आत्ताच पु ल देशपांडे यांचं “माझे जालिम शत्रू’हे कथन ऐकलं आणि मलाही माझे ‘लाॅकडाऊनच्या काळातले माझे शत्रू ‘असं तुम्हा सगळ्यांसाठी सांगावसं वाटतंय.अर्थात हे मी घरात बसूनच करतेय बरंकोणत्याही गोष्टीची सुरुवात ,आपल्या घरापासूनच होते, असं म्हणतात, त्याप्रमाणे अर्थातच यातले बरेच शत्रू ,आपल्या घरातच आहेत, याची जाणीव मला यानिमित्ताने झाली.
पती राजांनी वर्क फ्रॉम होम घेतलेलं आहे आणि मुलगाही घरूनच काम करत आहे. दोघांनीही मला भरघोस मदत करायचं ठरवलं, मीही त्यांच्याकडं व्यवस्थित काम करून घेण्याचं ,प्लॅनिंग केलं होतं. पण बहुतेक त्या दोघांचा गनिमीकावा जास्त वरचढ ठरला आणि मला ‘मदत नको पण पण पसारा आवर ‘असं म्हणायची वेळ आली.
सकाळी उठल्यावर चहा करण्याची जबाबदारी पतिराजांनी घेतली. पण तो करताना , उतु गेलेलं दूध ,गाळतांना ओट्यावर सांडलेला चहा, आणि धडपडीत फुटलेला कप ,आणि चहा करायला लागलेला वेळ या सर्वांनी मला धोक्याचा इशारा दिला आणि मी उद्यापासून, चहा मीच करेन बरं, अशी शरणागती मी पहिल्याच दिवशी स्विकारली.
मुलाने स्वतःची भांडी स्वतः धुण्याची जबाबदारी घेतली होती .पण त्याला लागणारे पाणी आणि साबण बघता ,मला महिनाभराचा साबण आणि पाणी आठ दिवसात संपणार ,याची खात्री पटली आणि मी त्याला बाळा असू दे नंतर शिकवीन मी तुला ,नीट भांडी धुवायला, असे म्हणून त्यालाही’ मदत नको पण पसारा आवर “‘असं म्हणावं लागलं .
दोघांनाही घराबाहेर पडण्यासाठी ,निमित्त पुरवण्याची जवाबदारी मात्र ते ,माझ्या वर टाकत होते,” तुला काही भाजी हवी का ,तुला काही किराणा आणून देऊ का ,”अशी वारंवार विचारणा मला होत होती.
पण मीही खमकी होते .मी दोन महिन्याचं किराणा सामान भरून घेतले आहे आणि दहा दिवसाची भाजी पण आहे ,दूधवाला रोज येणार आहे ,दोघांनीही घराबाहेर पडण्याची गरज नाही, असं ठणकावून सांगितलं .
अर्थातच दोघांकडेही ऑफिसचं काम संपवून बराच शिल्लक राहत होता, मग एकमेकांवर उगाचच डाफरणे, फालतू कारणावरून भांडण करणे, म्हणजे अर्थातच ह्यांना बातम्या बघायच्या असणार आणि पोराला सिरियल्स किंवा पिक्चर आणि या दोघांच्या रिमोटवाॅरमध्ये माझं मात्र सॅंडविच.एकतर आधीच मी पाहत असलेल्या सगळ्या सिरियल्स थांबल्यात.
दोघांनाही पत्ते ,कॅरम ,बुद्धिबळ वगैरे खेळण्यात गुंतवण्याचा, मी इमानेइतबारे प्रयत्न केला, पण पंधरा-वीस मिनिटांच्या वर त्यात बूड टिकेल तर शपथ.
माझ्या लाॅकडाऊनच्या शत्रुपक्षात ,माझ्या काही मैत्रिणी ही आहेत . रोज नवनवीन रेसिपी बनवणार आणि त्याचे स्टेटस ठेवणार, म्हणजे आपल्या तोंडाला पाणी सुटणार आणि चला आपणही बनवून बघू, अशा पद्धतीने आपणच आपले काम वाढवून घेणार.
तसेच साधं सॅलड करायला, नवर्याने मदत केली, तरी एखादा गड जिंकल्याप्रमाणे त्याच्या कौतुकाचे पोवाडे वाॅटसअप,फेसबुकवर फोटो टाकून गाणार, पाहणार्याला न्यूनगंड का काय म्हणतात तो येतो.
नंतर हे बातम्या सांगणारे, तरी बरं सध्या पेपर बंद आहेत,पण सवय आहे ना, त्यामुळे आपण ऑनलाईन तरी पेपर वाचतोच आपण. दिवसातून तीन-चारदा बातम्या बघतो, निवडणुकीच्या निकालांची जसं आमच्या पक्षाला चार तमक्या पक्षाला दोन, ह्या पक्षाचा उमेदवार, हजार मतांनी पुढे, तो उमेदवार पाचशे मतांनी मागे ,अशा बातम्या देतात, त्या पद्धतीने देशोदेशीचे करोना रुग्ण ,आणि आपल्या देशातले वाढणारे रुग्ण ,अशा पद्धतीने घबराट पसरवणाऱ्या पद्धतीने, बातम्या दिल्या जातात ,त्यामध्ये बरे झालेले रुग्ण किंवा रिकव्हर होत असणारे ,यांचा अगदी ओझरता उल्लेख असतो, त्यामुळे ह्या मीडियावाल्यांना ही, मी माझ्या सध्या शत्रू पक्षातच गणते आहे.तुम्ही बातम्या द्या ,माहिती द्या, तुमची मतं आणि तुमचे अंदाज, आमच्यावर थोपवू नका, असं म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि एखादी गोष्ट वारंवार कानावर आदळली ,ती आपल्याला खरी वाटू लागते, हा मानसशास्त्राचा नियम आहे आणि नसलेले आजारपण पाठीला लागते.
आज जगभर त्याचे थैमान आहे. हे आता जगाने ,भारताने, आपण सगळ्यांनी स्वीकारले आहे आणि त्यातून बाहेर येण्यासाठी आपण काळजीही घेत आहोतच आणि हे संकट आले तसेच निघूनही जाईल यात काही शंका नाही हा लढा आपल्याला यशस्वी करायचा आहे.
लॉक डाऊनच्या ,काळामध्ये काहीतरी फालतू कारणांनी, आम्ही कसे बाहेर पडलो, पोलिसांना कसे चकवले ,असे करून त्याचे किस्से सांगत बसणारे, यांचा तर मी माझ्या शत्रुपक्षात सगळ्यात वरच्या थरावर समावेश केलेला आहे. एरवी बाहेरची कामं सांगितली तर, टाळाटाळ करणारी, घरात बसून राहण्यासाठी शेकडो बहाणे शोधणारे लोक , लोक डाऊनच्या काळात सरकार गंभीर परिस्थिती सांगून, घरी बसायला सांगते, तेव्हा बाहेर फिरायचा, पुरुषार्थ करत आहेत, यांना फक्त माझाच नाही ,तर देशात, जगात शत्रू म्हणायला काहीच हरकत नाही.
यादरम्यान सारखे फोन करुन मानसिक खच्चीकरण करणारे,पुन्हा फोन करायला आपण जिवंत असणार की नाही याची अतिरेकी काळजी असणारे, महाभागही आहेत, शेवटी फोन ठेवतांना,” खोकला वाटतोय तुला काळजी घे “म्हणून शंकेचं पिल्लू सोडणारे असतात.खरंतर फोन लावल्यावर जी करोनाची रिंगटोन आहे ना त्याने आपोआपच खोकला येतो हो .
या शत्रुपक्षात आणखीन एका गोष्टीची भर आहे ,ते म्हणजे सोशल मीडिया ,फेसबुक , युट्युब वर , या काळात प्रचंड प्रमाणात 21 दिवसात आपण कशा प्रकारे कशाप्रकारे टाईमपास करू शकू ,किंवा त्याहूनही जास्त वेळा कशा काय ऍक्टिव्हिटी करता येतील याचा रतीब सुरू आहे.मला वाटते एकवीसच काय एकवीस हजार दिवस घरात बसावे लागले तरी माझे हे व्हिडीयो बघून संपणार नाहीत. लोकं हे किती बघतात माहीत नाही ,पण असे व्हिडिओ काढणार्यांचा वेळ मात्र वेळ मजेत जातोय ,यात काही शंका नाही. अर्थातच तो व्हिडिओ बघायचा की नाही, हा चॉईस माझा असल्यामुळे, या शत्रुपक्षाला गारद करण्यात मी बऱ्यापैकी यशस्वी ठरते.
आधीच घरातली वाढलेली कामं, मदतनीस महत्त्वाची व्यक्ती घरात नसल्यामुळे जाणवणारा ताण आणि आता बाहेरून काही ऑर्डर करणे, मागवणे याच्यासाठी काही वाव राहिलेला नाही ,त्यामुळे घरात स्वतःच्या हातांनी बनवलेलं, स्वतः चारीठाव खात बसणं, यात केवढं मोठं संकट आहे ,हे फक्त मीच नव्हे तर, माझ्या तमाम मैत्रिणींना जाणवत असणारच. त्यात घरात नवरा मुलांच्या विविध फर्माईची भर.
“अगं जरा भजी करतेस का तोंडाला चव येईल
कपभर चहा मिळेल का
थोडे लाडू करतेस का मधे मधे तोंडात टाकायला
मम्मा पाॅपकाॅर्न कर ना
जेवणापेक्षा डिफरंट कर ना”
विविध ठिकाणी, या धी फिरायला गेलेले लोक, त्या जुन्या आठवणींचे फोटो टाकून सोडत असलेले उसासे आणि पुन्हा असं काही अनुभवायला मिळेल की नाही अशी टोकाची ,निराशाजनक मनोवृत्ती बाळगणारे लोकही ,माझ्या शत्रुपक्षात आहेतच. त्याचबरोबर पडणारे शेअर मार्केट,ढासळणारी अर्थव्यवस्था,सरकारची चुकीची धोरणे,येणार्या मदतीपेक्षा कोण मदत देत नाही याचा उहापोह करणारे,आमचाच पक्ष श्रेष्ठ ठासून सागंणारे इत्यादि लोकही या यादीत आहेत.
दिवसभरात केलेली योगासने,प्राणायम,ओंकार,अॅरोबिक्स, नाचगाणी याचे मिनटामिनटाला अपडेट देणारे,पाच दहा हजार गाणी,नाटकाच्या लिंक्स,पुस्तकाच्या लिंक्स पाठवणार्यांचीही एक अभेद्य फळी माझ्या शत्रुपक्षात आहे.या सर्व शत्रुपक्षांच्या मार्याला तोंड देण्यासाठी आता मी माझीही शस्त्रात्रे अर्थात घरात बसूनच मारा करायला सुरुवात करत आहे.
भाग्यश्री मुधोळक
सगळ्यांना येणारे अनुभव ???