जीवनगाणे
©भाग्यश्री मुधोळकर
” अहो त्या मेडिकल वाल्याला फोन करा ना घरी आणून देतो का तो औषधे सांगा त्याला. ”
“खरेदी करायची होती.एकटीलाच जावे लागणार.”
“अग गाण्यांचा कार्यक्रम आहे, येतेस का? माहित आहे नाही आवडत तुला, पण कोणाला विचारणार? सोबतीला.”
“आता दोघांपुरता भातुकलीचा स्वयंपाक वाटतो. काय बनवायचे नि किती खायचे.”
“खरंच या वयात आपण दोघंच दोघं किती गप्पा मारणार ग लहानपणी भाऊ आणि ताईसोबत करत होतो मजा. आता तेही दोघं दोघं एकटेच तसे.”
ज्यांची मुले परदेशी ,शहरात, आहेत, त्यांच्या घरात हे संवाद नेहमीचेच.
सध्या समाजात सर्वत्र छोट्या किंवा एकल कुटुंबाचा वावर दिसत आहे .न्युक्लियर फॅमिलीच म्हणा ना. किंवा मिनी ,मायक्रो काहीही.मुलं-मुली नोकरीच्या निमित्ताने शहर गावी किंवा बहुतेकदा परदेशात आणि आई-वडील गावी किंवा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी एकटेच.
आतापर्यंत नोकरी व्यवसाय किंवा जगण्याच्या धावपळीमध्ये, मुलांना सांभाळण्यात, त्यांना मोठं करण्यात कसा वेळ गेला, ते कळलंच नसतं .साधारणतः पन्नाशीनंतर संपन्नता आणि जीवनाला स्थिरता आलेली असते, आणि अशा वेळेला मुले-मुली आपल्यापासून लांब असतात.तीही बहुतेकदा एकुलती एकच.
वेळही खूप जास्त असतो आणि घरातली कामं कमी. त्यामुळे स्त्रिया आणि पुरुषांकडे , दोघांकडेही वेळ भरपूर असतो, पण सोबत मात्र नसते.
अशावेळी मग टीव्ही सिरीयल ,मोबाईल, फेसबुक, व्हाट्सअप ,इंस्टाग्राम ,युट्युब ,टेलिग्राम असे विविध ग्रुप मदतीला येतात आणि मोबाईल वरचे गेम सुध्दा.
कधीतरी मुलांशी फोनवर बोलणे होते. व्हिडीओ कॉलिंग होते, परंतु माणसं आजूबाजूला वावरण्याचे, जे सुख असतं, याला मात्र आपण आता मोठ्या प्रमाणावर पारखे झालो आहोत. त्यांच्याशी होणाऱ्या गप्पागोष्टी ,हास्यविनोद ,सोबत होणारे खाणं-पिणं, वेगवेगळ्या चर्चा ,याची तुलना मोबाईल काॅल, व्हिडिओ कॉलिंगशी खरंच होऊ शकते का ?
अशा परिस्थितीत खुपदा, हे 50 ते 75 वयोगटातले स्त्री-पुरुष डिप्रेशननला बळी पडतात ,न दिसणारे मनातले विचारांचे आजार ,त्यांचं मनाप्रमाणे, शरीरही पोखरून काढते.
पैसा असला की सारं काही विकत घेता येतं ,असा काही वेळेला समज असतो. परंतु बऱ्याचदा पैशांत सोबतच माणसांना ,माणसांची सोबत हवीशी वाटत असते.
पूर्वीच्या काळी राजे लोक किंवा सामान्य लोकही एका विशिष्ट वयानंतर ,थोडं वार्धक्याकडे झुकल्यावर, वानप्रस्थाश्रम अवलंबत असंत.पण त्यातही एकटेपणा नसावा. कुठल्यातरी ऋषी मुनींच्या आश्रमात आणि माणसांच्या सानिध्यात वानप्रस्थाश्रम, सुखकर होत असावा असं मला वाटतं.
आजच्या काळात शक्य आहे का असा वानप्रस्थाश्रम ?
माझे विचार कोणाला कितपत प्रॅक्टिकल वाटतील माहित नाही, पण मनात आलं तर लिहावं असं वाटत आहे.
आजचे पन्नाशी पंच्याहत्तरीच्या दरम्यान चे लोक आहेत, त्यांना बहिण-भाऊ किंवा विहीणईभाई, म्हणजे मुलाचे किंवा मुलीचे सासू-सासरे ,इतपत नातेवाईक आहेतच. अगदीच काही नाही तर, चुलत ,आते,मामे ,मावस भावंड आहेतच ना. एकमेकांना जर शक्य असेल ,ते एकाच गावात किंवा शहरात राहत असतील तर ,अशा तीन-चार कुटुंबांनी एकत्र राहून बघायला काय हरकत आहे. किचन आणि कॉमन खर्च वाटून घेता येईल .औषध गोळ्यांचे आणि इतर पर्सनल खर्च ज्याचे त्याने करावे.
त्यावेळेला आपले राहते घर छोटे आहे ,असं वाटू शकतं, पण तीन-चार फॅमिली एकत्र राहणार असेल तर ,एखादे मोठे घर भाड्याने घेता येऊन ते भाडं ही वाटून घेता येईल का? याचा विचार करून ,चक्क राहते घर ,स्वतःच्या मालकीचा असले तरी ,भाड्याने देऊन असं एकत्र राहण्याचा प्रयोग करायला काय हरकत आहे?
कामवाल्या मदतनीस बायका व्यक्ती मिळतीलच की. बायकांना बायकांची सोबत आणि माणसांना माणसांची. कामातून हवा असणारा निवांतपणा आणि सोबत, दोन्ही गोष्टी यातून साध्य होऊ शकतील. लांब असणाऱ्या मुलाबाळांचं दुःख कमी होईल आणि मुलं-बाळं सुट्टीत वगैरे घरी आली तर करतील अॅडजस्ट. एवढी काळजी कशाला करायची?
एकमेकांचं दुखलं-खुपलं ,सुखदुःख वाटून घेता येईल. एकमेकांना मदत,आधार होईल. शारिरीक आणि मानसिकही. एकमेकांच्या सवयींना ,ॲडजस्ट करताना कदाचित होईल थोडा त्रास, पण असं एकत्र मोठ्या कुटुंबाचं सुख एका बाजूला मिळेल ,त्याच्यापुढे थोडं दुर्लक्ष नाही का करता येणार याच्या कडे ?
ही सर्व माझी वैयक्तिक मते आहेत. साधारण दहा-बारा वर्षांनी ,अश्या कोण्यातरी दोन-तीन फॅमिलीची सोबत शोधून, त्यांच्या सोबत जमवून घेत आधुनिक वानप्रस्थाश्रम जगायला आवडेल मला.
बघुया येईल का असा योग?
भाग्यश्री मुधोळकर
खूपच चांगला विचार आहे असं करून बघायला खरच काहीच हरकत नाही
खुप चांगली कल्पना आहे ???