सक्षम ती खंबीर ती-6

भाग६

©भाग्यश्री मुधोळकर

गुंजन पदवीधर झाली होती. आणि पुढे तिने b.ed करायचं ठरवलं. शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करण्याची, तिची मनापासूनची इच्छा होती. अर्थातच गोपी- मोहनने त्याच्यासाठी, काही आडकाठी करण्याचा प्रश्नच नव्हता. कारण दोघेजण शिक्षणाच्या महत्वाला, मान देणारे होते. गुंजनने आपलं बी.एड. पूर्ण केलं .आता गोपीला वेध लागले ,तिच्या लग्नाचे. गोपीचे लग्न तिच्याच शहरातल्या, जालना शहरातल्या, आणि तिच्यासोबतच ,शिक्षण घेणाऱ्या गौरवबरोबर ठरले.
काॅलेजात तिच्याबरोबर शिकणारा, घरी नेहमी येणारा जाणारा मुलगा .त्यामुळे गुंजनकडचे त्याला आणि त्याच्याकडचे गुंजनला ओळखतच होते.
दोन्ही घरच्यांच्या संमतीने, गुंजनचे लग्न ठरले. गंगाबाईला भेटण्यासाठी, गुंजन आणि गौरव खास निमगावला जाऊन आले. सर्वांना भेटून आले. गंगाबाईंना , जावयाला भेटून खूप आनंद झाला. सोपान रावांची एक अगंठी, गंगाबाईने जपून ठेवलेली होती. ती त्यांनी नातजावयाला सुपूर्द केली. गुंजन आणि गौरव गंगा बाईंना भेटून परत आले, आणि आपापल्या कामाला लागले.
त्यानंतर पंधरा-वीस दिवसातच, छोट्याशा दुखण्याचं निमित्त होऊन गंगाबाईंनी, इहलोकाचा निरोप घेतला. सर्वांनाच खूप दुःख झाले. गोपी चंपा आणि माणिक यांना खर्‍या अर्थाने पोरकं, झाल्यासारखं वाटलं.
गंगाबाईच्या दिवस कार्याच्या वेळेला, बहिण भावंड एकत्र होती. त्याच वेळेला त्या तिघांनीही, जरी, आई-वडील नसले तरी, आपण तिघांनी एकमेकांशी स्वतःला घट्ट जोडून ठेवायचं. सुखदुःखाचा एकमेकांना साथ द्यायची. असं मनापासून ठरवलं.
सहा महिन्यानंतर गुंजनच्या लग्नाचा मुहूर्त होता. लग्नाची तयारी करताना पदोपदी ,गोपीला गंगाबाईंची आठवण येत होती. उणीव भासत होती. पण शेवटी कितीही असलं तरी, आपल्याला दुःख विसरून नव्याला, सामोरं जावंच लागतं. गोपीनेही, तसेच केलं.मोहन गोपीला सांभाळत होता. लग्नाच्या पंधरा-वीस दिवस आधी, चंपा तिच्या मुलाबाळांचासकट ,आणि सरिता ही तिच्या मुला-बाळांना घेऊन ,गोपीच्या मदतीसाठी आले.
चंपाचे यजमान आणि माणिक लग्नाच्या चार दिवस आधी येणार होते. गोपीकडे लग्नाची तयारी खूप जोरात सुरू होती.
लग्नाला आठ दिवस उरले होते आणि गोपीला अचानक खूप थकवा आणि अस्वस्थ वाटायला लागले. कदाचित लग्नाच्या तयारीच्या दगदगीने असेल ,असा विचार करून गोपीने दुर्लक्ष केले. पण दुसऱ्या दिवशी हे तसेच होत होते. शेवटी तिने मोहनला सांगून डॉक्टर कडे जाण्याचे ठरवले. तिची स्त्री रोग तज्ञ डॉक्टर नेहमीचीच होती. तिच्या कडे संध्याकाळी गोपी तपासणीसाठी गेली.
डॉक्टर सीमा चौधरीने गोपीचे पूर्ण तपासणी केली आणि तिला काहीतरी शंका आली. काही ब्लड टेस्ट, तिने लिहून दिल्या काही एक्स-रे ,मॅमोग्राफीही ,तातडीने, करायला सांगितली.
डॉक्टर सीमाला गोपीची तपासणी करताना लक्षात आलं होतं की, तिच्या स्तनांमध्ये वेदना नसणारी गाठ आहे आणि त्या गाठीला वेदना नसल्यामुळे ,गोपीला जाणवतही नव्हते.
स्वतःकडे लक्ष न देता कुटुंबासाठी जगणं, असं ब्रीद असणाऱ्या गोपीला स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ कुठे असणार? गोपी डॉक्टरांना म्हणाली,
” डॉक्टर आठ दिवसावर पोरीचं लग्न आलेले आहे. आत्ताच तपासण्या करायला हव्या का? लग्नानंतर करते की. सध्या मला थोडेसे गोळ्या औषधे देऊन बरे वाटेल असं बघा.”
पण डॉक्टर सीमा स्वतःच्या मतावर ठाम होत्या, त्या म्हणाल्या ,
“आपण गोळ्या औषध देऊ या. पण सगळ्या तपासण्या ताबडतोब करून घ्या. गोपीने डॉक्टरांचं ऐकलं सगळ्या तपासण्या करून घेतल्या.
घरच्यांपासून लपवून सगळं करणं अवघड होतं.पण नाना खटपटी,लटपटी करत गोपीने ते केलं.वेगवेगळे बहाणे करत,एकटीने घराबाहेर पडत, गोपीने तपासण्या करुन घेतल्या.कारण घरी सारेजण लग्नाच्या आनंदात होते.
एक नवीनच संकट तिची वाट बघत होते.
गोपीचे सर्व रिपोर्ट आले.
डॉक्टर सीमांचा अंदाज खरा ठरला. गोपीला ब्रेस्ट कॅन्सर झालेला होता. आणि त्यासाठी ऑपरेशन करणे ,गरजेचे ठरणार होतं. डॉक्टर सीमाने रिपोर्ट बघितल्यावर, गोपीला सांगितलं की, घरातल्या कोणालातरी सोबत घेऊन घ्या.
गोपी म्हणाली,
” सर्वजण लग्नाच्या तयारीच्या गडबडीत आहे .डॉक्टर काहीही असेल तरी सांगा. मी स्वतः खंबीर आहे .काय रिपोर्ट आहे? ते मला सांगा. आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला, मी तयार आहे .”
डॉक्टर सीमा म्हणाल्या,” तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे आणि त्याच्यासाठी आपण ऑपरेशन करणं, गरजेचं आहे.”
गोपी म्हणाली,
“चालेल परंतु आठ-दहा दिवसांनी केले, तर चालेल ना. मुलीचं लग्न होऊन जाऊ दे. तोवर तुम्ही मला थोडे गोळ्या औषध द्या. त्यामुळे मी लग्नकार्यात व्यवस्थित वावरू शकेन. लग्न होईपर्यंत माझ्या घरच्यांना काही कळणार नाही. असं बघा ,म्हणजे लग्नाच्या आनंदावर विरजण पडणार नाही. लग्न एकदा पार पडलं,की आपण होऊन घरी सगळ्यांना सांगते .”

डॉक्टर सीमा गेले आठ नऊ वर्ष ,गोपीच्या डॉक्टर होत्या. त्यांना घरचेही सारं माहीत होतं. त्यांनी गोपीला औषध गोळ्या दिल्या आणि लग्न पार पाडायला सांगितले. पण लग्न झाल्यानंतर लगेच ,दुसऱ्या दिवशी ,दवाखान्यात ऍडमिट होऊन ऑपरेशन करून घेण्यासही सांगितलं. त्याप्रमाणे सगळीकडे अपॉइंटमेंट घेण्याची, डॉक्टर सीमानी व्यवस्था केली. डॉक्टरांकडून आल्यावर सगळ्यांनीच ,काय झालंय चौकशी केली, पण गोपीने सगळं काही ठीक आहे थोडासा थकवा आहे ,डॉक्टरांनी गोळ्या औषध घ्यायला सांगितले आहे ,असं सांगून वेळ मारून नेली. मनामध्ये अस्वस्थता होती, परंतु मनातल्या भावना, चेहऱ्यावर न आणण्याचे, कसब गोपीने लीलया पेललं. गुंजनची पाठवणी झाली. लग्न आनंदात पार पडले.
गुंजनचा सासरी गृहप्रवेश झाला.
आता मात्र गोपीने सर्वांना सांगायचे ठरवले. कार्यालयातून घरी मंडळी परतली.संध्याकाळचे चहापान सुरु होते. सर्वजण एकत्र बसले होते. हीच योग्य वेळ होती गोपीसाठी.

 

क्रमशः

©भाग्यश्री मुधोळकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *