“अग आई तू नवीन फ्लॅट घ्यायचा कशाला विचार करत आहेस. आपला आहे की चांगला टू बीएचके. मजेत राहतो आपण. अजून एक फ्लॅट कशाला वाढवतेस.””अरे इन्व्हेस्टमेंट म्हणून समज ”
“अगं पण उगाचच, आपण लोनचे हप्ते वाढवून ठेवतोय. आत्ता आपण, या फ्लॅटचे लोनचे हप्ते भरतोय, थोडे बाबा भरतात,थोडे मी भरतोय. नवीन फ्लॅट ,तू तुझ्या सेव्हिंगमधून, तुझ्या साठवलेल्या पैशातून,आणि तुझ्या आॅफिसमधून लोन काढून घेणार आहेस म्हणते,तोही छोटा वनबीएकके. कशाला वाढवते आहेस जवाबदारी?” त्यापेक्षा थोडी मजा कर, थोडं फिरायला जा, काही स्वतःसाठी दागदागिने कर .तुझे साठवलेले पैसे वापरून कशाला फ्लॅट घेते आहेस ?”
माझा लाडका लेक मला विचारत होता.खरंतर स्वारी खुशीत होती. गेले दोन-तीन वर्ष बाबांना आपल्या पगारातून ,फ्लॅटचे हप्ते फेडण्यात मदत करण्याचा आनंद उपभोगत होती. आणि आता आम्ही त्याला 26 वर्ष पूर्ण झाल्यावर ,त्याच्यासाठी वधू संशोधन सुरू केलं होतं.अर्थातच वधू संशोधन सुरू करण्याआधी, त्याला बाहेर तुझं कोणावर प्रेम आहे का ,आमचा काही विरोध नसेल ,याची विचारणा केली होती. त्याने ,”काहीच नाही तुम्ही, तुमच्या पसंतीने मुलगी शोधा आणि मग आपण ठरवू “असं सरळपणे सांगितलं होतं .त्यामुळे सध्या माझं वकीकडे वधू सशोंधन जोरात सुरू होतं आणि त्याच बरोबर दुसरीकडे ,वेगळा छोटा फ्लॅट घेण्याचा विचारही. पुढेमागे आपलं सुनेशी नाही पटलं तर ,आपण त्या छोट्या फ्लॅटमध्ये राहायला जाऊ आणि त्या दोघांना इथे राहू देऊ. असा विचार आम्ही दोघ करत होतो .
आता ही गोष्ट सरळ सरळ मुलाला तोंडावर सांगणं ,मला अवघड वाटत होतं .
तरी शेवटी हिम्मत करून सांगितलं त्याला.”अरे आता तुझं लग्न होणार ,समज तुझ्या बायकोचं माझं नाही पटलं ,तर मग आम्ही त्या छोट्या घरात राहू, तुम्ही दोघं रहा या घरामध्ये ,म्हणून घेऊन ठेवते मी हे घर ”
माझं बोलणं ऐकून ,माझा मुलगा खो खो हसायला लागला, म्हणाला, “अग आई ,मी तुझ्या पसंतीने, बाबांच्या पसंतीने लग्न करणार आहे. तुम्हाला जी मुलगी आवडेल, ती मला जीवनसाथी म्हणून पसंत असेल ,मग अशा वेळेला माझं आणि तिचं पटेल की नाही याची तुम्ही चिंता केली पाहिजे,तर तुम्ही तिचं आणि तुमचं पटेल की नाही याची चिंता करत आहात.आधी तुमच्याशी ताचे पटेल का याचा अदांज घ्या.मीही माझं तिच्या आईबाबांशी जमेल का बघेन.मग ठरवू लग्न.”
त्याचा विचार ऐकून क्षणभर मलाही हसू फुटलं ,खरंच होतं की त्याचं म्हणणं मी त्याच्यासाठी बायको शोधणार ,आणि माझं तिच्याशी पटेल की नाही,याची शंका घेणार, तिने आणि मी चर्चा करुन ,आपण एकत्र राहायचं ,हे ठरवणं गरजेचं होतं. त्यावेळी मी तिचं माझं पटणार नाही ,असं गृहीत धरून दुसरं घर आधीच तयार करून ठेवत होते. स्वतःसाठी, खरंच थोडंसं चुकत होतं माझं.
माझ्या मुलांनी माझ्या विचारांना एक वेगळीच दिशा दिली. लग्नाआधी आपण मुला मुलीची पसंती महत्त्वाची ठरवतो, त्या दोघांचे विचार जुळतात का, ते एकत्र राहतील का याचा विचार करतो ,त्याचबरोबर तिचं आणि आपलं जमणार आहे का, ती आपल्या सोबत राहील का, तिच्या आपले विचार जुळतील का, याचाही विचार करायला हवा. लग्न ठरवण्याआधी फक्त मुलगा मुलगीच नव्हे तर, मुलाचे मुलीचे आई-वडील, या सर्वांनीच एकत्र येऊन चर्चा करून ,आपण सर्व फॅमिली ,कुटुंब होणार आहोत ,सगळे मिळून एकत्र ,नीट ,मजा करत आनंदाने राहू शकतो का? याचा अंदाज घ्यायला हवा आणि नंतरच लग्न ठरवायला हवं असं मला आता वाटत आहे .
हल्ली साधारणतः एकुलता एक मुलगा आणि एकुलती एक मुलगी असते .अशा वेळेला त्या दोघांनीही, आपापल्या ,आईवडिलांची आणि एकमेकांच्या आईवडिलांची ,जबाबदारी घेण्याची तयारी ठेवायला हवी. आणि त्यामुळेच लग्न ठरवताना, फक्त मुलगा-मुलगी यांनी आपलं एकमेकांशी पटेल की नाही, याचा विचार न करता, आपले एकमेकांच्या,आईवडीलांशीही , पटेल की नाही, याचा विचार करायला हवा, म्हणजे मुलीच्या माहेरच्यानाही जावयाचा आधार राहील आणि मुलाच्या आई-वडिलांनाही सून आपलीच वाटेल.
एवढचं नव्हे,तर व्याहीही एकमेकांशी जिव्हाळ्याचे नाते जोपासतील.
©भाग्यश्री मुधोळकर