१}. “कसं होणार यंदा! मंदिर साठी फंड कसा जमा होणार,काही कळतच नाही.”
विरागपंडितजी निराश झाले होते.
गावातील आदिनाथ मंदिर येथे ,पंडितजी म्हणून कार्यरत असणारे विरागजी. लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये सर्व श्रावकांना, जाण्याची परवानगी नव्हती. पुजारी आळीपाळीने जाऊन मंदिरात भगवंतांचा अभिषेक आणि पूजा करत होते.
दर वर्षी पर्युषण काळामध्ये, हजारोंनी दान मंदिरात जमा व्हायचं आणि पुढे ते बऱ्याच विकास कामांना आणि मंदिराच्या नियमित खर्चासाठी, वापरले जायचे. यंदाच्या वर्षी काही मोजक्या श्रावकांच्या दानावरती जेमतेम खर्च भागत होता. पंडितजींचा बोल्यांमध्ये , असा हातखंडा होता की श्रावकांना ते आपल्या मधुर वाणीने दानधर्म करायला ते प्रवृत्त करायचे. याविषयी त्यांना अभिमान होता.
त्यांची मनाची घालमेल, त्यांचा मुलगा सुरज च्या लक्षात आली. एक तर त्यांची लोकांना ज्ञान देण्याची जी लालसा होती, ती या काळात पूर्ण होत नव्हती, आणि आपण मंदिराला दान जमा करून देऊ शकणार नाही, याविषयी खंतही वाटत होती.मंदिरात काही मानही मिळणार नव्हता. त्यांचा अभिमान त्यावर्षी जोपासला जाणार नव्हता
सुरज म्हणाला,” बाबा यंदाच्या वर्षी ,आपण तुमची ऑनलाइन प्रवचने ठेवूया. आपल्या मंदिराच्या श्रावकांचा व्हाट्सअप ग्रुप आहे. त्यावर युट्युब वरच्या प्रवचनाची लिंक देऊया. प्रवचनासाठी स्पॉन्सरर होण्यासाठी श्रावकांना आवाहन करूया. प्रवचनावर आधारित आपण क्विज कॉन्टेस्ट ठेवूया. त्याच्यासाठीही दानदाते शोधूया. जमा होणारा फंड मंदिरात जमा करु.”
सुरजची कल्पना पंडितजींना भावली. फक्त आपणच , दान जमा करण्यासाठी प्रयत्न करतो, हा अहंकार गळून पडला. आणि त्यांनी सुरज कडे कृतज्ञतापूर्वक पाहिलं .आयटी क्षेत्रातल्या आपल्या मुलाकडे हे सारं तंत्रज्ञान आहे, त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळातही, ते सर्व श्रावकांपर्यंत पोचू शकणार होते, आणि मंदिरासाठी दानही जमा करू शकणार होते.
पण हे आपल्या एकट्याच श्रेय नाही आपला मुलगाही मदतशील आहे, याची नकळत सारे त्यांना झाली होती. हाच तर मार्दव धर्म होता का ?
२}. “बाई बाई बाई बाई बाई कसा होणार यंदा पर्युषण पर्व?” जिनमती आपल्या दुखर्या उजव्या हातावर हात फिरवत होती. पर्युषणाच्या आठ दिवस आधीच, घरातच घसरून पडल्याचे निमित्त झालं आणि उजवा हात फॅक्चर. घरात नुकतीच दोन महिन्यापूर्वी लग्न होऊन आलेली सून होती. ती मनोभावे सेवा करत होतीच. हॉस्टेल वर राहिलेली सून देवाधर्माचं आणि पर्युषणाचं काय महत्त्व असणार? यंदा दहीवडे, अनरसे, गुंजे ,पेढे ,सारं काही करायचं राहिलं. घरातही वर्क फ्रॉम होम सांभाळून ,आपल्या सुनबाई काय कप्पाळ पूजा करणार जिनमती मनातल्या मनात विचार करत होती.
दर वर्षी आपण ,खूप छान साग्रसंगीत पूजा करतो. खूप सारे व्रते करतो आणि आपल्याला खरा धर्म लाभ होतो. वर्षभराचं पुण्य जमा होतं. याचा जिनमतीला अभिमानच होता. आता मात्र गोळ्या औषधांमुळे ,व्रते दूरच ,आणि पूजाही कशी होणार ,याविषयी साशंकता व तिच्या मनात होती.
अक्षया मात्र खूप मजेत होती. पर्युषण पर्व हा तिचा आवडता उत्सव होता म्हणा ना. भलेही तिला कर्मकांडाविषयी फार काही वाटत नसे, पण या दरम्यान वेगवेगळ्या पंडितजींचे प्रवचन ऐकणं, तत्वार्थसूत्र ऐकञं आणि जमेल तशी आईसोबत, पूजा करणे, या दिवसांमध्ये मनाला शांत ठेवणे, ही साधना तिला जमायची .
पर्युषणाच्या आधी दोन दिवस ,तिने देवघर छान पुसून, स्वच्छ केलं. देवाच्या पूजेची भांडी उजळवली.काही शास्त्रांना छान कव्हर घातले. थोडेसे कलाकुसरीच्या वस्तूंनी देवघराची सजावट केली.
साधेसे खोबरा किसाचे सुबक चरं तयार केले.इतर तांदूळ, बदाम ,खारीक ,किस्मिस, अक्रोड, लवंगा अशी कोरडी पूजेची ,सर्व तयारी केली.
जिनमती पहात होती.तिच्या उत्साहपूर्ण तयारीकडे.
पर्युषणाच्या पहिल्याच दिवशी, वर्क फ्रॉम होम हाफ डे अॅडजेस्ट केलं जिनमतीला समोर बसवून, छान पूजा केली. देवघरातलं प्रसन्न वातावरण, अक्षयाने गोड आवाजामध्ये, म्हटलेली स्तुतिस्तोत्रे आणि अष्टक ,अर्ध्या पाऊण तासाची,निवांत पूजा, जिनमतिला प्रसन्न करून गेली.नंतर मोबाईलवर,दोघींनी प्रवचन ऐकले. दरवर्षी आपण जी पूजा करतो त्यापेक्षाही, ही पूजा तिला प्रसन्र करणारी वाटली. मान कषाय गळून पडला.
” अक्षया माझ्यापेक्षाही खूप छान पूजा केलीस, आणि देवघर खूप छान आवरलं हो!” अशी पावती सुनेला देऊन, त्या मोकळ्या झाल्या.
ह्यालाच तर मार्दव धर्म म्हणायचं का ?
आपल्याशिवाय सार्यांचं अडतं, माझ्याशिवाय घरात,कधी कधी समाजात, व्यवसायत कोणाचे पान हलत नाही.अशी भावना मनात असते,
पण आपल्यापेक्षाही काहीतरी चागंले ,कोणीतरी गुणी,वरचढ असणारच, याचा मनोमन स्विकार, हेच मार्दव धर्माचे मर्म असावे असे वाटते.
भाग्यश्री मुधोळकर