पुण्यात्मा जींवधर
भाग १४
आर्यनंदी गुरु त्यांच्या मार्गाने निघून गेले आणि त्यांनी दीक्षा घेऊन स्वतःच्या आत्म्याचा कल्याण करायला सुरुवात केली. तिकडे जीवंधरा आपल्या नित्यनैमित्तिक कार्यामध्ये व्यस्त होता.त्यादरम्यानच राजपुरी मध्ये एक घटना घडली. राजपुरी मधले जे गवळी होते, त्यांचा त्यांच्या गाई , राजपुरी जवळच्या जंगलामध्ये चरण्यासाठी जात असत. त्या जंगलामध्ये भिल्लांची एक टोळी होती. त्या टोळीने एके दिवशी सर्व गावी पळवल्या ,आणि गवळ्यांना मारहाण करून पळवून लावले. गाई म्हशी, हे तर गवळ्यांचेउदरनिर्वाहाचे साधन होते. त्याचबरोबर राज्याचे ही धन होते. काष्ठांगाराच्या कानावर जेव्हा ही वार्ता गेली, त्यावेळेला त्याने आपल्या सैनिकांना आज्ञा केली,
” जाऊन त्या भिल्लांना पकडून माझ्या समोर आणून हजर करा.आणि गवळ्यांच्या सर्व गाई-म्हशी सोडवून आणा.” त्याप्रमाणे काष्ठांगाराच्या सैनिकाची एक तुकडी, जंगलामध्ये गेली, पण भिल्ल एवढे शक्तिशाली होते की त्यांनी काष्ठांगाराच्या सैनिकांना पळवून लावले.
सैनिक हरलेले बघून,काष्ठांगाराला वाईट वाटलं. आता प्रजेपुढे ,आपली प्रतिमा खराब होणार ,याची भीती त्याला वाटायला लागली.
भिल्लांनी आता फक्त गवळ्यांना त्रास दिलेला आहे, पण आता जर त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही, तर पुढे ते नगरातील इतर नागरिकांनाही त्रास देतील. वेगवेगळ्या प्रकारे लूटमार करतील .,शी शंका काही नागरिकांना आली.
त्या दरम्यान गवळ्यांचा जो प्रमुख पुढारी होता, नंदगोप, त्याने अशी घोषणा केली, की जो कोणी भिल्लांना पराजित करून ,सर्व काही गाईम्हशी सोडवून आणेल, त्याच्याशी मी माझ्या कन्येचा विवाह करेन आणि सात सोन्याची पुतळ्या, त्याला भेट म्हणून देईन.
नंदगोपाची घोषणा ऐकून ,सर्व नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली, की , कोण त्या भिल्लांचा सामना करायला जाणार ?
भिल्लांच्या शक्ती विषयी माहिती असणाऱ्यांना, असं वाटलं की आधी तिथे जाऊन ,आपला जीव गमवावा लागणार ,मग आपल्याला त्या नंदगोपांचे मुलगी आणि सात सोन्याच्या पुतळ्यांचा काय उपयोग?
नंदगोपाची घोषणा जीवंधराच्या कानावर पण गेली आणि त्याने भिल्लांशी युद्ध करायला जाण्याचा निर्णय घेतला. अर्थातच जीवंधरा सोबत त्याच्या मित्राची सेनाही होती. हे सारे मित्र जींवधराच्या जीवाला जीव देणारे होते. त्यामुळे जींवधराने भिल्लांशी लढायला जाण्याचे ठरवताच, तेही त्याच्यासोबत निघाले.
अतुल पराक्रम आणि साहस असणाऱ्या जींवधराने भिल्लांची घनघोर युद्ध केलं ,आणि त्यांना हरवून गवळ्यांच्या काही म्हशी सोडवून आणल्या.
काष्ठांगाराच्या कानावरही जीवंधराचा पराक्रम गेला.एका वैश्यपुत्राचा पराक्रम पाहुन ,तो चकित झाला. अर्थातच आपल्या पेक्षाही कोणीतरी पराक्रमी ,या राज्यात आहे, हे पाहून त्याच्या मनात द्वेष, मत्सर उत्पन्न झाला, परंतु नागरिकांमध्ये , जीवंधरा विषयी असणारा आदर पाहून, त्याला गप्प बसावे लागले.
इकडे नंदगोपाने ,आपल्या मुलीच्या लग्नाची, तयारी सुरू केली.जीवंधराने नंदगोपाला सुचवले ,
” माझा मित्र पदमास्य ,तुमच्या मधीलच आहे. भिल्लांशी लढताना ,त्याचाही सहभाग होता .त्यामुळे तुमच्या मुलीचे लग्न पद्मामास्यशी व्हावे आणि सोन्याच्या पुतळ्याही त्यालाच मिळाव्यात.”
जीवंधराच्या बोलण्याचा नंदगोपाने आदर केला, आणि पद्मास्यशी आपल्या मुलीचे लग्न लावून दिले.
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर