पुण्यात्मा जींवधर-10
भाग्यश्री मुधोळकर
भाग १०
जींवधर आणि अतिथी सोबत जेवायला बसले. जींवधर त्या अतिथीकडे बघत होता. हळूहळू घरातल्या ,सर्व व्यक्तींसाठी बनवलेल्या भोजनाचा,समाचार त्यांनी घेतला. तरीही त्यांची भूक शांत होत नव्हती.
हे दृश्य पाहून जींवधराला , आश्चर्य आणि थोडं कुतूहल वाटलं. शेवटी त्याने आपल्या हातातील, एक लाडू त्या अतिथीला खायला दिला.
जीवंधराच्या हातातून तो घास खाताच, त्या अतिथीची भूक शांत झाली. त्यामुळे जीवंधराला ,त्या अतिथीला आणि त्या स्वयंपाक करणाऱ्या आचाऱ्यालाही यामुळे खूप समाधान वाटलं.
त्या अतिथीने विचार केला,
‘ जीवन धर खूप बुद्धिमान आणि तेजस्वी बालक आहे. पण त्याचबरोबर भाग्यशाली ही आहे. जो भस्मक रोग मला लागलेला होता ,त्यामुळे सर्व भोजन खाऊनही माझी भूक शांत झाली नव्हती. ती जींवधराच्या हातातून एक घास खाताच, माझा हा भस्मक रोग पूर्णपणे नष्ट झाला. अशा प्रकारे या जीवंधरा ने माझ्यावर खूप मोठे उपकार केलेले आहे. या उपकाराची परतफेड मी करायला हवी.
हा विचार मनात घेऊन ,त्या अतिथीने जीवंधराचे पिता गंधोत्कट यांची भेट घेतली. ते म्हणाले,
” मी मनुष्य जीवनासाठी अति उपयोगी, लिखाण, वाचन, अस्त्र-शस्त्र प्रयोग ,मल्लविद्या, व्याकरण, साहित्य, सिद्धांत आदी अनेक विद्यांचा ज्ञानी आहे. या सर्व विद्या मी तुमचा पुत्र जींवधर याला शिकवू इच्छित. तो माझा भस्मक रोग नष्ट करून ,त्याने माझ्यावर महान उपकार केला आहे. म्हणून तुम्ही मला त्याला शिकवण्याची परवानगी द्या.”
गंधोत्कटाला, खूप आनंद झाला. त्याने हात जोडून विनयाने उत्तर दिलं ,
“महात्मा! माता पिता तर फक्त आपल्या पुत्राला जन्म देतात .पण त्याचे जीवन निर्माण करण्याचं कार्य, विद्या गुरूच करतात. बालक अवस्थेमध्ये जर जीवन उपयोगी विद्या मिळाली, तर मनुष्य जीवन खूप गुणी आणि सुखी होईल, परंतु या जगामध्ये सच्चरित्र गुरू मिळणं खूप कठीण आहे. गुरु फक्त ज्ञानाने महान असून चालत नाही, कारण कोरं ज्ञान मनुष्याचा उद्धार करत नाही. शिष्यांमध्ये विनय, श्रद्धा, क्षमाशीलति ,संयम, ब्रह्मचर्य, सत्य, अहिंसा, धैर्य, साहस इत्यादी गुण विकसित करण्यासाठी, गुरु मध्येही या गुणांचा विकास असला पाहिजे. आपल्यामध्ये हे सर्व गुण विद्यमान आहेत. त्यामुळेच आपण विद्यागुरू होण्याच्या योग्य आहात .माझं सौभाग्य आहे की मला घरबसल्या, आपल्या सारखे महान, गुणी उपकारी सच्चरित्र निस्पृह विद्वानाचा लाभ मिळाला. जींवधर, तुमचा पुत्र आहे .आता याला कृपा करून सर्व विद्या शिकवा, ज्या तुमच्याजवळ आहेत . त्याच्यावर अनुग्रह करा.”
त्या अतिथीने पुढे सांगितले ,
“माझं नाव आर्यनंदी आहे. जींवधर योग्य शिष्य आहे आणि महान उपकारी आहे. म्हणून थोड्याच वेळात, मी त्याला सर्व विद्यांमध्ये पारंगत करीन.”
क्रमशः
©भाग्यश्री मुधोळकर