केल्याने देशाटन
भाग२
गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करून चौघींच्या ग्रुप निघाला सोबतीला होता भूषण ड्रायव्हर सहाजणांना बसता येईल अशी आरामात मोठीच गाडी केली असल्यामुळे चौघेही ऐसपैस बसल्या होत्या.
नाशिक वरून गाडी निघाली पिंपळगावचा टोल नाका पार होईपर्यंत थोडंसं अवघडलेपण होतं पण हळूहळू आला मोकळेपणा पर्समधून एकीच्या दीपा च्या पर्समधून चॉकलेट्स निघाले आणि एकमेकींना देवाण-घेवाण झाली आणि मग सुरू झाल्या नॉर्मल गप्पा.
काय काय बघायचं कुठे राहणार आहोत, कुठे बुकिंग झालं ?या माहितीची देवाण घेवाण झाली. नयना नेट सर्च करुन टूर नियोजन केले होते.
फोनवर कॉन्टॅक्ट करून, राहण्याचे बुकिंग केलेले होते. त्यामुळे सर्वांनी, आपोआपच तिला टूर लीडर करून टाकलं, आणि कुठे थांबायचं, कुठे खायचं प्यायचं, सारे अधिकार तिला देऊन टाकले होते.
चांदवड चा टोल नाका गेला आणि त्या नाश्त्यासाठी थांबल्या. मिसळ पॉइंटवर. नाशिकला निरोप देता देता, मिसळ तर खायलाच हवी . चौघींनाही नाश्ता तर करायचा होता .त्यामुळे त्या हॉटेलमध्ये थांबल्या आणि मिसळ ऑर्डर केली .
चौघी मध्ये तीन मिसळ पुरेशा झाल्या. छान पैकी मिसळ खाल्ल्यानंतर ,झकास पैकी चहा घेतला आणि गाडी पुढे निघाली.
ओंकारेश्वर येण्याच्या थोडं अलीकडेच, एका धाब्यावर जेवण करून घ्यावं, असं या चौघींनी हे ठरवलं ,म्हणजे ओंकारेश्वराला जाऊन जेवणात वेळ जाणार नाही, आणि दर्शन करणे ,आजुबाजुचा परिसर पाहणे,होईल ,असा त्यांचा विचार होता .एकाच छानश्या धाब्यावर डाळ बाटी,चुर्मा आणि गट्ट्याची भाजी खाऊन ,त्यांनी मध्यप्रदेशात खाबुगिरीचा श्रीगणेशा केला.
चौघीजणी ही ओंकारेश्वर ला पोहोचल्या. तेथील भव्य मंदिर ,तो नदीकाठ आणि ते पवित्र वातावरण, बघून आपोआपच सगळ्यांच्या मनात एक भारावलेपण आलं. ओंकारेश्वरचं दर्शन केलं. डोळे बंद करून थोडंसं ध्यान केलं ,जवळच्या नदी तीरावर ती होडीतून शिरण्याची ही इच्छा चौघींना होतीच, त्याप्रमाणे एका होडीतून , नदीत फेरफटका मारून ,कावेरी आणि नर्मदाचा संगम पाहुनआल्या. नर्मदेचं ते शांत पवित्र रूप सगळंच अवर्णनीय होतं. आणि मुळातच ,मनात असणार निवांत पण त्याला आपोआपच वातावरणाची जोड मिळाली आणि मनात प्रसन्नता दाटून आली.
ओंकारेश्वर च्या घाटांवर थोडावेळ बसून,फेरफटका मारुन,मनात देवदर्शनाचे समाधान घेऊन ,त्या पुढे निघाल्या. राहिल्या
काहीही न बोलताच बरेच काही, स्वतःच स्वतःला कळत होतं. ओंकारेश्वर वरुन,गाडी पुढे निघाली. गाडी आता मांडूच्या दिशेने निघाली.
त्यांचा पहिला मुक्काम असणार होता मांडू ला. मांडू च्या एका छानशा हॉटेलमध्ये ,नयनाने आधीच बुकिंग करून ठेवलेलं होतं .मांडू ला पोहोचून ,हॉटेलमध्ये रात्रीचं जेवण करुन, चौघीजणी ही झोपायला निघाल्या. चौघीजणी असल्यामुळे रूम दोन घेतल्या होत्या ,पण एकाच रूम मध्ये गप्पा मारत मारत ,साडेबारा कधी वाजले ,हे चौघी नाही कळलं नाही ,
मग मात्र
“उद्या सकाळी लवकर उठून मांडू फिरायचं ना.” असं एकमेकींना सांगत, आपापल्या खोलीत दोघींची जोडी झोपायला गेली .मना मध्ये दुसऱ्या दिवशी मांडू फिरण्याची उत्सुकता होतीच.
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर