एकादशी

एकादशीच्या दिवशी निघणाऱ्या वारीसाठी त्याने तयारी सुरू केली. शेतांमधली काम करायला घेतली कारभारणीला नेहमीप्रमाणे सोबत येतेस का ?असे विचारले ,पण तिने इथेच माझे पंढरपुर असे म्हणून घरातल्या कामाची कारणे देऊन येण्याचे टाळले. खरं तर यंदा तब्येतीच्या कुरबुरी मुळे त्यालाही वारीसाठी चालत जाणे जमेल की नाही याविषयी शंका होती पण तरीही गेल्या अकरा वर्षाचा नियम चुकवायचा नाही म्हणून, त्याने एक तप वारीचे पूर्ण करण्यासाठी जायचेच असे ठरवले. आवश्यक ते सामान आणि औषधे घेऊन तो गावकऱ्यांसोबत निघाला. इकडे गावाकडे त्याची बायको घरातल्या ज्येष्ठांची आणि मुलांची काळजी घेण्यामध्ये गुंग झालेली होती. त्याला जाऊन आज आठ दिवस झाले होते आणि अजून बारा दिवस लागणार होते आणि अचानकच सासुबाईंची तब्येत खराब झाली. तिला कळेना काय करावे त्याच्याशी संपर्क  करावा का जर आपण त्यांच्या तब्येतीविषयी सांगितले आणि त्याने परत फिरायचे ठरवले तर त्याच्या वारीच्या नियमात आपण व्यत्यय आणला असे तर ठरणार नाही ना आणि तिने आलेल्या परिस्थितीशी एकटीनेच तोंड देण्याचे ठरवले.

तिने गावातल्या चांगल्या डॉक्टर कडे दाखवले डॉक्टरांनी ताबडतोब सोनोग्राफी आणि इतर काही तपासण्या करण्यास सांगितल्या .त्यांच्या पोटामध्ये वाढत असणाऱ्या अपेंडिक्स विषयी त्यांनी तिला कल्पना दिली आणि ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले .सगळ्यात मुख्य होतं ऑपरेशन साठी पैसे गोळा करण्याचं आव्हान ,तिने ते समर्थपणे पेलायचे ठरवले तिने बँकेत आपले दागिने गहाण टाकले आणि तो आल्यावर पैशांची व्यवस्था करेल आणि ते सोडवेल याविषयी तिला खात्री होती .

तिने सासूबाईंना ऍडमिट केले आणि ऑपरेशनची तयारी डॉक्टरांनी सुरू केली. घरांमधली धावपळ ,लहान असणारी मुले आणि वृद्ध सासरे या सगळ्यांना सांभाळताना तिची खूप धावपळ झाली पण म्हणतात ना पांडुरंग असतोच मदतीला त्याप्रमाणे तिची शेजारीण मदतीला धावून आली आणि सासूबाईंचे आजारपण निभावलं वीस दिवसांनी तो परत आला तिने त्याला त्या वेळेला तिने सर्व परिस्थितीची कल्पना दिली त्याला आपण आईच्या महत्त्वाच्या ऑपरेशनच्या वेळी इथे नव्हतो वारी ला गेलो होतो या विषयी वाईट वाटत होते पण तिने सांगितले की त्याच्या बाराव्या वारीमध्ये व्यत्यय येऊ नये म्हणूनच तिने त्याला त्याची कल्पना दिली नाही .,आणि एकटीनेच त्याला तोंड दिले त्या परिस्थितीत तिला त्याच्या  पांडुरंगाने साथ दिली होती आणि याविषयी ती कृतज्ञ ही होती .तिने पैशाची व्यवस्था करताना आपले दागिने गहाण टाकायला मागेपुढे पाहिले नाही याविषयी त्याला खूपच कौतुक वाटले, आता एवढे पैसे कुठून गोळा करायचे आणि ते दागिने कसे सोडवायचे याविषयी विचार करायला त्याने सुरुवात केली गेल्या वर्षी पीक पाणी फारसे नव्हतेच तो शाळेतल्या मुलांच्या ज्या ट्युशन्स घ्यायच्या त्यामधून जे उत्पन्न होते त्यातून घरखर्च भागत होता .अशा वेळेला अचानक 50000 रुपये गोळा करणे त्याच्यासाठी कठीणच होते अशा वेळीही तिने धीराने घेतले माझा खरा दागिना तुम्ही आहात. माझे अंगावरचे दागिने सोडवायला वेळ लागला तरी चालेल तुम्ही ह्यासाठी काळजी करू नका मी ही यंदा तुमच्या बरोबरीने मेहनत करीन आणि आपण दोघे मिळून ते दागिने सोडवू असा तिने धीर दिला आपल्या बायकोचे समजूतदारपणाचे बोलणे ऐकून त्याला भरून आले आणि अशी बायको मिळणे आपले भाग्यच आहे असे त्याला जाणवले.

तिचे आभार मानणे कृत्रिमपणा झाला असता.त्यामुळे तिला काहीतरी वेगळी भेट देण्याचे त्याने ठरवले. तिला गाण्याची खूप आवड होती लग्नाआधी ती शिकतही होती .पण नंतर संसारात गुंतल्याने तिने त्या आवडीला दूर सारले होते.

आता त्याने तिच्या आवडीचे तिला करू द्यायचे ठरवले.मुख्य प्रश्न होता तो म्हणजे यासाठी तिला वेळ कसा उपलब्ध करून द्यायचा ,त्यावर त्यानेच उपाय काढला दुपारी ट्युशन्स चालू असताना तो आपल्या मुलांना सांभाळणार होता आणि घरात काही लागले तर तेही पाहणार होता आणि  गावातल्या चांगल्या शिक्षकाकडे त्याने तिची वर्षभराची गायन क्लासची फी भरुन टाकली.ही भेट तिला देताना तो म्हणाला ” मी तुझ्या भरोशावर वारीला निर्धास्त गेलो आणि तू माझी खात्री खरी ठरवली तू जे काही केलंस त्याची परतफेड काहीही केलं तरी होणार नाही पण मी आता असं ठरवलं आहे की वर्षभर तरी तुझ्या आवडीचं करण्यासाठी तुला वेळ उपलब्ध करून द्यायचा तू या गायन क्लासला जा आणि त्या वेळेमध्ये घर सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी माझी” वारीला न जाताही,पांडुरंगाने तिला हवे ते दिले होते तिची आवड जपणारा नवरा आणि आणि त्यासाठी तिने ही पांडुरंगाला मनोमन हात जोडले आणि असाच पाठीशी राहा रे बाबा अशी प्रार्थना केली.

ही एकादशी तिच्यासाठी वेगळीच ठरली.

भाग्यश्री मुधोळकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *