ब्रेकचे सॅशे

विद्या आरशात बघून तयार होत होती. छानसा नेव्ही ब्ल्यू कलरचा डिझायनर वनपीस, त्याच्यावर मॅचिंग लोंबते इयरिंग्स आणि पर्स,हलका मेकअप. स्वतःकडे बघून ती प्रचंड खुश झाली. आज बर्‍याच दिवसांनी ती मैत्रिणींसोबत चित्रपट बघायला मॉल मध्ये जाणार होती. पिक्चर बघायचा, खायचं प्यायचं आणि थोडीशी विंडो शॉपिंग. चार-पाच तासाचा अगदी छान ब्रेक. रोजच्या रुटीन आयुष्यातून.सर्व धमाल करून घरीआल्यावर जो काही फ्रेशनेस विद्याला अनुभवायला आला, तो तिच्यासाठी पुढच्या काही दिवसांचा छानसा ब्रेक ठरला.

रिनाने वाचनालयातून दिवाळी अंक आणला होता. तो वाचताना ती इतकी रंगली, की बाकी घरातली कामे,इतर टेन्शन्स सारं काही विसरून गेली. काही रहस्यमय ,काही कौटुंबिक ,काही विनोदी अशा कथा वाचताना तिचं मन प्रसन्न झालं. वाचनाची आवड होती, पण मोबाईलच्या नादात काही दिवस मागे पडली होती .तो दिवाळी अंक वाचनाचा दोन तीन तासाचा ब्रेक, त्यात स्वतः करून घेतलेला छानसा चहा आणि दिवाळीत स्वतः बनवलेले, पण निवांत पणे न खाल्लेले फराळाचे पदार्थ, रीना साठी हा ब्रेक हटकेच होता.

थांबलेला पाउस ,थोडंसं धुकं आणि किलबिलणारे पशुपक्षी,इअरफोनमधून कानात घुमणारे सुर मनीषा मॉर्निंग वॉकला निघाली. हे सारे वातावरण तिला प्रसन्न करणारं होतं. ते अर्धा तास बागेमधलं फिरणं ,थोडासा बाकावर बसून केलेला प्राणायाम आणि नंतर बाहेर पडून कोकम आवळा मिक्स ज्यूस पिणे, मनीषासाठी आनंदाची परिसीमा. दिवाळीची कामे, नातेवाईकांच्या भेटीगाठी या सगळ्यांमधून मिळालेला ह्या छोट्याशा ब्रेकचा तिने भरभरून त्याचा आनंद घेतला.

“अगं मला कामासाठी मुंबईला जायचं आहे सकाळी जाऊन सायंकाळी परत यायचे येतेस का सोबत.” राधाला रमेशने विचारलं. तिने लगेच हो म्हटलं, बरेच दिवस दोघेजण कुठे गेले नव्हते. ऑफिसचं काम तर काम सही, पण सोबत प्रवास, लॉंग ड्राईव्ह होणार होतं. रस्त्यात मनासारखं थांबून खाता-पिता येणार होतं. आणि रमेश ऑफिसात काम करत असताना, दादरला मार्केटमध्ये फिरण्याचा आनंद मिळणार होता. मनीषाने लगेच हो म्हटलं. हा छोटासा ब्रेक दिला खूप दिवस रिफ्रेशमेंट देणारा ठरला.

मैत्रिणींनो खरंच आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनाला घरातली कामं, ऑफिसचे काम, नातेवाईक, मुलाबाळांचा करणं या सगळ्यांमध्ये कंटाळतो आणि छोटासा ब्रेक हवा वाटतो. सध्या ब्रेक म्हणजे कुठेतरी पर्यटन स्थळी चांगले पाच-सात दिवस फिरायला जाणे असा ट्रेंड आहे, आणि अशीच मानसिकता आपणही अवलंबली आहे. त्यामुळे आपण असा ब्रेक मिळावा म्हणून तळमळत राहतो.

अशा मोठ्या ब्रेकची वाट बघत बसण्यापेक्षा, असे छोट्या-छोट्या ब्रेकचे क्षण आपण दिवसभरात शोधले ,तर आपल्याला मोठ्या पॅकेजच्या ब्रेक पेक्षा हे छोटे-छोटे सॅशे जास्त आनंद देणारे ठरतील. याचा विचार करावा आणि हा ब्रेक आणि ह्या ब्रेकची रिफ्रेशमेंट आपल्याला आनंद देणारी असते,याचा विचार करावा. रोज रात्री झोपताना आठवून बघा की आज दिवसभरात तुम्ही कोणता ब्रेक कोणता ब्रेकचा सॅशे तुम्हाला आनंद देऊन गेलेला आहे.

भाग्यश्री मुधोळकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *