केल्याने देशाटन
भाग३
मांडू मधली पहा प्रसन्न पहाट. चौघीजणी लवकरच उठल्या. सहा – सव्वासहाला जाग आली. ज्या हॉटेलात त्या थांबल्या होत्या, त्याच्या बाजूला छानशी छोटीशी बाग केलेली होती. तिथे चक्कर मारून आल्या .
हॉटेल मध्ये भरपेट नाश्ता झाला.खास इंदौरी पोहे,कचोर्या,खाऊन झाल्या. नाश्ता झाल्यावर चौघीजणी, मस्त नटून-थटून तयार झाल्या. आजचा ड्रेसकोड होता नेव्ही ब्ल्यू. चौघींनी ही नेव्ही ब्लू कलर च्या छान जीन्स आणि त्याच्या वरती लाईट ब्ल्यू कलर चे टॉप चढवले होते .खास ट्रीपसाठी एकत्र केलेले शाॅपिंग होते.
छान फोटोसेशन आधी हॉटेलमध्ये झालं .काही सेल्फी, काही वेगवेगळ्या पोझमध्ये .
नंतर हॉटेलवाल्यांच्या ओळखीने त्यांनी एक गाईड ठरवला. तो त्यांना मांडू फिरवून आणणार होता. गाईड असल्याशिवाय मांडू फिरण्याची मजा येणारच नव्हती. त्यांना मिळालेला मोहन हा गाईड ही खूप छान बडबडा आणि मोकळा होता. भरभरून माहिती देणारा होता.त्याचं हिंदीही खूप छान होते. सुरुवातीला पाहिली जामा मस्जिद. नंतर इको पॉइंट बघितला. त्यानंतर राणी रूपमती चा हिंडोला महाल ,जहाज महाल , तेथिल म्युझियम,सारं बघता-बघता त्या थक्क झाल्या. तिथलं सौंदर्य, तिथली वास्तुशिल्प कला. आणि त्याच्यासोबतच तिथे असणारा रंजक इतिहास ,मोहनकडुन ऐकत दुपारचे दोन कसे वाजले ,ते कळलच नाही. प्रत्येक पॉईंटवर चौघीजणी असल्यामुळे आणि सोबतीला गाईड असल्यामुळे छान पोझ मधले आणि तिथल्या माहिती असणाऱ्या, बोर्ड खाली फोटो, असं सारं काढणं झालं.
दुपारी दोन वाजता पुन्हा हॉटेलवर पोचल्या आणि जेवण करून ,पुढे महेश्वरला निघाल्या मांडू पासून महेश्वर जवळच होतं त्यामुळे फारसा प्रवास नव्हताच .महेश्वरला ही घाटावरती छान पैकी बोटिंग झालं. बोटिंग झाल्यावर गाईड घेऊन अहिल्याबाई चा किल्ला बघितला . महेश्वर चा किल्ला अहिल्याबाईच्या जीवन कार्यातला महत्त्वाचा टप्पा होता .तिथलं प्रशस्त देवघर ,त्यातल्या चांदीच्या वस्तू सारंकाही बघून, चौघीजणी भारावून गेल्या.फोटो ठर काढलेच तिथे.
तो प्रसन्न शांत घाट ,तो किल्ला हे सारं काही मनाला तृप्तता देणारं होतं ,आणि समाधान देणारं होतं. आपली ट्रिप सार्थकी लागली, याचा चौघीजणी आनंद मानत होत्या. अर्थातच महेश्वरला आलं आणि माहेश्वरी साड्या घेतल्या नाहीत, असं होणारच नाही, नाही का?
चौघीजणी तिथे किल्ल्याजवळच असणारी 3-4 दुकान फिरल्या .चौघांनीही घरच्यांसाठी ,स्वतःसाठी काही साड्या, ड्रेस मटेरियल याची मनसोक्त खरेदी केली, आणि महेश्वर च्या आठवणी मनात घेऊन, त्या निघाल्या इंदोरला. त्यांचा दुसऱ्या दिवशीचा मुक्काम असणार होता ,इंदोरला.सांस्कृतिक वारसा असणार्या इंदोरमध्ये. परंतु मुक्कामाच्या आधी ,इंदोरच्या सराफा गल्लीतली खाबूगिरी काही सुटणार नव्हती.छप्पन चाटलाही जायचे होते, त्यामुळे मक्कामी जाण्याआधी, जेवण न करता खादाडी करायला त्या पोहोचल्या इंदूरच्या खास ,सराफा बाजारात.
चाट,भुट्टेका कीस,जिलेबी,पकोडे,मस्त टाईमपास.
खाणे,पिणे,फिरणे,खरेदी सारंकाही मस्त जमुन आलं होत.
इंदोरला सकाळी उठुन काचमंदीर,म्युझायम,छोटासा अहिल्याबाईचा वाडा पाहुन झालं.
काचमंदीरजवळच्या मार्केटमध्येही खरेदी झाली. तिथेच एका हाॅटेलमध्ये दालबाफला थाली सर्वांनी खाल्ली आणि सार्याजणी परत निघाल्या ,नाशिकला.
आता वर्षातून एकदा तरी चौघीनी जायचेच,अशा तीनचार दिवसाच्या टुरला असं परतीच्या प्रवासात ठरवलं.
खूप सारा उत्साह आणि चैतन्याची उधळण चौघींच्याही मनात झाली होती.
समाप्त
भाग्यश्री मुधोळकर