coal

सक्षम ती खंबीर ती-३

भाग-३

©भाग्यश्री मुधोळकर { भाग-२ }

 

गंगाबाई आणि सोपानराव पहाटे लवकरच उठले.गंगाबाईंच्या भावाच्या ओळखीचा भट्टीवाला तालुक्याच्या गावी होता.सोपानरावांना, तो भट्टीचे तंत्र शिकवणार होता.
सोपानराव तालुक्याला गेले. आठ दिवस त्या भट्टीवाल्याकडुन शिकुन,ते परतणार होते.
इकडे सोपानराव तालुक्याला गेल्यावर, गंगाबाईंनी कंबर कसली.पोरांना हाताशी घेऊन,वाड्याच्या बाहेरच्या खोलीला, दुसऱ्या दिवसापासून, एक छोटं दुकान करण्याचं काम सुरू झालं. गंगाबाईंनी , सोपान रावांना ,
“इथलं सारं मी पाहते .आठ-दहा दिवस तिथे भट्टीवर राहून चणे कुरमुरे कसे करतात? याचं कसब शिकून या.” असं सोपान रावांना नम्रपणे सुचवलेलं होतं.सोपानरावानीही ते मान्य केलं .

गंगाबाईच्या मोठ्या भावाने सोपान रावांना त्या भट्टीवाल्याची ओळख करून देऊन ,सोपानरावांचं शिकणं सुरू झालं. भट्टीजवळ उभे राहून, त्या गरम वातावरणामध्ये चणे, कुरमुरे ,पोहे ,लाह्या कशा बनतात? याचं कसं सोपानरावांनी शिक्षण घेतलं. मुळातच मेहनती असल्यामुळे, सात आठ दिवसात ,त्यांनी ते कसबआत्मसात केलं ,आणि त्याच्या साठी लागणारा कच्चामाल ,भांडीकुंडी सारं, त्या मोठ्या तालुक्याहुन घेऊन, सोपानराव ,आपल्या छोट्या गावांमध्ये दाखल झाले.
तोवर गंगाबाईंनी पुढाकार घेऊन, माणसांकडून काम करून घेऊन, वाड्यातल्या समोरच्या खोलीला, दुकानाचं नीटस रूप दिलेलं होतं. सारी तयारी झालेली होतीच. अजून कशातच वेळ न दवडता, छोटीशी गणेश पूजा करून ,सोपान रावांनी आपलं कुरमुर्‍यांचा दुकानाचा श्रीगणेशा केला.

man with oven
सुरुवातीला कसं होईल? कसं चालेल ?आपल्याला जमेल की नाही ?याचा गंगाबाईंनी विचार केलाच नाही, आणि सोपानरावांनाही असा विचार करू दिलाच नाही .
आपण चालू केलेले हे दुकान ,खूप भरभराट करणारे ठरणार आहे आणि आपण यातून खूप मोठं होणार आहे, असंच काहीसं गंगाबाईनी साऱ्यांच्या मनावर ठसवले होते. आपल्या मुलींना, मुलांनाही या कामांमध्ये सामील करून घेत होती.
” एवढे मोठे सावकार आणि बघा काय वेळ आली?” असं बोलणारे बरेच विघ्नसंतोषी लोक त्यांच्या वाटेत आले, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, मेहनत करून पुढे जाताना, “तुमचं भलं होणार” असं आशिर्वाद देणाऱ्या लोकांकडे जास्त लक्ष देत ,गंगाबाई आणि सोपानरावांनी ,आपल्या व्यवसायाची गाडी पुढे न्यायला सुरुवात केली.
आसपासच्या चार गावातली माणसं त्यांच्याकडे खरेदीसाठी येत होते.
मध्येच एकदा भट्टीवर काम करतांना, सोपानराव जखमी झाले. काम कसं होणार वाटत होतं,पण तोवर गंगाबाईही ते तंत्र शिकली होती. ती स्वतः भट्टीवर उभी राहिली.
मेहनतीचे फळ सगळ्यांना मिळतं, मग सोपानराव आणि गंगाबाई तरी याला अपवाद कशा ठरतील, हळूहळू त्याच्या दुकानाचा चांगला जम बसला .थोडीबहुत शिल्लक उरू लागली. इथे घरामध्ये काटकसर करत, गंगाबाई, अगदी निगुतीने घर चालवत होत्या.भवाष्यासाठी पुंजी जमवत होत्या.
गोपी आणि चंपालाही त्यांनी शाळेत घातलं होतं. शिक्षणाचं महत्व त्यांना पटलेलं होतं.
गोपीला असलेली शिवणकाम,भरतकामाची आवड त्यांनी बरोबर हेरली. गावातल्या शिंपीणबाईकडे चौथीपर्यंत शिकलेल्या गोपीचे शिवणकाम,भरतकामाचे शिक्षण सुरु झाले.
चंपाची स्वयपाकघरातली आवड गंगाबाईंनी बरोब्बर हेरली आणि तिला वेगवेगळे पदार्थ बनवण्यात तरबेज करायला,त्यांनी सुरुवात केली.मुळातच सुगरण असणारी चंपा भराभर शिकत होती.जोडीला शाळा शिकावी लागत होतीच.
हळूहळू नुसत्या चणे कुरमुरे सोबत, थोडंसं किराणा सामान ठेवायलाही ,आपण सुरुवात करूया ,असं सोपानरावांना सांगुन गंगाबाईंनी, हळूहळू व्यवसाय वाढवायला सुरुवात केली.
मेहनत करण्याची तयारी होतीच. आपल्या घरी गाई-म्हशी असल्या तर ,आपल्याला, घरी पण चांगलं दूध दही मिळेल, आणि आपण त्याचाही व्यवसाय करू शकू ,अशी कल्पना एक दिवस गंगाबाईंच्या मनात आली, आणि किराणा दुकानाच्या जोडीला, दूध त्याचा व्यवसायही हळूच सुरू झाला. सुरवातीला दोन गायी आणि दोन म्हशी घेण्यात आल्या.

 

cattles

दुधाच्या व्यवसायात चागंला जम बसला,मग गंगाबाईंना वेध लागले,ते शेतीचे.मुळातच लहानपणापासुन शेतीच्या सान्निध्यात वाढलेल्या गंगाला मातीची ओढ होतीच.
पाच वर्षै केलीली बचत वापरुन गंगाबाईने दोन एकर शेती घेतली,आणि फुलशेती करुन नवा अध्याय सुरु केला.
शेतीत उत्पन्न फारसे नव्हते,पण समाधान भरभरून होते.
माणिकही हळुहळु मोठा होत होता. शाळेत जात होता. आईवडिलांची मेहनत तो बघत होता, आपण मोठं होऊन, आईवडिलांचा व्यवसाय अजुन मोठा करायचा अशी जिद्द तो बाळगुन होता.
दोन-तीन वर्षात सर्व परिस्थिती बदलली आणि घरात सुबत्ता नांदू लागली. तोवर गोपीही लग्नाच्या वयाची झाली, होती काळ बदलला होता दहा वर्षावरुन, चौदा पंधरा वर्षाच्या मुलींचे लग्नाचं वय आता मानण्यात येत होतं. आता चौदा वर्षाच्या वयात आलेल्या गोपी च्या लग्नाचे वेध गंगा बाईंना लागले होते.
आजुबाजुला , गावातल्या भटाला,कल्पना देण्यात आली. गोपीला चागंला जोडीदार मिळावा म्हणुन गंगाबाईंची खटपट चालली होती.

क्रमशः

भाग्यश्री मुधोळकर

 


धार्मिक कथा येथे वाचा – http://marathiprerna.com/क्षमाधर्म/ 

4 thoughts on “सक्षम ती खंबीर ती-३”

  1. खूप छान जमले आहे. तुझ्या लिखाणात एक सहजता आहे. चौथा भाग कधी वाचायला मिळेल याची वाट पाहत आहोत.
    धन्यवाद आणि शुभेच्छा !!😊😊👍

  2. सुरेखा जोहरापुरकर

    छान रंगतदार होत आहे कथा👍👍👍

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *