आर्जव धर्माचे सार

१}. जिनमती भाजी घ्यायला गेली. सोबत छोटा अर्हम होताच कुठे ना त्याला घरी ठेवणार ?भाजी घेता घेता, तिचा मनात हिशोब चालू होता. भाज्या घेऊन झाल्यावर तिने विचारलं, “राम प्रसाद किती पैसे झाले? ”

“65 रुपये झाले दीदी “रामप्रसाद म्हणाला.

अरे कसला हिशोब करतो. 85  झाले ना. काहीतरी मोजायला चुकलं वाटतं ,तुझं रामप्रसाद !”

पुन्हा हिशोब केला रामप्रसादने. काकडीचे पैसे  धरायचे तो विसरला होता.

तो थॅंक्यु दीदी म्हणाला आणि त्याने 85 रुपये घेतले.

खरेतर गोष्ट शिल्लक होती. पण नकळत अर्हमच्या मनावर, ‘कोणाला कधीही फसवायचे नाही’ हे आर्जव धर्माचे संस्कार झाले हे खरं.

 

२}. आईचा तेरावा दिवस झाला. बाबांच्या पाठोपाठ चार वर्षातच, आईचाही निधन झालं होतं. साधना आणि मेघना यांना पोरकं झाल्यासारखं वाटलं. म्हणायला मोठा भाऊ निलेश होता.पण शेवटी आईबाबा असेपर्यंत माहेर. दोघीही उद्या आपल्या घरी परत जायला निघणार होत्या.

रात्री निलेशने दोघींपुढे पुढेही, काही कागदपत्र सह्यांसाठी ठेवली. वरवर बघता ,त्या आई-बाबांच्या काही संपत्तीचे कागदपत्र होते. दोघीही, आपापल्या घरी सुखी होत्या. आपल्या हयातीत, आई-बाबांनी आपल्याला भरपूर दिले, याविषयी दोघींमध्येही समाधान होतं.आता जे काही आ,हे ते सारं आता निलेशच, ही भावना होती, त्यामुळे काहीही न विचारता, कागदपत्र फारसे न बघत त्या दोघींनी त्यावर सह्या केल्या आणि आपापल्या घरी निघून गेल्या.

निलेशचे आपल्या दोन्ही बहिणींवर खूप प्रेम होते, तरीही व्यवहार तर त्याला बघावाच लागणार होता.

बरोबर एक महिन्यांनी दोघींचाही घरी निलेशचे कुरियर आलेल. निलेशने आई बाबांची, असलेली संपत्ती ,त्याचा हिशोब म्युचल फंड फंड ,सोनंनाणं,शेअर, एफ.डी.,शेतजमिनीतला हिस्सा,सारा सारा हिशोब होता. प्रत्येकीच्या नावाने बारा पंचवीस लाख रुपयाचे चेक निलेशने पाठवले होते.

सोबत एक छानसं पत्रही होतं ,”आई-बाबांच्या संपत्तीच्या वाटण्या केल्या आहेत. जे करणं गरजेचं होतं. तरीही आपलं बहीण-भावाचं नातं कायमच आहे. मी कायमचा तुमचा मोठा भाऊ असणार आहे. तुमच्या यापुढच्या ही ,सर्व सुख दुःखात तुमच्या मागे खंबीरपणे ,मी उभा असणार आहे. आई-बाबा गेले ,म्हणून स्वतःला कधीच परकं समजू नका. मी आणि वहिनी तुमचं माहेर आहोत .आमच्या दोघांच्या अंतापर्यंत .”

निलेशचं पत्र वाचून दोघाघींच्याही डोळ्यात पाणी आलं. लहानपणापासून शिकलेला आर्जव धर्म, निलेशने आचरणात आणला होता इतकंच.

३}.”अहो जयदीप राव थोडंसं मटेरियल कमी-जास्त वापरा, आणि रेट कमी करा. कमी रेट मध्ये काम केलं तर ,भरपूर अशा प्रकारच्या शेड बांधण्याचे काम ,आम्ही तुम्हाला देऊ शकतो.” माणिक शेठ जयदीप ला सांगत होते.

माणिक शेठ मोठे प्रस्थ. नुकतंच सरकारकडून बसथांबे  शेड बनवण्याचं टेंडर मिळालेले. अर्थातच शेडची कामे ,काही स्वतः काम करणार नव्हते .जयदीप सारख्या सबकाॅट्रॅक्टरकडुन काम करून घेणार होते.

“नाही शेडसाठी कमी प्रतीचे मटेरियल मी वापरणार नाही. शेवटी लोकांच्या जीवाशी मला खेळ करायचा नाही. चार पैसे कमी मिळाले ,किंवा नाही मिळाले तरी चालेल, पण मी कामाच्या गुणवत्तेत कुठलीच तडजोड करणार नाही.”जयदीप ठासून म्हणाला.

“अरे जयदीप राव तुम्ही नाही केला, तर दुसरा कोणी पण तयार होईल, कमी रेट मध्ये करायला ,काय फरक पडणार आहे. तुम्हाला मी सांगते ना, मेटरियल  कमी प्रतीचे वापरा म्हणून. “माणिक शेठ ने जयदीपला प्रलोभन दाखवायचा प्रयत्न केला.

“नाही शेठ !हे माझ्या तत्वात बसतच नाही. मी काम केलं तर चांगलं, प्रामाणिकपणे आणि योग्य गुणवत्तेचे करेन. तुम्हालाही असंच सांगेन कि चार पैसे जास्त कमवण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ करू नका.”

माणिक शेठ तसंही काम जयदीप कडूनच करून घेणार होते. कारण गेली पाच वर्ष जयदीपला वारंवार कितीही प्रलोभन दाखवले, तरी तो गुणवत्तेत कधीच तो तडजोड करत नसे. नि त्याचे काम उत्कृष्ट असे, त्यामुळे माणिक शेठनाही सरकार दरबारी चांगलं वजन होतं, अर्थात काम जयदीपलाच मिळालं.

तो त्याच्या  जैन धर्माने शिकवलेला आर्जव धर्म पाळत होता का?

 

रोजच्या जीवनात अनेक छोटी मोठी प्रलोभन, आपल्याला छोट्या मोठ्या फसवणुकी करण्यासाठी भाग पाडत असते. त्यापासून दूर राहुन, प्रामाणिकपणे जास्त लोभ, न करता प्रामाणिकपणे आपलं काम करणे,  कळत नकळत ,कोणाला फसवण्याचा भाव मनात न आणणं,फसवण्यासाठी कारणे न शोधणं , हे आर्जव धर्माचे सार आहे असं वाटतं .

 

भाग्यश्री मुधोळकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *