पुण्यात्मा जींवधर -2
©भाग्यश्री मुधोळकर
भाग २
सुधर्म गणधरांनी सांगायला सुरुवात केली.” हे राजन! मी आता तुला जीवंधर यांच्या जीवन चरित्राची कथा सांगायला सुरुवात करत आहे. या भारत वर्षामध्ये कलिंग प्रांतामध्ये हे हेमांगद मंडळ म्हणून खूप संपन्न भाग आहे. त्या भूमीमध्ये अनेक सोन्याच्या खाणी आहेत.त्या भागामध्ये राजपुरी नामक एक सुंदर नगर आहे .राजपुरी नगरमध्ये खूप मोठ मोठे भव्य महाल ,स्वच्छ तसेच लांब आणि रुंद रस्ते ,आणि खूप मोठे बाजार आहेत.
राजपुरी नगरीमधील व्यापारी नीतिमत्तेने व्यापार करतात.नगराला सुरक्षित करण्यासाठी चोहोबाजूला उंच तटबंदी आहे. त्याच्यावर पहारेकरी उभे असत. त्या तटबंदीजवळ. स्वच्छ जलाशयाने भरलेला खंदक आहे. त्यामुळे बघणार्याला असे वाटत होतं की, त्या तटबंदीने, आपल्या आकाराला पाहण्यासाठी स्वच्छ दर्पण ठेवलेला आहे .या तटबंदीच्या चार दिशेला ,चार गोपुर होते. राजपुरीतील , जनता शिक्षित, सभ्य, धार्मिक आणि संपन्न आहे, दीनदुःखी मनुष्य तिथे दिसत नाही.
या नगरीचा ,नीती आणि न्यायाने शासन करणारा ,संत्यधर नावाचा राजा होता .सत्यधर खूप गुणी आणि पराक्रमी राजा होता. आपल्या नावाप्रमाणे सत्यवादी होता .आपल्या नीतिनिपुणतेमुळे, तो प्रजेला कोणतेही कष्ट होऊ देत नसे. तो प्रख्यात वीर होता, त्यामुळे आजूबाजूचे ,कोणतेही राजे, संत्यधराच्या राज्य सीमेवर, आक्रमण करण्याचे साहस करत नसत. राजा स्वतः सुंदर,शूर आणि गुणांची खाण होता. सदाचारी लोकांचा आदर करणारा होता. त्याच्या मंत्रीमंडळात ,कुशल राजभक्त आणि विद्वान मंत्री होते. अशा प्रकारे संत्यधर खूप सुखाने राज्य करत होता.
संत्यधर राजाला अनेक राण्या होत्या ,पण त्यात विजया नावाची एक राणी देवीप्रमाणे सुंदर होती. तिचा स्वभाव खूप कोमल आणि दयाळू होता. वाणी गोड होती. ती पतिपरायण आदर्श पत्नी होती. तिच्या शारीरिक सौंदर्यासोबत, हृदयातील पवित्र प्रेम आणि ललित वाणी ,यामुळे राजा संत्यधराला ,तिचे खूप आकर्षण होते. या आकर्षणामुळे ,ती संत्यधराची अत्यंत प्रिय राणी होती.
तिच्या प्रेमात राजा संत्यधर , आकंठ बुडाला होता.
त्याचं राज्यकारभाराकडे दुर्लक्ष व्हायला सुरुवात झाली. त्याच्या मंत्रीगणाने , राजा संत्यधराला ,समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु राजा संत्यधर, कामवासनेच्या अधीन झाल्यामुळे, काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता,
परंतु मंत्र्यांनी त्याचे राज्यकारभाराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
पण राजाने थोडा वेगळाच निर्णय यावेळी घेतला. त्याच्या राज्यांमध्ये ‘काष्ठांगार’ एक लाकूडतोड्या होता. तो बुद्धिमान आणि कार्यकुशल होता. त्याच्या या गुणांनी प्रभावित होऊन ,राजाने आपल्या , राज्यातील सर्व निर्णय आता हा काष्ठागांर घेईल ,असं आपल्या मंत्रिमंडळाला सांगितलं .
राज्याचे संचालन एक लाकुडतोड्या करणार , ही गोष्ट जेव्हा राजाच्या नितीपरायण मंत्र्यांना कळली, तेव्हा राजाची ही कृती, राज्यासाठी खूप हानिकारक आहे ,हे त्यांच्या लक्षात आलं ,आणि त्यांनी राजाला समजावण्याचा प्रयत्न केला.
” हे राजन! फक्त बाहेरील, शत्रूंना जिंकून राज्य कार्य चालत नाही. राजाला सर्वात आधी, आपल्या आतील शत्रू, काम क्रोध ,मोह, मद .लोभ आणि आळस यांना जिंकलं पाहिजे .जो राजा या शत्रूंना जिंकू शकत नाही ,तो कधीही राज्य सिंहासनावर स्थिर राहू शकत नाही. गृहस्थाला- धर्म, अर्थ ,काम या तिन्ही पुरुषार्थांचे ,योग्य वेळी आणि योग्य नियमाने, सेवन केले पाहिजे. धर्म पुरुषार्थ म्हणजे धर्मकार्य देवदर्शन,गुरुपास्ती,स्वाध्याय,नियम पालन करणे. ,अर्थ म्हणजे धनसंचय करणे आणि राज्य करणे, तसेच काम इंद्रियाची तृप्ती, भोग उपभोग करणं ,हे सारे गृहस्थधर्म आहेत. धर्म साधने शिवाय, अर्थ संचय आणि काम सेवनात ,यश मिळत नाही, म्हणून रोज योग्य वेळी देव पूजन, गुरु दर्शन ,शास्त्र ,अभ्यास ,आत्मचिंतन, दान आणि उपकार ,हे धर्म कार्य केलं पाहिजे. अर्थ संचयाच्या वेळेला, राजाने राज्य कार्य ,न्याय पूर्वक राज्य संचालन केले पाहिजे. या नंतर काम सेवन केले पाहिजे .तिन्ही पुरुषार्थातील, एका पुरुषार्थाचा सेवन केलं ,आणि इतर दोन पुरुषार्थ सोडले ,तर गृहस्थाश्रम चालणार नाही.”
मंत्री गणांनी राजाला ,नानापरीने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण राजा विषय कामातूर झालेला होता. त्यावेळेला मंत्रीगणाने , सांगितलेले चार मोलाचे शब्दही, त्याला काहीच समजले नाही.
तिकडे काष्ठांगाराने हातात अधिकार येताच, राज्यातील सर्वांवर ,आपला अधिकार गाजवायला सुरुवात केली. आणि राज्यावर पूर्णपणे ताबा मिळवला, आणि आता त्याच्या मनात विचार यायला लागला,
” जोपर्यंत राजा संत्यधर जिवंत आहे ,तोपर्यंत मी राजाचा सेवकच म्हणवला जाईल, खरतर माझी शक्ती ,आता राजापेक्षाही जास्त आहे ,आणि आता मला या राज्याचा अधिपती, व्हायचे आहे ,पण मी अशी काहीतरी युक्ती केली पाहिजे ,ज्यामुळे माझं कामही होईल आणि जनताही माझ्याविरुद्ध होणार नाही,काय बरं करावे?”
इकडे कांष्ठागार असा विचार करत होता आणि तिकडे राजा संत्यधर आपल्या राणीसोबत विषयवासनेत इतका रममाण झाला होता,की त्याला आपल्या भविष्याची काहीही चिंता नव्हती.
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर