शौच धर्म पालनाची गरज
१.नवीनच फॉल पिको होऊन साड्या, आल्या. ब्लाऊज शिवून झाले. ते साड्या आणि ब्लाऊज, जिनमतीने स्वच्छ धुवून घेतल्या. उद्यापासून सुरू होणाऱ्या महिन्यात ती ,त्या वापरणार होती.
दुसऱ्या दिवशी रखमा जेव्हा कामावर आली. जिनमतिने, आपल्या वापरण्यातल्या, चार साड्या तिला दिल्या.
“अहो ताई,!अजून नवीनच तर आहेत साड्या. लगेच काय मला देताय ताई ?”जखमाने विचारले.
“अगं मी आजपासून चार नवीन साड्या वापरण्यात काढणार आहे, त्यामुळे कोणत्यातरी चार जुन्या साड्या मला कमी करायच्या आहेत. ने तू या साड्या .”
अर्हम तिथेच खेळत होता आणि दोघींचा संवाद ऐकत होता. आपल्या खेळण्यातल्या दोन जुन्या गाड्या, तो हातात घेऊन आला.
“रखमा मावशी! तुमच्या दामूला खेळण्यासाठी न्या या दोन गाड्या. काल बाबांनी माझ्यासाठी, दोन नवीन गाड्या आणलेल्या आहेत खेळायला.”
कृतीतूनच जिनमतीने शौच धर्माचे संस्कार ,जास्त वस्तू जमा करून न ठेवण्याचे, हव्यास कमी करण्याचे, संस्कार अर्हम वर केले होते.
२.जानेवारी महिना सुरू झालेला होता. सौरभ ने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या, 50000 चे 75000 झाले होते. आपल्याला पुरेसा फायदा झालेला आहे, हे लक्षात घेऊन तो आज सर्व शेअर विकून टाकणार होता. पुन्हा मार्केट थोडं खाली येण्याची वाट बघणार होता. फायदा इतर गरजांसाठी वापरणार होता.
त्याने आपला मित्र माधवला फोन करून, हे सांगितले.तसेच तुझी इच्छा असेल तर ,झाला तेवढा फायदा पुरे असा विचार करून तुझेही शेअर्स विक असा सल्लाही दिला.
माधवने उलटे सौरभला सुनावले,” अरे अजून दोन-तीन महिने थांब. तुझेही अजून दीडपट पैसे तर नक्कीच होतील.”
पण सौरभने मात्र एवढाच फायदा कमवायचा ,हे आधीपासून पक्क ठरवलेलं असल्यामुळे ,त्याला अजून कमाईचा लोभ निर्माण झाला नाही .त्याने ठरवल्याप्रमाणे केले .
अर्थातच नंतर फेब्रुवारी-मार्चमध्ये मोठ्या प्रमाणावर मार्केट खाली आले आणि माधवला, जास्त फायद्याच्या मागे धावण्याचा पश्चाताप झाला.
अशाप्रकारे स्वतःच्या फायद्यालाही ,मर्यादेत बांधून घेणं, हे शौच धर्माचे पालन करणं आहे,असं आपण म्हणू शकू का?
३.”आता ही पन्नास हजाराचे एफडी झाली की , आयुष्य एन्जॉय करायला सुरुवात करेन”
वंदना, अनघाला सांगत होती.
वंदना अगदी काटकसरीने आयुष्य जगणारी. कामाला बाया नाहीत, वॉशिंग मशीन सारखे उपकरण नाही नाही.
वंदनाचा नवरा ,चांगलं कमवत होता, पण वंदनाला पैसे जमा करण्याचा सोस.घरातले कंटाळले होते तिच्या वागण्याला.
“वंदना गेल्यावर्षी पण तू असंच म्हणाली होतीस 30000चीएफडी करतांना. आता 50000 टारगेट केलं. कुठे थांबायचं हे कळायला हवं ! बचत महत्वाची, पण त्यासोबतच आयुष्याची मजा घेणेही महत्त्वाचे. थांबव थोडा बचतीचा सोस .थोडसं तब्येतकडे बघ. घरातल्यांचा आनंद यांच्याकडे बघ .”
पैसे येत जात राहतात , वेळ परत येत नाही. गेलेले क्षण तरत येत नाही.
शौच धर्माचे पालन वंदना शिकेल का?
४.अस्मिता खरेदीला निघाली नणंदेच्या मुलीसाठी तिला गिफ्ट घ्यायचं होतं.
अनघा गिफ्टने खुश होणार ,याची खात्री होती. बाजारात आलोच आहोत, तर अजूनही काही बघूया, असे म्हणूनती खरेदी करत गेली.
स्वतः कमावती होती ,घरात स्वतःचा कमावलेला पैसा विशिष्ट प्रमाणात घरात देऊन उरलेले बचत कर ,नाहीतर खर्च कर,अशी भूमिका.
खरेदी करताना आपल्याला असलेली गरज लक्षात घेऊन, ज्या वस्तू आपण खरोखरच वापरणार आहोत ,त्या विकत घ्यावं याचं भान अस्मिताला नव्हतं .खरेदी करतांना कुठे थांबायचं हे कळतच नव्हतं.
पण अगदि साधी रहाणी असणारी ,मोजक्या वस्तू घरात असणारी आवश्यकता बघून खरेदी करणारी वैशाली शेजारी रहायला आली. तिच्या संगतीने कुठे थांबायचं ,अस्मिताला जमायला लागले.
वैशाली कळतनकळत अस्मिताला शौचधर्म शिकवत होती का?
आहे त्यात समाधान मानणे, दुसर्याशी तुलना करुन दुःखी न होणे,जास्त हव्यास न करता,खर्या गरजा ओळखून, योग्य प्रकारे आपली शारिरीक,मानसिक,आर्थिक क्रयशक्ती वापरणे,थोडक्यात ‘लोभाला पापाचा बाप ‘ ओळखणे हाच शौचधर्म आहे.
भाग्यश्री मुधोळकर