महावीर समजून घेतांना…..
अलक
१.
छोटा अर्हम वर्तमानपत्राचा छोटासा तुकडा घेऊन एका मुंगीला त्यावर पकडण्याचा प्रयत्न करत होता.
“अर्हम हे काय करत आहेस ?” त्याच्या आजीने विचारलं “आजी मी या मुंगीला पकडून बाहेर झाडांमध्ये सोडत आहे. आबा नाही का सांगत, कुठल्या जीवाला मारायचं नाही.त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्यायचं. ती चुकून आपल्या घरात आली आहे ना! तर मी तिला पुन्हा बाहेर सोडून देत आहे .”अर्हम भगवान महावीर यांनी सांगितलेल्या अहिंसेचे आणि जगा जगु द्या संदेशाचे पालन करत होता.
२.
” अहो साहेब आज देणार होतात ना तुम्ही मटेरियल. ऍडव्हान्स दिलेला आहे तुम्हाला. दोन दिवस उलटून गेले तरी अजून मटेरियल मिळालेलं नाही.” अजित वर समोरून आरडाओरडा होत होता.
” हो साहेब! परंतु लाईट प्रॉब्लेम आणि वर्कर कामावर काल आले नाही. त्यामुळे मटेरियल तयार झालेलं नाहीये. मी आत्ता स्वतः ,मशीन वर उभा आहे संध्याकाळपर्यंत तुमचं मटेरियल पूर्ण होईल याची खात्री देतो.”
जे आहे ते खरंच सांगण्याचं सत्य बोलण्याचा प्रयत्न अजित करत होता.तसेच संयमाने परिस्थिती हाताळत होता.
३.
” किती झाले माझ्या भाजीचे रामुभय्या?” जिनमतीने भैय्या ला विचारले.
राम भैय्या हिशोब करायला लागला.
” सगळे मिळून दीदी तुमचे 125 रुपये झाले”
जिनमतीही मनातल्या मनात हिशोब करतच होती, घेतलेल्या भाजीचा.
तिच्या लक्षात आलं की 145 रुपये होत आहे. राम भैय्या काहीतरी पकडायला विसरला ,तिने रामूला पुन्हा हिशोब करायला लावला आणि मग 145 रुपये दिले. खरंतर वीस रुपयाचा फायदा सहज शक्य होता, परंतु कळत किंवा नकळत ,कोणाचे पैसे चोरु नये ,हे संस्कार आपोआपच सोबत असलेल्या अर्हम वर झाले होते.
ती सत्यधर्म पालन शिकवत होती.
४.
।आई माझ्या बड्डेला आत्याने ,माझ्यासाठी बघ किती छान ड्रेस आणला. मावशीने ही दिलाय .आता हे जुने दोन ड्रेस आपण शामा मावशीच्या , गुड्डू ला देऊया. त्याचे कपडे किती जुने झालेले आहेत .”छोटा अर्हम आपल्या आईला सांगत होता.
नवीन कपडे घेतल्यानंतर ,आई -आजी आले तेवढेच, जुने कपडे कोणाला तरी देतात, हे त्याने बर्याचदा बघितलेले होते .त्यामुळे आपल्याकडेही नवीन कपडे आल्यानंतर ,जुने देऊन टाकायचे, हे संस्कार नकळतच त्याच्यावर झालेले होते.
अर्हम कळत-नकळत अपरिग्रहाचा पालन करत होता.
५.
कोरोनाचा घातक फेरा, जगावर आला आणि बऱ्याच संसाराची कुटुंबांची राखरांगोळी झाली. अभिषेकची पत्नी आराध्या ,त्याला त्याला सोडून निघून गेली. अवघा पंधरा-सोळा वर्षांचा संसार ,सोबत छोट्या दहा बारा वर्षाच्या मुलीची जबाबदारी. अभिषेकला आता सारं स्थिरस्थावर झाल्यावर ,आराध्याच्या मृत्यूला सात-आठ महिने उलटून गेल्यानंतर ,त्याच्या आईवडिलांनी आणि सासुसासर्यांनी दुसर्या लग्नाचा आग्रह केला, परंतु अभिषेकने स्पष्ट सांगितलं ,
मी आराध्या वर मनापासून प्रेम केलं. तिच्या नंतर दुसऱ्या कोणाला पत्नी म्हणून, विचारही मी करू शकत नाही. मला जेवढं संसारसुख मिळायचं होतं ,तेवढं मिळालं. आता यापुढे, मी जन्मभर ब्रह्मचर्य व्रताचे पालन करणार आहे.” त्याचे विचार ऐकून त्याचे आई वडील आणि सासू सासरे दोघही स्तब्ध झाले.
६.
” मला काही ती जागा आवडलेली नाही. तुला घ्यायची असेल तर घे ,परंतु त्या जागेमध्ये वर्कर मिळायला खूप प्रॉब्लेम होईल .”
रागिनी रोशनला समजावून सांगत होती. फॅक्टरी साठी नवीन जागा घेण्यासाठी, गेले दोन अडीच महिने ते वेगवेगळ्या जागा बघत होते .
“अगं तिथे वर्कर मिळणार नाही ,पण आपल्या जुन्या लोकांना , तिकडे नेण्याची सोय करून ,फॅक्टरी चालू शकतो ,आणि हळूहळू दोन-तीन वर्षात होईल तिथे प्रगती.आणि मग तिथेही मिळायला लागतील आपल्याला वर्कर .असा विचार तू का करत नाहीस?”
खरं आहे.स्वतःची जागा होईल. इतर खर्च गावाबाहेरच्या जागेमुळे खूप वाचेल आणि आपण दोन-तीन ठिकाणी प्रोडक्शन करतो तो व्याप कमी होईल.”रागिणी त्यिचं मत समजुन घेत होती.
एकमेकांची मतं समजून घेत ,आपल्या प्रमाणेच दुसऱ्या समोरच्या व्यक्तीलाही इतर मतं असू शकतात. हा अनेकांत वाद रोशन आणि रागिनी दोघांनाही मान्य होता. त्यामुळे एकमेकांशी चर्चा करत ,सगळे प्लस -मायनस पॉईंट लक्षात घेत ,नवीन फॅक्टरीच्या उभारणीसाठी, त्यांची चर्चा चालू होती.
अर्थातच तो वाद होता, तरी त्यात एक प्रकारचा संवादही होता .कारण दोघांनाही शेवटी एकच ,साध्य करायचं होतं, ते म्हणजे स्वतःची प्रगती. त्यामुळे मतांचा आदर करत ,एकमेकांची मत जाणून घेत, मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. एकापरीने महावीरांनी सांगीतलेल्या अनेकांत वादाची जाणीव ते स्वतःच्या मनात ठेवून होते.
भाग्यश्री मुधोळकर