महावीर त्यांना कळले हो-३

भाग ३
अंतिम
©भाग्यश्री मुधोळकर

थोडी परिस्थिती सुधारता, गावाच्या प्रशासनाची परवानगी काढून उर्वरित कामही पूर्ण करण्याचं जिनदत्त आणि वरूणने ठरवलेलं होतं.
जुलै ऑगस्ट महिना उजाडला चातुर्मास पुन्हा सुरू होणार होता, पण अजूनही मंदिर भक्तांसाठी बंद होते. सामान्य श्रावक दर्शनाला येऊ शकत नव्हते. दशलक्षण पर्व कसं आलं ?कसं गेलं, कळलंच नाही. गावामध्ये ते बांधकाम काय चालू आहे? याकडे लक्ष द्यायला फारसा काही कोणाला वेळ नव्हता. जो तो स्वतःला सांभाळण्यातच गर्क होता. गावातही कोरोना रुग्ण निघत होते बरे होत होते.
दिवाळीच्या आसपास बऱ्यापैकी परिस्थिती निवळलेली होती, आणि लोकांना थोडाबहुत मंदिरामध्ये जाता येता येत होतं. मंदिराच्या आवारात आल्यावर ,लोकांच्या लक्षात आलं की ,भव्य मंदिराऐवजी, एक छोटंसं सुसज्ज हॉस्पिटल उभे आहे. त्याच्या जोडीला तीनशे साडेतीनशे लोक राहू शकतील ,अशी धर्मशाळा ही उभी राहिलेली आहे . जी मंदिराच्या आवारातील जुनी धर्मशाळा होती, त्याचं रूप पालटून , तिथे लग्नाचा हॉल आणि काही खोल्या बांधून तयार झालेल्या होत्या.
आता हा कोरोना रोग तर गेला, आता या हॉस्पिटलचा काय उपयोग ?असं गावातल्या लोकांना वाटायला लागलं होतं. पण अ शहराकडे प्रत्येक वेळी उपचारासाठी पळण्यापेक्षा गावातच हाॅस्पिटल झाले,ह्याचा आनंद होता. आणि भव्य मूर्ती निर्माणापेक्षा ही वेगळीच गोष्ट उभी राहिली ,याचा अभिमान गावकर्‍यांना वाटायला लागला.
गावामधले प्रतिष्ठित डॉक्टर आणि शहरातून गावी आलेले तरूण डॉक्टर तिथे विनामूल्य सेवा देत होते.
जिनदत्तांच्या पडिक शेतात, भव्य ऑक्सीजन सिलेंडर निर्मितीचा प्रोजेक्ट उभा राहिलेला होता. वरूण आणि त्याच्या इंजिनीयर मित्रांनी दिवसरात्र एक करुन फॅक्टरी उभारली. करोनाच्या काळात, शहरांमधलं आपलं काम गमावून, गावांमध्ये परत आलेल्या तरुणांना, ऑक्सीजन प्लांट मध्ये काम मिळालेलं होतं.
जानेवारी महिन्यामध्ये मिंटीग घेऊन, शेठजींनी, सर्व समाज बांधवांना माहिती दिली.
” जिन सागर महाराजांना, येणाऱ्या कठीण परिस्थितीची चाहूल लागलेली होती. आपल्या गावातील लोकांना कठीण काळामध्ये ,इकडे तिकडे पळायला न लागता गावामध्ये, सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात ,म्हणून जिल्हा सागर महाराजांनी मंदिराऐवजी हॉस्पिटल आणि ऑक्सिजन प्रोजेक्ट उभारण्याची मला कल्पना दिली होती,
परंतु यासाठी दान गोळा होईल की नाही, याविषयी शंका असल्यामुळे ,महाराजांनी आपल्या सगळ्यांना भव्य मंदिर निर्माणच आशा दाखवली .आपले जे जैन मंदिर आहे, त्या मंदिरातील ,महावीर प्रभू आपल्या वरती कृपा करत राहणारच आहेत, परंतु हे हॉस्पिटल, ही धर्मशाळा, हा ऑक्सिजनचा प्रोजेक्ट आपल्याला भविष्यामध्ये खुप खूप मदत करणार आहे.”जिनदत्तांनी सांगितलं.
गावात आरोग्यसेवकांचं,शिक्षण घेण्यासाठी ,वरुणने गावातील काही गरजु गरीब तरुण-तरुणींना प्रोत्साहित केले होते.जिनदत्तांनी त्यांच्या शिक्षणाचा आर्थिक भार उचलला होता.
जिनसागर महाराजांची गावावर असीम कृपा होती. म्हणून येणार्‍या संकटाची चाहूल त्यांना लागली होती. आणि मंदिर निर्माण होण्यापेक्षा, समाजाला अशा प्रकारच्या दवाखान्यांची, जास्त गरज भासणार आहे हे त्यांना माहीत होतं.
गावातल्या लोकांना आनंद वाटलला, तर काही लोकांना आता तर करोना गेलेला आहे, कशाला हवाय एवढा मोठा दवाखाना ,आणि आणि हा असला ऑक्सिजनचा प्रोजेक्ट?, असं वाटत होतं.
पण मार्च महिना उजाडला आणि आपले गुरु, आपल्यापेक्षा पुढचं बघू शकतात याची जाणीव व्हायला लागली. फक्त आटपाटनगरच नव्हे,तर आजूबाजूच्या गावांमधले रुग्णही त्या दवाखान्यात यायला लागले.
नवीन बांधलेल्या धर्मशाळेला क्वारनटाईन सेंटरचं, रूप देण्यात आलं.सात्विक भोजन,स्वाध्यायासाठी लायब्ररी सुरु झाली.आवारातली बागही बहरली होती.
अशा वातावरणात रुग्णांना लवकर आरामही पडत होता.
महावीर खर्‍या अर्थाने आटपाट नगरात कळले होते.’जगा आणि जगु द्या ‘ यासाठी नगरातील नागरिक झटत होते.

महावीरांची कृपा असणारे, ते तीर्थक्षेत्र खर्‍या अर्थाने पावन झाले होते.
अशी आटपाटनगरे,असे ट्रस्टी ,असे गुरु सार्‍या तीर्थक्षेत्री लाभोत.

©भाग्यश्री मुधोळकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *