जींवधर चरित्र -16
भाग १६
भाग्यश्री मुधोळकर
त्या समुद्र किनार्यावर, श्रीदत्त शेठजींना, एक अनोळखी माणूस भेटला. त्या अनोळखी व्यक्तीने श्रीदत्त शेठजींना, त्यांचं क्षेमकुशल विचारलं. श्री दत्तांच्या शेठजींच्या मनामध्ये शोक उफाळुन आला ,आणि त्यांनी आपले, सर्व दुःख त्या आगंतुकांना सांगितलं .
त्या अनोळखी माणसाने त्यांना धीर दिला, आणि सांगितलं,
“सगळ्यात महत्त्वाचा, स्वतःचा जीव आणि निरोगी शरीर असतं. त्या आधारावरच जीवनात विविध अनुभव होत असतात.मुख्य सर्व तुमच्याजवळ आहे. इतर गोष्टी काय पुन्हा मिळवता येतील .आता तुम्ही माझ्यासोबत चला. मी तुमची राजपुरीला पोचवण्याची व्यवस्था करतो. श्रीदत्त शेठजी, त्या अनोळखी , व्यक्ती सोबत निघाले.
प्रवास करत असताना ,त्या माणसाने आपल्या विषयीची माहिती श्रीदत्त शेठजींना दिली. ते म्हणाले,
” विजयार्ध पर्वताच्या दक्षिण भागांमध्ये ,गांधार देशात, नित्यलोक नावाचं एक नगर आहे .तिथल्या राजाचं नाव गरुडवेग आहे ,आणि राणीचं नाव धारिणी आहे .त्यांची सर्वगुणसंपन्न सुंदर कन्या ,’गंधर्वदत्ता’ आहे. त्यांच्या कन्येने यौवनाच्या प्रथम चरणात प्रवेश केलेला आहे .आता माता-पित्यांना ,तिला योग्य वर मिळावा अशी इच्छा आहे. गरुडवेग राजाने एका निमित्त ज्ञानी ,ज्योतिषाला आपल्या मुलीला ,कशा प्रकारचा वर मिळेल हे विचारलं होतं. त्यावेळेला राजपुरी मध्ये ,गंधर्वदत्ताला जी व्यक्ती वीणा वाजवण्या मध्ये जिंकून घेईल ,ती त्याची तिचा पती असेल. असं सांगितलं होतं. तुमच्या वंशासोबत गरुडवेगाच्या कुलाचा , जुना संबंध आहे, त्यामुळे गंधर्वदत्ताला तुमच्या घरी पोचवण्याचं ठरवण्यात आलं. त्यावेळी, तुम्ही समुद्रमार्गाने येत आहात, हे कळल्यामुळे तुम्हाला आणण्यासाठी ,गरुड वेगाने मला पाठवलेला आहे.” अनोळखी व्यक्तीचे बोलणे ऐकुन,गरुडवेग विद्याधरांचा राजा आहे. अनेक विद्यांचा स्वामी आहे. हा गरुडवेग आपल्या कुटुंबाचा मित्र आहे , हे समजल्याने, श्रीदत्ताच्या मनात हर्ष झाला. कारण समृद्धी संपन्न पुरुषासोबतची मैत्री असल्यास, अनेक प्रकारचे फायदे आपोआपच मिळतात .हे श्रीदत्त जाणुन होते.त्या अनोळखी व्यक्तीने, श्रीदत्तशेठजींना गरुडवेग राजापर्यंत पोहोचवलं ,आणि तो निरोप घेऊन निघून गेला.
श्रीदत्ताचा,गरुडवेगाने यथोचित आदरसत्किर केला. श्रीदत्ताला गरुड वेगाने सांगितलं,
” जेवढी हवी तेवढी धनसंपत्ती, आपल्या सोबत राजपुरीला घेऊन जा, आणि गंधर्वदत्ता तुझी पुत्री आहे ,असं समजुन, तिचा विवाह, खूप थाटामाटाने ,संपन्न कर”
श्रीदत्त शेठजींच्या सर्व चिंता क्षणात नष्ट झाल्या.कर्माच्या उदयाने ,क्षणात सारे मिळाले होते.गरुडवेगासारखा मित्रही मिळाला होता.
काही काळ गरुडवेगाच्या राज्यांमध्ये राहून, श्रीदत्त शेठजींनी ,त्यांचा निरोप घेतला, आणि गंधर्वदत्ताला, सोबत घेऊन ,ते राजपुरीला आपल्या घरी पोहोचले. घरी पोचल्यावर श्रीदत्ताच्या पत्नीने, जेव्हा गंधर्वदत्ताला, त्यांच्यासोबत पाहिलं ,तेव्हा तिला अशीच शंका आली की, आपल्या पतीने लक्ष्मी सोबत, ही नवीन गृहलक्ष्मी ,पण घरी आणलेली आहे की काय?
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर