही आघात झाले तरी, सहन करत राहिलो. माझी मजबूती कारागिराच्या , लक्षात आली आणि मी प्रभूची मूर्ती झालो तू मात्र वेदीचा संगरवर झालास.”
संयमाचे एक रुप सहनशक्तीही असते का?
३.संध्याकाळचे सहा वाजले होते पद्मावती ज्वेलर्स ले दुकान बंद करण्याची तयारी. रत्नशेठ करत होते. घरी जाऊन भोजन, आरती त्यांना करायची होती.
गेले कित्येक दिवस इतर ज्वेलर्सचे दुकान ,रात्री नऊ- साडे नऊ पर्यंत उघडे असत. तण रत्नशेठांचे, पद्मावती ज्वेलर्स मात्र संध्याकाळी सहा वाजता बंद होत असे.
पाच वर्षापूर्वी गावांमध्ये आलेल्या मुनी महाराजांकडून आजन्म रात्री भोजन त्याग, असा नियम धारण करून, त्यांनी, संयम धारण केलेला होता. कोणतीही अडचण आली, तरीही संध्याकाळी सहा वाजता दुकान बंद करून, शेटजी घरी पोचायचे. सात्विक भोजन करून, रात्री आरती आणि शास्त्र प्रवचन चालायचे. आपल्या कर्मोदया मध्ये जेवढे लिहिलेले असते, तेवढे आपल्याला नक्की मिळते, याविषयी खात्री बाळगून त्यांनी हा निर्णय घेतला होता, आणि संयमपूर्वक याचं पालन ते करत होते.
ते आज दुकान बंद रण्याची तयारी करत होते, इतक्यात, एक आलिशान कार दुकाना समोर थांबली. त्यातून एक श्रीमंत पती-पत्नी उतरले त्यांनी,
” आम्हाला तुमच्या एका जुन्या ग्राहकांनी तुमचा रेफरन्स दिलेला आहे ,म्हणून आम्ही तुमच्याकडे मोठी खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत . दुकान थोडे उशिरा बंद कराल का ?आम्हाला तातडीने काही वस्तू घ्यायच्या आहेत.”असे म्हटले.
“माफ करा श्रीमान! गेली पाच वर्ष मी संध्याकाळी सहा वाजता दुकान बंद करून घरी जातो.सहा वाजेपर्यंत जेवढा व्यवसाय मला मिळतो,त्यात मी समाधानी आहे. माझा रात्री भोजन त्याग आहे .असा संयम मी धारण केलेला आहे”रत्नशेठ विनयाने म्हणाले.
“शेठजी आमची लाखोंची खरेदी आहे विचार करा. नाहीतर आम्ही दुसऱ्या दुकानात जाऊ.”ग्राहक म्हणाले.
“श्रीमान निर्णय तुम्ही घ्या. उद्या सकाळी 11 वाजता मी तुमच्या सेवेत हजर असेन. तुम्ही जर तेवढा वेळ थांबू शकत असाल तर ,माझ्याकडे नक्की या. आता मात्र मी कोणत्याही मोहासाठी ,माझ्या संयमाचा त्याग करून दुकान उघडे ठेवणार नाही. मला माफ करा.”रत्नशेछजींचा दृढ निश्चय होता.
शेठजींची दृढ निष्ठा पाहून, त्या ग्राहकांचा नाईलाज झाला, अर्थातच ते दुसऱ्या दुकानात गेले नाही,तर दुसऱ्या दिवशी सकाळी ,तिथेच आले, हे सांगायला नकोच.
४.”आई खूप बोर होत आहे, तुझा मोबाईल दे ना मला गेम खेळायला.” छोटा अर्हम जिनमतिकडे हट्ट करत होता.
“अर्हम दिवसात न फक्त दोन तास मोबाईल वर गेम खेळायचा किंवा व्हिडिओ बघायचे असं तुझे ठरलंय ना. आजचे दोन तास संपले ,आता तुला बोर होतंय म्हणून मोबाईलला हात लावायचा नाही.”जिनमती म्हणाली.
“आई दे ना ग. माझा सगळा अभ्यास पण झालेला आहे, बाहेर पण मी खेळून आलेलो आहे.”अर्हम
“मग आता चित्र काढायचं बस नाहीतर घरातले गेम ,मेकॅनो खेळ, पण आता मोबाईलला हात लावायचा नाही म्हणजे नाही .”जिनमती ठामपणे म्हणाली.
या दिवसात मोबाईल अत्यावश्यक गरज होती आणि घराघरात होती ,त्याचप्रमाणे तिच्या घरातही ती होती, पण सगळ्यांनी, आपली मर्यादा आखून घेतलेली होती. पण तरीही कधीकधी अर्हमला याप्रकारे जास्त वेळ मोबाईल खेळायला हवा असायचा आणि जिनमातीला त्याला समजावता समजावता नाकी नऊ यायचे.
“हे बघ! आता माझा पण मोबाईल वापरण्याचा वेळ संपलाय. बरं का! कोणीतरी अर्जंट कॉल केला किंवा काही महत्त्वाचा मेसेज असेल तरच, मी मोबाईल बघणार आहे. आपण दोघांनीही, आता उद्या सकाळपर्यंत मोबाईल बघायचा नाही. काही तातडीचे काम असल्याशिवाय, असं ठरवल्यावर
आई ही आपल्यासोबत असा संयम धारण करते आहे, कळत नकळत अर्हमच्या मनावर ठसत होतं, आणि संयम जीवनात महत्त्वाचा आहे याचं बाळकडू त्याला मिळत होतं.
संयम म्हणजे स्वंयशिस्त.स्वतःवर नियंत्रण.स्वतःवरील नियंत्रण ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली म्हणायला हरकत नाही. आचार्य शांतीसागर महारांजांचाही मौलिक उपदेश आहे,”भिऊ नका. संयम धारण करा.”
भाग्यश्री मुधोळकर