education impact

जगणे व्हावे गाणे

“अगं या शुक्रवार -शनिवारी शंकराचार्य हाॅलमध्ये. गाण्यांचा कार्यक्रम आहे .दोन दिवसांचा महोत्सव आहे ,येतेस का तू “समिधा,चा माझ्या मैत्रिणीचा फोन आला, खरंतर शुक्रवार शनिवारची खूप मोठी काम उभी होती डोळ्यासमोर. पण मी पटकन, तिला नाही म्हणाले नाही. म्हटले ,”मी तुला दोन तासात कळवते माझी कामे अॅडजस्ट करते आणि नक्की येते.”

गेल्या दोन वर्षात प्रयत्नपूर्वक केलेल्या सकारात्मक विचारसरणी अंगी बनवण्याच्या प्रयत्नातला हा एक भाग होता. कुठलीही गोष्ट स्वतःसाठी  करायची असेल, किंवा कुठे ट्रीपला जायचे आहे, काही पिक्चर बघायचा आहे ,काही खरेदी करायची आहे, तर पटकन जमणार नाही, असं म्हणायचं नाही, तर प्रयत्न करते, जमते असं म्हणायचं .त्यावेळेला आपल्यालाही विश्वनियंत्रक शक्ती ‘तथास्तु’ म्हणत असते.

अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी केवळ या विचारसरणीमुळे मी प्रत्यक्षात आणल्या आहेत.

खरंतर शुक्रवारी संध्याकाळी मुलगा ट्रीप ला जाणार, म्हणून त्याची तयारी करून द्यायची होती ,आणि शनिवारी सासू बाईंची डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट होती .त्यामुळे ह्या दोन दिवसांचा गोंधळ कसा जमवायचा हा प्रश्न होता ,पण म्हणतात ना इच्छा असेल तर तिथे मार्ग असतोच .

मुलाला कार्यक्रमाविषयी सांगितल्यावर त्याने ,”आई तू निर्धास्त जा माझी मी आवरून तयारी करेन”असे आश्वस्त केले. नवरोबाने,” मी जातो आईसोबत,तू कार्यक्रमाला जा” अशी आनंदाने परवानगी दिली आणि ती दोन दिवसाची संगीत मेजवानी माझ्या मनाला तृप्त करणारी आणि ताजतवानं करणारी ठरली .

“हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे आणि तुझे गोड नाम…….” या प्रार्थनेने माझ्या सकाळचा अलार्म वाजतो आणि मी जागी होते, सगळ्यात पहिले मनामध्ये विचार येतो तो,’ ईश्वराने मला काय काय दिलं पाहिजे आणि सकाळची सुरुवात अगदी छान होऊन जाते. मग आपले नेहमीचे थोडेसे प्राणायाम ,योगासनं, चहापाणी, नाश्ता झालले की स्वयंपाकाची तयारी , कामे थोडीच संपतात…..याच्यामध्ये प्रयत्नपूर्वक मी सकाळी मोबाईलवर कमी वेळ राहते. किंवा काही नकारात्मक गोष्टी आपल्या मनावर, कानावर येणार नाही, याचा प्रयत्न करते. त्यासाठी वर्तमानपत्र ही थोडं नाश्ता वगैरे झाल्यावर उशिरा वाचते आणि त्यातल्या नकारात्मक घटनांवर आणि उदासजन्य घटना ,बातम्यांवर विचार करण्यापेक्षा काही चांगलं असेल तर त्याविषयी जास्त विचार करते.

अर्थात या सकाळच्या घाई गोंधळामध्ये बऱ्याचदा किडण्याचे असंख्य  प्रसंग येतात आणि तेव्हा मात्र आपल्या मनामध्ये वैताग येऊ न देता, चांगले विचार आणणे खरंच अवघड असतं, मग ते आपल्या हातून झालेली सांडलवंड असो, मुलांनी घातलेला गोंधळ असो किंवा पतिराजांनी वारंवार आवाज देणे असो ,एखाद वेळेस कामवाल्या बाईने येणार नाही, असा फोन करावा. मग या सगळ्याला कसं तोंड द्यायचं .

यासाठीही काही मुद्दे मी शोधून ठेवलेले आहे. उदाहरणार्थ बाई येणार नसेल तर, चला आज आपणच भांडे चकाचक करूया, काही सांडलं, तर शुभ असतं, हे आजच्या दिवशी, असा विचार मनात आणायचा.

नवऱ्यावर मुलांवर रागावण्यापेक्षा, यांना किती बरं गरज आहे माझी, असा विचार करायचा म्हणजे बरेचशे प्रॉब्लेम संपतात.

बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की तेव्हा आपण हेल्पलेस असतो. आपल्याला वाईट वाटत असतं, पण आपण त्या व्यक्तीसाठी काहीही करू शकत नसतो किंवा स्वतःवरही असे प्रसंग कित्येकदा येतात, वाटतं की आपली काही चूक नाही पण तरी का बरं आपल्याला अशा अडचणींना तोंड द्यावे लागत आहे?

अशा वेळेसाठी माझ्याकडे एक छान मंत्र आहे, अर्थातच या सोशल मीडियावरच कोणाचातरी लेख वाचला आणि त्यातलं जे मला मनापासून भावलं ते मी उचललेलं आहे तो मंत्र म्हणजे “गाॅड ब्लेस यू आणि गाॅड ब्लेस मी .”

ज्यावेळी आपला नाईलाज असतो त्या वेळेला आपण कळत नकळत दैवाचा धावा करत असतो, त्या वेळेला आपण स्वतः स्वतःला आणि दुसरी व्यक्ती अडचणीत आहे तिला गोड ब्लेस यू असं म्हणून शुभेच्छा तर मनापासून देऊ शकतो.

मला बर्‍याचदा अशा दिलेल्या शुभेच्छांचा सकारात्मक परिणाम अनुभवायला आलेला आहे .त्यामुळे या मंत्रावरचा माझा विश्वास हळूहळू दृढ होत आहे.

आणखीन एक गोष्ट मला इथे मांडावीशी वाटते. योगायोगाने आज “थँक्स गिविंग डे” आहे. खरं तर ही पाश्चात्त्यांची परंपरा .पण आपण  फक्त आजच्या दिवसापुरती नाही, तर नेहमीकरता, रोजच किंवा जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यात चांगलं घडतं ,त्यावेळेला त्या व्यक्तींना ,त्या परिस्थितीला मनापासून थँक्यू म्हटलं पाहिजे. आभारी राहिले पाहिजे. बऱ्याचदा आपण आपल्याकडे काय नाही, याचा विचार करून उदास होत असतो, त्यावेळी , जे काही आपल्याकडे आहे ,त्याविषयी आपण या विश्वाकडे धन्यवाद दिले पाहिजे. त्याचा परिणाम चांगला होतोच आणि शिवाय आपण नकळतच आपल्याकडे काय नाही ,यापेक्षा काय आहे याचा जास्त विचार करायला लागतो.

सकाळी उठल्यावर आज काय चागंले घडणार याची कल्पना मी आधीच ठरवते.त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करते.रात्री झोपतांना काय चागंले दिवसभरात घडले याचा विचार करते. किमान पाच गोष्टी आठवतातच.

अर्थातच आयुष्य काही वेळेला नकारात्मकता ही गरजेची असते.वाईट चालीरिती ,लोक यांचा राग येतोच. उदाहरणार्थ आपल्या जवळची व्यक्ती काही चूक करत आहे अशा वेळेला  त्याला अडवणे गरजेचं असतं .आयुष्यात नकारात्मकता आहे, म्हणून  सकारात्मकतेला चांगले महत्त्व आहे ,हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.

माफ करायला शिकणे हीही सकारात्मकतेची गुरुकिल्ली आहे,स्वतःच्या किंवा इतरांच्या चुका आठवणे,जुन्या गोष्टीसाठी हळहळत राहणे सकारात्मकतेत बाधक ठरतात. यासाठीही छोटा मंत्र आहे

“दहा दिवस -दहा महिने – दहा वर्ष”

एखादी घटना,एखादा निर्णय याचा परिणाम तपासायचा आणि वागायचे.आपण जे वागणार त्याचा क्षणभर विचार करायचा.

दहा मिनीटांनी काय होईल,दहा महिन्यानी काय होऊ शकेल,दहा वर्षांनी काय होणार असा विचार केला की परिस्थितीवर आपले नियंत्रण येते.

एखाद्या व्यक्तिबद्दलही किती राग ठेवायचा हे या दहाच्या सूत्राने ठरवायचे.

बघा प्रयत्न करुन.

म्हणतात ना की दुःख आहे म्हणूनच , या दुःखा नंतर येणार्‍या सुखाला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे नकारात्मक विचार मनामध्ये येणारच, त्या वेळेला आपण त्यातली जी सकारात्मकता शोधतो, त्यावर सकारात्मक विचार करतो त्यामुळे आपले जगणे अलगदपणे गाणे होते यात शंकाच नाही.

काही छोट्या गोष्टीत आनंद शोधते मी

माझी प्रेमळ माणसे,

माझ्याकडील उत्तम अन्न,वस्त्र,निवारा,सुखसोयीची साधने

आजूबाजूचा निसर्ग,

मला उत्तम शिक्षण आणि संस्कार देणारे आईवडिल

मला ठिकठिकाणी प्रवास करायला मिळालेल्या संधी

मला लिखाणासाठी सुचणारे विषय,आणि त्याचे कौतुक करणारा वाचकवर्ग,……

आठवायला लागले की यादी वाढतच राहते.

जगण्याचे गाणेच  मी मनापासुन गुणगुणत राहते.

भाग्यश्री मुधोळकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *